पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रात मागील वर्षी सलग तिसऱ्यांदा भाजप सरकार स्थापन झाल्यावर पहिलाच संपूर्ण अर्थसंकल्प शनिवारी मांडला गेला. सलग तीन वर्षे आर्थिक विकासाचा वेग वाढल्यावर अचानक हा वेग खुंटतो आहे. जागतिक पातळीवर अमेरिकेसकट अनेक देशांत सत्ताबदल, राजनैतिक आणि भू-व्यापारी तणाव, युद्धे अशा अनेक प्रकारच्या अनिश्चिततांनी व्यापलेल्या वातावरणामुळेदेखील भारतीय अर्थव्यवस्थेत सुस्तपणा येतोय. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री सादर करीत असलेल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाकडे मोठ्या आशेने बघितले जात होते. एकीकडे सरकारी तिजोरीत मर्यादित निधी उपलब्ध आहे. त्याचे योग्य विनियोजन करून विकास दर वाढवण्याचे आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असल्यामुळे अर्थसंकल्पात खूप काही मोठे घडेल अशी अपेक्षा नसली तरी कृषी आणि सेवा क्षेत्र ही विकासदर टिकवण्यासाठी महत्त्वाची क्षेत्र असल्यामुळे त्याकडे कसे पाहिले जाते याची उत्सुकता नक्कीच होती. कृषिक्षेत्राच्या बाबतीत बोलायचे तर, अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पाची सुरुवात करतानाच शेती अर्थव्यवस्थेचे पहिले इंजिन आहे, अशी केल्याने या क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. मुळात भारतासारख्या कृषी-आधारित अर्थव्यवस्थेत शेतीसाठी कितीही दिले तरी कमीच अशी परिस्थिती आहे. परंतु मर्यादित संसाधने उपलब्ध असतानादेखील जे दिले ते समाधानकारक आहे असे म्हणता येईल. विशेष म्हणजे यावेळी कृषिविकास साधण्यासाठी दर्जा आणि उत्पादकता वाढीतून आत्मनिर्भरता हे सूत्र स्वीकारण्यात आले असल्याचे दिसून येईल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खाद्यतेल, कडधान्य आत्मनिर्भरतेवर भर

मागील पंधरवड्यात लिहिलेल्या लेखात कृषिमाल बाजारपेठेच्या दृष्टीने महत्त्वाच्या, म्हणजे खाद्यतेल आणि कडधान्य आयात निर्भरतेविरुद्ध युद्धपातळीवर उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत मांडले होते. विशेष म्हणजे अर्थमंत्र्यांनी या गोष्टी फारच मनावर घेतल्याचे या अर्थसंकल्पात जाणवून येईल. कारण, तेलबिया उत्पादकता आणि उत्पादन वाढवण्यासाठी संशोधन परिसंस्था बळकट करणे, कीडरोधक आणि हवामान लवचीकता असलेल्या बियाण्यांचा प्रचार आणि प्रसार करणे आणि यासाठी शंभरहून अधिक बियाण्यांच्या वाणांची व्यावसायिक उपलब्धता वाढवणे, यावर भर देण्यात आला आहे.

खरे तर मागील अर्थसंकल्पामध्येच खाद्यतेल मिशनची घोषणा करण्यात आली होती आणि त्यासाठी १० हजार कोटी रुपये खर्च केले जातील असे म्हटले होते. याबाबतीत अंमलबजावणीच्या दृष्टीने झालेल्या प्रगतीचा यावेळी उल्लेख नव्हता. तसेच आयात शुल्कामधून वार्षिक ५० हजार कोटी रुपये जमा होणार असतील तर या क्षेत्राच्या विकासासाठी १० हजार कोटींऐवजी २० हजार कोटी रुपये देण्याची खाद्यतेल उद्योगाची मागणी दुर्लक्षित केली गेली आहे. खाद्यतेल उपलब्धता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी इतर पिकांकडून तेलबियाकडे वळण्यासाठी उत्तेजन देणे गरजेचे आहे. यासाठी मोठ्या निधीची आवश्यकता आहे. हे पाहता १० हजार कोटी रुपयांचा निधी खूपच कमी असल्याने या योजनेला फार यश येण्याची अपेक्षा नाही. तरीही टाकलेली पावले योग्य मार्गाने जात आहेत एवढेच म्हणता येईल.

कडधान्य आत्मनिर्भरता साधण्यासाठीदेखील सहा वर्षे कालावधीची दीर्घकालीन योजना राबवली जाणार आहे. संपूर्ण खाद्यतेल आयातनिर्भरता निदान पुढील २० वर्षांत तरी शक्य नसली तरी मागील अनुभव पाहिल्यास कडधान्य आत्मनिर्भरता दीड-दोन वर्षांत गाठणे शक्य आहे. कारण डाळींची टंचाई फार मोठी नाही. तूर, मूग आणि मसूर या खाण्यासाठी वापराच्या दृष्टीने एकमेकांशी संलग्न असलेल्या डाळींचे एकूण उत्पादन जरी ३०-३५ लाख टनांनी वाढले तरी पुरेसे आहे. कारण क्षेत्रवाढ आणि उत्पादकता वाढ असा दुहेरी प्रयत्न करून चण्याच्या उत्पादनातदेखील १०-१५ लाख टन वाढ सहज शक्य आहे. म्हणजे एकूण अतिरिक्त उपलब्धता ५० लाख टनांची झाल्यास आपण किमान कडधान्यात आत्मनिर्भर होऊ शकतो. हे सर्व १२-१८ महिन्यांत म्हणजे तीन हंगामांत साध्य करणे शक्य आहे. यासाठीदेखील उत्तम आणि बदलत्या हवामानात तग धरू शकणाऱ्या बियाण्यांचा स्वीकार आणि त्यातून उत्पादकता वाढ हेच सूत्र राहील.

एकंदर गोळाबेरीज पाहता तेलबिया क्षेत्रात नजीकच्या काळात फार बदल होणार नाही, परंतु कडधान्य आत्मनिर्भरता शक्य आहे. मात्र उत्पादकता, उत्पादनवाढ ही झाली नाण्याची एक बाजू. आता नाण्याची दुसरी बाजू म्हणजे पणन किंवा पिकवलेला माल कधी, कसा आणि काय किमतीत विकावा याबाबत शेतकऱ्याला मार्गदर्शनाची गरज आहे. अगदी साध्या भाषेत बोलायचे तर पिकवलेल्या मालाला चांगली किंमत मिळण्याची हमी हवी आणि अशी किंमत मिळाली तरच आत्मनिर्भरता ही शाश्वत ठरेल.

आत्मनिर्भरतेचा शेतकऱ्यांना शाप?

मागील अनुभव असे दर्शवतो की, कडधान्य क्षेत्रात २०१७ ते २०२१ या काळात आपण ८५-९० टक्के आत्मनिर्भर होतो, परंतु याच काळात कडधान्यांच्या किमती अनेकदा हमीभावाच्या २५ टक्के खाली राहिल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आत्मनिर्भरतेचे हेच प्रमाण आज ७०-७५ टक्क्यांवर आले आहे आणि उरलेली गरज आपण ३० हजार कोटी रुपयांची आयात करून भागवणार आहोत. तेलबियांच्या बाबतीत बोलायचे तर खाद्यतेल आयात निर्भरता ७० टक्के असतानादेखील तेलबियांना हमीभावाखाली राहावे लागत आहे. मग आयात निर्भरता ७० टक्क्यांवरून ६० टक्क्यांवर जरी आली तरी तेलबियांचा भाव गडगडणार आणि उत्पादकांचे नुकसानच होणार. म्हणजे आत्मनिर्भरता जर शेतकऱ्यांच्या मुळावर येणार असली तर ती शाश्वत राहणार नाही. त्यासाठी नाण्याच्या दुसऱ्या बाजूवर अधिक लक्ष द्यावे लागेल, ते म्हणजे शेतकऱ्यांना चांगला भाव देणाऱ्या पर्यायी बाजारपेठेवर. संपूर्ण किडलेल्या बाजार समिती प्रणालीला पर्यायी बाजारपेठ केवळ वायदेबाजार देऊ शकतो आणि सोयाबीन, चण्यासकट सात वस्तूंच्या वायदे व्यवहारांवर बंदी आहे. आता चौथ्या वेळेला बंदीची मुदत वाढवण्यात आली असून ही बंदी आता मार्चपर्यंत लागू राहील. म्हणजेच शाश्वत आत्मनिर्भरता केवळ स्पर्धात्मक आणि मजबूत पणन प्रणालीवरच अवलंबून राहील हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे.

कापूस मिशन स्वागतार्ह

अर्थसंकल्पात कृषिक्षेत्राच्या दृष्टीने महत्त्वाची घटना म्हणजे पंचवार्षिक कालावधीचे कापूस मिशन सुरू करण्याची घोषणा. यामध्येदेखील उत्पादकता वाढ आणि शाश्वतता या गोष्टींवर भर देण्यात आला आहे. भारत जगातील क्रमांक एक किंवा दोनचा कापूस उत्पादक असला तरी दर्जात्मकदृष्ट्या आपण ऑस्ट्रेलिया, ब्राझील, अमेरिका आणि काही आफ्रिकी देशांच्या मागेच आहोत. यामुळेच भारतीय कापूस जागतिक बाजारपेठेत सरासरी १० टक्के कमी भावात विकला जातो. यातून देशाला दरवर्षी सुमारे १२ हजार कोटींचा तोटा होत असतो. कापूस मिशनमध्ये या गोष्टींचा विचार करून उत्तम दर्जाच्या कापूस उत्पादनावर भर देण्यात आला आहे. यात लांब धाग्याच्या कापसाच्या प्रमुख वाणांना प्रोत्साहन दिल्यास आपल्याला असा कापूस इजिप्त, ऑस्ट्रेलिया किंवा ब्राझीलकडून आयात करावा लागणार नाही. तसेच उत्तम कापसाची निर्मिती देशातच झाली तर वस्त्रोद्योगालादेखील फायदा होऊन आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कापड, तयार कपड्यांना असलेल्या मागणीत मोठी वाढ होईल. यातून शेतकऱ्यांना आपल्या मालाला चांगला भाव मिळेल हेही नक्की.

मखाणा उद्योगाला ‘लॉटरी’

अर्थसंकल्पात मखाणा उत्पादन, प्रक्रिया आणि मूल्यवर्धित मालाची निर्यात या गोष्टींवर मोठा भर देण्यात आला आहे. याकरिता मखाणा मंडळाची स्थापना करण्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे. अर्थात बिहारमध्ये येत्या काळात होऊ घातलेल्या निवडणुकांनी प्रेरित होऊन हा राजकीय निर्णय घेतला असला तरी शेतकऱ्यांच्या दृष्टीने तो नक्कीच फायदेशीर आहे, यात वादच नाही. मखाणा हे बिहारमध्ये पिकणारे पीक असून जगातील ८५ टक्के मखाणा उत्पादन एकट्या भारतात होते. प्रथिनांनी भरलेल्या मखाणाची पौष्टिक आहार म्हणून जगात मागणी वाढत आहे. अशावेळी त्याला प्रोत्साहन देणे हा उत्तम निर्णय आहे. बिहारच्या ग्रामीण विकासासाठीदेखील मखाणा अशासाठी महत्त्वाचा आहे की, सुमारे ६० लाख लोक आज प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मखाणा पुरवठासाखळीमध्ये सामावलेले आहेत. यामध्ये उत्पादकापासून ते निर्यातदार सर्व अंतर्भूत आहेत. त्यामुळे या योजनेचे स्वागतच आहे.

याव्यतिरिक्त मत्स्यउत्पादन आणि निर्यातीला उत्तेजन पंतप्रधान धन धान्य कार्यक्रमाअंतर्गत १०० जिल्ह्यांत उत्पादकता वाढ अभियान चालवण्याचे प्रतिपादन, आसाममध्ये साडेबारा लाख टनांच्या क्षमतेचा युरिया निर्मिती कारखाना अशा अनेक घोषणा कृषिविकासासाठी केल्याने या अर्थसंकल्पाला समाधानकारक म्हटले, तरी आत्मनिर्भरतेचा शेतकऱ्यांना शाप न ठरो अशी देवाचरणी प्रार्थना.