भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली असलेल्या नऊ कंपन्यांमध्ये एक महत्त्वाची कंपनी म्हणजेच ‘भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड’. स्वातंत्र्यानंतर लगेचच सुरू झालेल्या भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने गेल्या दहा- पंधरा वर्षात यशाची नवी क्षितिजे सर केली आहेत. संरक्षण क्षेत्र आणि संरक्षणाव्यतिरिक्त इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांच्या क्षेत्रात ही कंपनी कार्यरत आहे.
दूरसंचार प्रणाली, रडार, नौदलासाठी लागणारी रडार यंत्रणा, प्रत्यक्ष युद्धात वापरली जाणारी इलेक्ट्रॉनिक उपकरणे, इलेक्ट्रो-ऑप्टिक्स रणगाडे आणि चिलखती गाड्यांसाठी वापरली जाणारी यंत्रसामुग्री, बॅटरी अशा विविध वस्तूंचे उत्पादन भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनी द्वारे केले जाते. भारत सरकारच्या अधिपत्याखाली असलेली ही कंपनी नवरत्न कंपनी म्हणून ओळखली जाते. अलीकडेच भारत इलेक्ट्रॉनिक्सने देशाच्या सीमांचे संरक्षण करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची समजली जाणारी ‘बॉर्डर सर्व्हिलन्स सिस्टीम’ तयार केली आहे.
भारतीय लष्करासाठी शत्रूचा ठावठिकाणा शोधून काढणारी रडार यंत्रणा विकसित करण्यात भारत इलेक्ट्रॉनिक्सला यश आले आहे. युद्धाचे बदलते स्वरूप लक्षात घेता रात्रीच्या अंधारात हातघाईची लढाई करताना जवानांना सुस्पष्ट दिसेल अशा ‘नाईट व्हिजन डिव्हाइसेस’ची निर्मितीही ही कंपनी करते. संरक्षण क्षेत्र या एकाच क्षेत्रावर अवलंबून न राहता जिथे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान हवे आहे अशा क्षेत्रात कंपनीने आगेकूच करायला सुरुवात केली आहे. दूरसंचार क्षेत्रात लागणारी यंत्रसामग्री आणि सुट्टे भाग सुद्धा कंपनीतर्फे तयार केले जातात.
हेही वाचा… Money Mantra: जुनी-नवीन करप्रणाली कशी निवडावी?
देशातील समस्त नागरिकांना अभिमान वाटावा अशी एक महत्त्वाची बाब म्हणजे आपल्या देशात होणाऱ्या सर्व निवडणुकांमध्ये जी मतदान यंत्रे वापरली जातात ती संपूर्ण स्वदेशी प्रणाली भारत इलेक्ट्रॉनिक्स या कंपनीने विकसित केली आहे.
मार्च अखेरीस संपलेल्या तिमाही आकड्यांचा विचार केल्यास कंपनीचे एकूण उत्पन्न ६५४५ कोटी रुपये होते. मागच्या वर्षीपेक्षा या उत्पन्नात ५५% ची वाढ दिसून आली. कंपनीचा करोत्तर नफा १३६६ कोटी रुपये इतका नोंदवला गेला. गेल्या वर्षी १४ जून रोजी या कंपनीचा शेअर ८० रुपये होता दिनांक १४ जून २०२३ रोजी त्याचा भाव १२१ रुपये आहे. कंपनीच्या ताळेबंदाकडे पाहिल्यास सर्वाधिक सुखावह बाब जाणवते ती म्हणजे कंपनीकडे जवळपास दोन वर्ष पुरेल एवढे ऑर्डर बुक आहे. कंपनीवरील कर्जाचे ओझे कमी होत असून काही वर्षातच ती कंपनी संपूर्णपणे कर्जमुक्त होईल. भारत सरकारच्या अधिपत्याखाली असल्यामुळे कंपनी दरवर्षी हमखास चांगला लाभांश देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत असते. गेल्या पाच वर्षात कंपनीने सलगपणे लाभांश दिला आहे.
हेही वाचा… एमएस धोनीच्या सासू चालवतात तब्बल ८०० कोटींची कंपनी, साक्षीच्या आई शीला सिंह नेमक्या आहेत तरी कोण?
मागील दहा वर्षाचा विचार करता कंपनीच्या नफ्यामध्ये १३ टक्के दराने वाढ नोंदवली गेली आहे व कंपनीची विक्री गेल्या दहा वर्षात ११ टक्के दराने वाढते आहे. भारतीय लष्करातर्फे ‘आकाश’ या आधुनिक क्षेपणास्त्र निर्मितीची ऑर्डर भारत इलेक्ट्रॉनिक्सला मिळालेली होती. भारत सरकारच्या प्रसिद्धी पत्रकानुसार गेल्या पाच वर्षात कंपनीने जवळपास ५० हजार कोटी रुपयांचे प्रकल्प हाती घेतले आहेत. माझगाव डॉक लिमिटेड या कंपनीबरोबर युद्धनौका तयार करण्याच्या प्रकल्पामध्ये सुद्धा भारत इलेक्ट्रॉनिक्स समाविष्ट आहे. गेल्या दहा वर्षाच्या विक्री आणि नफ्याच्या आकडेवारीकडे लक्ष दिल्यास कंपनीचा वाढता आलेख स्पष्टपणे दिसतो. मार्च २०१२ मध्ये कंपनीची एकूण विक्री ५९१४ कोटी रुपये होती ती मार्च २०२३ अखेरीस १७ हजार ७३४ कोटी रुपये एवढी आहे. कंपनीचा नफा याच कालावधीत वाढून ८४७ कोटींवरून २९८६ कोटींवर पोहोचला आहे.
येत्या काळात कंपनी भारतातील वेगाने विकसित होणाऱ्या पायाभूत सुविधांतील प्रकल्पांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. हाय स्पीड रेल्वे, मेट्रो रेल्वे, ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर अशा पायाभूत प्रकल्पात इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि तंत्रज्ञान कंपनीद्वारे पुरवले जाईल. त्याचप्रमाणे संरक्षण क्षेत्रात आगामी काळात भारत संरक्षण विषयक सामग्री उत्पादन करणारा देश म्हणून उदयास येत आहे. भारतातून संरक्षण विषयक यंत्रसामुग्री मध्ये होणाऱ्या निर्यातीमध्ये सुद्धा गेल्या पाच वर्षात वाढ होताना दिसते. त्यामुळे भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हा शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी फायदेशीर आहे.
(गुंतवणूकदारांनी शेअरमध्ये गुंतवणूक करताना स्वतःच्या जोखमीवर व वैयक्तिक अभ्यासावरच गुंतवणूक करावी. लेखात सुचवलेल्या कंपनीच्या शेअरमध्ये लेखकाची वैयक्तिक गुंतवणूक नाही.)