भारत बिजली लिमिटेड (बीएसई कोड ५०३९६०)
प्रवर्तक: निखिल दांनानी
वेबसाइट: www.bharatbijlee.com
बाजारभाव: रु. २,८३४/-
प्रमुख उत्पादन/ व्यवसाय: ऊर्जा, ट्रान्सफॉर्मर्स
भरणा झालेले भागभांडवल: रु. ५.६५ कोटी
शेअर होल्डिंग पॅटर्न (%)
प्रवर्तक ३३.६९
परदेशी गुंतवणूकदार ५.३०
बँक/ म्युच्युअल फंड/ सरकार १७.७७
इतर/ जनता ४३.२४
पुस्तकी मूल्य: रु. १९५६
दर्शनी मूल्य: रु. ५/-
लाभांश: ७००%
प्रतिसमभाग उत्पन्न: रु.११६.६८
किंमत उत्पन्न गुणोत्तर: २४.३
समग्र किंमत उत्पन्न गुणोत्तर: ४८.५
डेट इक्विटी गुणोत्तर: ००
इंटरेस्ट कव्हरेज गुणोत्तर: १३.९
रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लोईड (ROCE): १०.६%
बीटा : १.६
बाजार भांडवल: रु. ३,२०३ कोटी (स्मॉल कॅप)
वर्षभरातील उच्चांक/ नीचांक: ५,७०१/ २,४३०
गुंतवणूक कालावधी: २४ महिने
वर्ष १९४६ मध्ये स्थापित, भारत बिजली ही भारतातील एक आघाडीची इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग कंपनी आहे. कंपनी ट्रान्सफॉर्मर, इलेक्ट्रिक मोटर्स, लिफ्ट सिस्टीम, ड्राइव्ह आणि ऑटोमेशनच्या उत्पादनात असून ती ईएचव्ही स्विचयार्ड, एचव्ही आणि एमव्ही सबस्टेशन, इलेक्ट्रिकल बॅलन्स ऑफ प्लॅन्ट इत्यादींसाठी टर्नकी सोल्यूशन्सदेखील प्रदान करते.
भारत बिजलीच्या ऊर्जा विभागात पॉवर ट्रान्सफॉर्मर्सचे डिझाइन, कमिशनिंग आणि विपणन, ट्रान्सफॉर्मर्सची डिलिव्हरी, रेक्टिफिकेशन, कमिशनिंग आणि सर्व्हिसिंगसह इलेक्ट्रिकल सबस्टेशनसाठी ईपीसी प्रकल्प आणि देखभाल उत्पादनांचे विपणन यांचा समावेश आहे. डेटा सेंटर, अक्षय्य ऊर्जा आणि मेटलसारख्या उदयोन्मुख क्षेत्रांमधून जास्त मागणी असल्याने कंपनीच्या महसुलात गेल्या आर्थिक वर्षात ६३ टक्क्यांनी वाढ झाली ज्यामुळे ग्राहकांमध्ये विविधता आणण्यास मदत झाली.
कंपनीच्या औद्योगिक प्रणालीमध्ये इलेक्ट्रिक मोटर्स, मॅग्नेट तंत्रज्ञान मशीन, ड्राइव्ह आणि ऑटोमेशन प्रणालीच्या विस्तृत श्रेणीचा विकास, विपणन आणि उत्पादन यांचा समावेश आहे. गेल्या आर्थिक वर्षात कंपनीला इलेक्ट्रिक मोटर्स व्यवसायाला तीव्र स्पर्धेचा सामना करावा लागला, ज्यामुळे विक्रीच्या आकारमानात वाढ असूनही, किमती कमी राहिल्या आणि मार्जिनवर परिणाम झाला.कंपनी तिच्या २२० केव्ही ट्रान्सफॉर्मर्ससाठी एकूणच पॉवर ट्रान्सफॉर्मर्स विभागात आघाडीवर असून ती पहिल्या १० इलेक्ट्रिक मोटर्स उत्पादकांपैकी एक आहे. लिफ्टसाठी गिअरलेस पर्मनंट मॅग्नेट सिंक्रोनस मोटर्सची भारत बिजली ही पहिली भारतीय उत्पादक कंपनी आहे.
महसूल मिश्रण
ट्रान्सफॉर्मर्स – ५४%
इलेक्ट्रिक मोटर्स – ४०%
मॅग्नेट टेक्नॉलॉजी मशीन्स – ३%
ड्राइव्ह सिस्टम्स – ३%
उत्पादन क्षमता:
नवी मुंबईतील ऐरोली येथे कंपनीची उत्पादन सुविधा असून त्यात १,७०,३०० चौ.मी. जागेवर १८,००० एमव्हीए उत्पादन क्षमता आहे. ती लवकरच २८,००० एमव्हीएपर्यंत वाढवण्याचा कंपनीचा मानस आहे. भारत बिजली राज्य वीज मंडळे, उपयुक्तता, सार्वजनिक उपक्रम इत्यादींना सेवा पुरवते. तसेच ०.१८ किलोवाॅट (फ्रॅक्शनल किलोवाॅट मोटर्स) ते १,२५० किलोवाॅटपर्यंतच्या उच्च-दाब मोटर्सदेखील तयार करते. त्यासाठी रेल्वेची मान्यताही मिळाली आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये, कंपनीने त्यांचे ड्राइव्ह आणि ऑटोमेशन सेवा केंद्र वाढवले तसेच नवीन अद्ययावत ड्राइव्हचे उत्पादन करण्यासाठी प्रकल्पाचा विस्तारदेखील सुरू केला आहे. आर्थिक वर्ष २०२४ पर्यंत, कंपनीकडे १,१४३ कोटी रुपयांचे कार्यादेश आहेत.
भागीदारी
कंपनीने त्यांच्या व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राइव्हचे वितरण करण्यासाठी जर्मनीच्या केईबीसोबत भागीदारी केली आहे, ज्यामध्ये केईबीचे ९०० किलोवाॅटपर्यंतचे एसी व्हेरिएबल ड्राइव्हदेखील त्यांच्या प्रकल्पात तयार केले जात आहेत.
याव्यतिरिक्त, कंपनी अचूकता, उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी डीसी ड्राइव्ह, सर्वो सिस्टम सोल्यूशन्स आणि औद्योगिक ऑटोमेशन सोल्यूशन्स देऊ करते. कंपनीचे लेखापरीक्षित आर्थिक निकाल पुढील महिन्यात जाहीर होतील. डिसेंबर २०२४ अखेर सरलेल्या तिसर्या तिमाहीमध्ये कंपनीने, गेल्या वर्षीच्या तुलनेत उलाढालीत २१ टक्के वाढ नोंदवून ती ५१४ कोटींवर नेली आहे तर नक्त नफ्यात ३७ टक्के वाढ होऊन तो ४०.६ कोटींवर गेला आहे. केवळ ५.६५ कोटी रुपये भांडवल असलेल्या आणि कुठलेही कर्ज नसलेल्या भारत बिजलीचा गुंतवणूक पोर्टफोलिओदेखील मोठा आहे. एक दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सध्या २,८०० रुपयांच्या आसपास असलेला हा शेअर जरूर खरेदी करा.शेअरबाजारातील अनिश्चितता पाहता हा शेअर सुचवलेल्या किमतीपेक्षा कमी भावात मिळू शकतो, म्हणून प्रत्येक मंदीत तसेच टप्प्याटप्प्याने शेअर खरेदीचे धोरण ठेवावे.
– अजय वाळिंबे
stocksandwealth@gmail.com
• हा लेख एक अभ्यासपूर्ण विवेचन असून गुंतवणूक सल्ला नव्हे.
• प्रस्तुत लेखामध्ये सुचवलेल्या कंपनीच्या शेअर्समध्ये लेखकाची वा त्याच्या जवळच्या नातेवाईकांची (उपलब्ध माहितीप्रमाणे) कुठलीही गुंतवणूक नाही किंवा असल्यास ती कंपनीच्या भरणा झालेल्या भागभांडवलाच्या १% पेक्षा कमी आहे. तसेच सुचवलेल्या कंपनीशी लेखकाचा कुठलाही संबंध नसून त्याने कंपनीकडून कुठलेही मानधन अथवा भेटवस्तू घेतलेली नाही.
• लेखात सुचवलेल्या कंपनीचे संशोधन हे वाचकांच्या महितीसाठी असून, शेअरमधील गुंतवणूक वाचकांनी स्वत:च्या जोखमीवर अथवा सल्लागाराच्या सल्ल्याने करावी.