उत्तम कंपन्या, वेगाने प्रगती करतात. पण कंपनीची सर्वोत्तमता ही तिच्या कारभाऱ्याच्या उमदेपणावरही बेतलेली असते, हेही अनुभवसिद्ध सत्य आहे. कारभाऱ्याचा बहुतोल बाणाच त्याच्या कंपनीला बहुमोल बनवतो. कारभारी हा अर्थात एक चांगला संघनायकही असतो, त्याच्या हाताखालील नोकरशाहीला चांगले वळण लावून तो उत्तम कार्यसंस्कृतीची रुजवतो, हे गृहीतक आणि त्याची अनुभवसिद्धताही कोणाला नाकारता आलेली नाही.

अशाच कारभाऱ्यांच्या निवड-नियुक्तीची प्रक्रिया म्हणजे C-Suite Recruitment हा आपला आजचा ‘प्रतिशब्द’चाही विषय आहे. सहसा संस्थेतील उच्च-स्तरीय कार्यकारी पदावरील मोलकरी व्यक्तीचे वर्णन करण्यासाठी ‘सी-सूट’ या शब्दाचा वापर उद्यम जगतात रुळलेला आहे. त्यामुळे सी-सूट रिक्रुटमेंट म्हणजे कंपनीतील उच्चस्तरीय कारभाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया आहे.

यातील ‘सी’ या आद्याक्षरापासून सुरू होणारी पदे, जसे सीईओ (चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अर्थात मुख्य कार्यकारी अधिकारी), सीओओ (चीफ ऑफरेटिंग ऑफिसर – मुख्य परिचालन अधिकारी), सीएफओ (चीफ फायनान्शियल ऑफिसर – मुख्य वित्तीय अधिकारी), सीटीओ (चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर – मुख्य तंत्रज्ञान अधिकारी) वगैरेंच्या निवड-नियुक्तीला करण्याला ‘सी-सूट भरती’ म्हटले जाते. हे सारे कंपनीतील मुख्याधिकारी आणि कंपनीचे जे काही भले-बुरे होईल त्याचे श्रेय-अपश्रेयही त्यांनाच जाते.

कारभारी-कर्मचाऱ्यांना मिळणारा मोबदलादेखील त्यांच्या कामाची परिणामकारकता दर्शविणारा आवश्यक पैलू असतोच. तो नाकारून चालणारच नाही. जसे मोल तसे काम अथवा जसे वेतन तसे वर्तन हा व्यक्तीचा स्वभावविशेषच आहे. मजुरी जर हलकी असेल तर कामही हलकेच होणार! मात्र खाल्ल्या घरच्या भाकरीला जागलेच पाहिजे, या सांस्कृतिक पोषणांत वाढ झालेली आपली पिढी आहे. मानवत नसले तरी दिलेले काम जितके झेपेल तितके उरकत पेलावे, असाही प्रयत्न असतोच.

वेतनाबरोबरीनेच, संघनायक अर्थात वरिष्ठांचे वर्तन आणि एकंदर कार्यसंस्कृती हादेखील कर्मचाऱ्यांना सेवेत बांधून ठेवणारा आणि त्यांच्याकडून इच्छित परिणाम मिळविणारा महत्त्वाचा घटक आहे. याचे प्रमाण देणाऱ्या अनेक अभ्यास, पाहण्यांचे निष्कर्षदेखील आहेत. लोक कंपनीला, नव्हे तेथील वरिष्ठांना कंटाळून सोडून जातात, असे सर्वच पाहण्यांचे निरीक्षण आहे. उगीच अवघड, दुर्बोध अशी शब्दबंबाळ भाषणबाजी करून, कनिष्ठ सेवकांना घायाळ करणाऱ्या कथित स्मार्ट कारभाऱ्यापेक्षा, त्यांच्या कलाने आणि समजुतीनुसार संवाद राखणारा वरिष्ठ हा कर्मचाऱ्यांना अधिक जवळचा वाटत असतो.

जेथे संस्था-आस्थापना-उपक्रम आहेत, त्या रचनेत नोकरशाही हा एक न टाळता येणारा घटक आहे. सेवेत कर्मचारी वर्गाची उतरंड जेथे आहे, त्या सर्व संस्थांना नोकरशाही लागू होते. सरकारी प्रशासनाबद्दल म्हणाल तर तेथे सुप्रशिक्षित आणि सनदप्राप्त अधिकाऱ्यांची नोकरशाही असते. हे अधिकारी इनामदार असले तरी, ते इमानदार असतीलच याची खात्री नाही. मुळात सनदी अधिकारी म्हणून इनाम मिळवितानाच बेईमानी होत असल्याची जेथे उदाहरणे आहेत, तेथे आणखी कशाची अपेक्षा फोलच. मात्र इमानाचा हा मुद्दा खरे तर खासगी, राष्ट्रीय, बहुराष्ट्रीय संस्थांनाही सारखाच लागू पडतो. चांगले वेतनमान, लाभ, भत्ते आणि मरातब या बदल्यात वर्तन प्रामाणिकच असेल, अशी तेथेही खात्री नाही.

मुख्य कार्यकारी अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठी वापरात येणाऱ्या सी-सूटच्याच धर्तीवर उद्यम जगतात, ‘व्ही-सूट’ (व्हाइस प्रेसिडेंट – उपाध्यक्ष) आणि ‘डी-सूट’ (डायरेक्टर्स) अशी अधिकार-पदश्रेणीची रचना अस्तित्वात आहे. तथापि, सी स्तरीय मोलकरी हे सर्वाधिक वेतनमान असलेले, तसेच सर्वोच्च अधिकार असलेलेही असतात. तरीही आजच्या मंदावलेल्या जगात सर्वत्र दिसते त्याप्रमाणे काटकसर आणि कथित संघ-पुनर्रचना राबविताना, या बड्या मोलकरींवर नव्हे तर नोकऱ्यांवर पहिली कुऱ्हाड चालविली जाते ती तळच्या निम्नवेतनी कर्मचाऱ्यांवरच. कारण हे ठरविणारेदेखील ‘सी’ स्तरीय अधिकारीच असतात.

आठवड्याचे प्रतिशब्द (४ मार्च ते ७ मार्च २०२५)

Pink slip: पिंक स्लिप – नोकरी/ सेवा समाप्तीचे फर्मान

layoffs: ले-ऑफ – नोकरकपात

Attrition: अट्रिशन – निवृत्ती अथवा नोकरी सोडून गेल्यानंतर रिक्त पद

Campus Placement: कॅम्पस प्लेसमेंट – नव-पदवीधरांची (थेट महाविद्यालयांतून होणारी) भरती Talent Pool: टॅलेंट पूल – प्रतिभा-कोष (भविष्यात सेवेत सामावल्या जाणाऱ्या संभाव्य उमेदवारांचा संच)

Story img Loader