-डॉ. सुरेश हावरे

उद्योग म्हटला की पैसा आला. प्रचंड उलाढाल आली. कर्ज घेणे आणि ते फेडणे आलं. कर्ज फेडताना अडचणी आल्या तर नंतरचे ताप-संताप आले. म्हणून या व्यवहारातील गुंतागुंत उद्योजकाने समजून घेतली पाहिजे. कर्ज हे दुधारी शस्त्र आहे. ते घेण्याचे जसे फायदे आहेत तसेच धोकेही आहेत. यासाठी उद्योजकाने कर्ज हे नीट समजून-उमजून घेतले पाहिजे म्हणजे तो योग्य निर्णय घेऊ शकेल. त्यासोबत त्याने मानसिकदृष्ट्या कणखर असणेही गरजेचे आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्जाशिवाय उद्योग करता येणे शक्य आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो. अनेकांना वाटते उद्योग म्हणजे कर्ज आलेच. अनेकांच्या तोंडून आपण ऐकले असेल – ‘पैशाच्या ठिकाणीच तर आपण कमी पडतो राव. आपल्याला भांडवल उभारणी करताच येत नाही. ते बघा अदानी-अंबानी, लाखो कोटींचे कर्ज घेतात, अन्, केवढा मोठा उद्योग करतात.’ (मित्रहो, मुकेश अंबानीसुद्धा आता कर्जाशिवाय उद्योग करण्याच्या प्रयत्नात आहे, असे नुकतेच त्याने जाहीर केले).

पण माझ्या अनुभवाने सांगतो, कर्जाशिवाय उद्योग करता येतो. मी अनेक वर्षे केला. कुठेही अडचण आली नाही. उलट कर्ज घेण्यासाठी लागणारा वेळ, पैसा, श्रम वाचले. म्हणून मी सांगतो की कर्ज न घेता उद्योग करा. पण हा झाला एक पर्याय. अर्थात अजिबात कर्ज घेऊच नये या मताचा मी नाही. कधी-कधी थोडे कर्ज घेतल्याने आपला उद्योग मोठी झेप घेऊ शकतो. याला ‘लिवरेजिंग’ असे म्हणतात. हे कसे ओळखावे; तर त्याचे एक साधे गणित आहे. म्हणजे कर्ज घेतल्याने त्यावर द्याव्या लागणाऱ्या व्याजापेक्षा, निव्वळ नफा हा अधिक असला पाहिजे. कर्ज घेतल्याने जास्त फायदा/ नफा झाला असे असले पाहिजे. तरच कर्ज घेणे उपयुक्त होय.

हेही वाचा…अर्थचक्राचे शिल्पकार – अभियांत्रिकी आणि भांडवली उद्योग क्षेत्र

बरेचदा कर्जाची मर्यादा ओलांडली जाते. फायनान्स कंपन्याही यासाठी आग्रह करतात. कर्जाची पण एक नशा असते. आपली मार्केटमध्ये पत वाढत चालली आहे. आपण आता मोठे होतो आहे असे उद्योजकाला वाटते. येथे कडक आर्थिक शिस्त कामी येते. कर्ज किती घ्यावे याला एक आर्थिक धोरणही आहे, ते म्हणजे उद्योगातील कर्ज हे भाग भांडवलाच्या दुपटीपेक्षा (डेट-इक्विटी रेशो) अधिक असू नये. याला उद्योगाचा पाया मजबूत आहे असे म्हणतात. यासोबतच उद्योगात ‘लिक्विडिटी’ म्हणजे रोख भांडवल उद्योजकाकडे असणे आवश्यक आहे. ते किती असावे तर भारतीय रिझर्व्ह बँक असा आकडा बँकांसाठी वेळोवेळी जाहीर करते. आजघडीला तो ६ टक्क्यांच्या जवळ आहे. म्हणून माझ्या ढोबळमानाने तो १० टक्क्यांपर्यंत प्रत्येकाने ठेवला पाहिजे. म्हणजे अडचणींचा सामना करणे सोपे जाते.

आता जरा ‘सिबिल स्कोअर’ म्हणजे काय ते समजून घेऊ. कर्ज मिळण्यासाठीची पत असा त्याचा अर्थ आहे. क्रेडिट इन्फर्मेशन ब्युरो (इंडिया) लिमिटेडची आद्याक्षरे म्हणजे ‘सिबिल’ होय. ही खासगी कंपनी आहे. २००० सालात तिची स्थापना झाली. तिला भारतीय रिझर्व्ह बँकेची मान्यता आहे. अशा प्रकारच्या सध्या चार कंपन्या आहेत. बँकांकडून ग्राहकांची माहिती घेऊन, कर्ज फेडण्याची सवय बघून ‘सिबिल स्कोअर’ बनवला जातो. साधारणत: ३०० ते ९०० या मध्ये तो असतो. ९०० म्हणजे अति उत्तम आणि ३०० म्हणजे सर्वात वाईट. साधारणतः स्कोअर ७०० वर असणे कर्ज देण्यासाठी चांगला समजला जातो. आपला स्कोअर सांभाळणे आपल्याच हाती आहे. त्यासाठी आर्थिक शिस्त असणे आवश्यक आहे.

हेही वाचा…Money Mantra: फंड विश्लेषण: निपॉन इंडिया ग्रोथ फंड

कर्ज घेताना त्याचा व्याजदर हा वाटाघाटीतून कमी करता येतो. फी व इतर खर्चही कमी करता येतात. उद्योजकाने ही घासघीस केली पाहिजे. कोणत्या प्रकारचे कर्ज घ्यावे हेही ठरविले पाहिजे. खेळत्या भांडवलासाठी कमी कालावधीचे व इमारतीसाठी जास्त काळाचे कर्ज घेता येते. प्रत्येकाचा व्याजदर भिन्न असतो.

कर्ज घेताना काही मालमत्ता गहाण ठेवावी लागते. त्याशिवाय कर्ज मिळू शकत नाही. कंपनीची तसेच वैयक्तिक हमी द्यावी लागते. म्हणजे तुमच्या स्वतःच्या नावे असलेली व कंपनीच्या नावे असलेली सगळी मालमत्ता गहाण होते. कर्ज घेताना बऱ्याच पेपरवर सह्या कराव्या लागतात. शेवटी शेवटी एवढी घाई होते किंवा केली जाते की पेपर वाचणे शक्यच नसते. एका बँकरने आपला अनुभव सांगितला की, ‘कर्ज घेणारे पेपर्स वाचत नाहीत व जे पेपर्स वाचतात ते कर्ज घेत नाहीत.’ यावरून आपण समजून घ्यावे. कर्जफेड वेळेत झाली नाही तर ही सर्व मालमत्ता जप्त केली जाते. नुसत्या अंगावरच्या कपड्यानिशी तुम्ही बाहेर पडू शकता एवढे तुम्ही लिहून दिलेले असते. हे लक्षात ठेवले पाहिजे. अशावेळी उद्योजक भावुक होतो आणि क्वचित नको तो निर्णय घेण्याची शक्यताही निर्माण होते. म्हणून शिस्त पाळली पाहिजे. कर्जाच्या पैशाने फक्त आणि फक्त उद्योग करणे क्रमप्राप्त आहे. तरच कर्जाचा लाभ होतो. कर्जफेडीची रचना व उत्पन्नाचे गणित व्यवस्थित बसले आहे की नाही हे उद्योजकाने तसेच कर्ज देणाऱ्या संस्थेनेही बघितले पाहिजे. कर्ज फेडायला नवे कर्ज घ्यायला लागणे ही धोक्याची घंटा होय.

कर्जफेड न झाल्यास कंपनीला अवसायनात (लिक्विडेशन) टाकले जाते. एक वेळेचे सामंजस्य (वन टाइम सेटलमेंट) म्हणजे नुसते मुद्दल भरून बाहेर पडता येते. दुसऱ्या बँकेकडून कमी व्याजदरात नवे कर्ज घेऊन जास्त व्याजदराचे कर्ज फेडण्याचाही पर्याय उद्योजकाकडे असतो. काही मंडळी यातून मार्ग काढण्यात तरबेज असतात. पण सर्वांनाच ते जमेल असे नाही. कर्जफेड वेळेत झाली नाही तर वसुलीसाठी कर्ज देणाऱ्या कंपन्या कठोर पावले टाकतात. बाजारातील उद्योजकाची पत संपवण्याचा धोका निर्माण होतो. या कंपन्यांचा तगादा व दबाव एवढा असतो की त्यामुळे उद्योजकावर प्रचंड मानसिक ताण येऊ शकतो. कर्जदाराच्या घरासमोर बँड वाजविणे असे प्रकारही यापूर्वी झाले आहेत. मालमत्ता सीलबंद करणे. बँकेतील खाती गोठवणे इत्यादी गोष्टींना समोर जावे लागते.

हेही वाचा…काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान

पण कंपनीची सगळी मालमत्ता जप्त झाली, उद्योजक शून्यावर आला तरी त्याने धीर सोडणे योग्य नव्हे. पुन:श्च हरिओमचा मंत्र लक्षात ठेवला पाहिजे व थोडे थांबून, विचार मंथन करून, सल्लामसलत करून पुन्हा नव्याने उभारणीला लागले पाहिजे. कारण कर्तृत्व हे उद्योजकात असते, ते पैशात नसते. उद्योग संपला तरी कर्तृत्व संपत नाही. तेव्हा उमेद जिवंत ठेवली पाहिजे.

हेही वाचा…मल्टिकॅप फंड : त्रिवेणी संगम…

कर्जाचे सर्व कंगोरे समजूनच ते घेतले पाहिजे. एवढे जरी असले तरी कर्ज घेण्याला घाबरून जाण्याची आवश्यकता नाही. धोके माहीत असले पाहिजेत हा या विवेचनाचा हेतू आहे. माझे मत हेच की, प्रामाणिकपणे उद्योग केला, पैसा इतरत्र वळवला नाही, आपल्या आवाक्यात राहून उद्योग केला (म्हणजे ओव्हरट्रेडिंग नाही केले) व नीट लक्ष दिले तर उद्योग नुकसानीत जाण्याची शक्यता फारच कमी आहे. मग कर्जफेड होणारच. म्हणून उद्योजक अर्थसाक्षर व सदैव जागृत राहणे क्रमप्राप्त आहे. असे केले तरच उद्योग फळतो.

(लेखक ज्येष्ठ यशस्वी उद्योजक आहेत)

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Businessman should understand loan its aspect and complexity print eco news psg