माझ्या एका मित्राला काम करायचा भरपूर कंटाळा आला. मागच्या महिन्यात सहज गप्पा मारता मारता मला म्हणाला, टार्गेट, ऑफिसमधील राजकारण, अधिकाऱ्यांची नाराजी, रोजची प्रवासाची दगदग… नको वाटतंय आता हे सगळं. मागील २० वर्षं हेच करतोय. मासिक पैसे आणि वार्षिक ‘बोनस’ मिळतो म्हणून प्रत्येक वर्षी नवीन शर्यत सुरू होते. पगाराबरोबर गरजापण खूप वाढवून ठेवल्या आहेत. पण आता वाटतंय, हे सगळं बंद करून थोडं निवांत आयुष्य जगावं. तशी काही निवृत्ती घ्यायची असं नाही म्हणत मी, पण जरा डोकं लावून शेअर बाजारातून पैसे कमवायचा विचार करतोय. माझ्या आजवर तयार केलेल्या पोर्टफोलिओमध्ये छान परतावा मिळाला आहे. तर मग मासिक मिळकतसुद्धा तिथून कमावणं नक्की शक्य होईल, असं मला वाटतं. अभ्यास करायची माझी तयारी आहे. तुला माझ्या या योजनेबद्दल काय वाटतं?
मी त्याला म्हटलं – अरे शेअर बाजारातून कमाई तू नक्की करू शकशील यात शंका नाही. फक्त त्याआधी मुळात तुला मासिक किती पैसे लागतात आणि वार्षिक किती पैसे लागतात याचा अंदाज काढला आहेस का?
त्यावर तो म्हणाला – हो हो! हे गणित मी ३ महिन्यांपूर्वी मांडून ठेवलं आहे. आमचा साधारणपणे घरखर्च २ लाख रुपये इतका येतो. वार्षिक खर्च ५ ते ७ लाख रुपये इतका असतो. तर साधारणपणे ३० लाख मला कमावता आले की, बस झालं. मुलाच्या संपूर्ण शिक्षणाचे पैसे मी उभे केलेले आहेत. त्याच्या लग्नाचं तो बघेल. बाकी जे काही आहे ते माझ्या आणि बायकोसाठी म्हणून राहील. ते पैसे वाढीला राहतील पुढे १५ वर्षं. त्यांना मी हात नाही लावणार. घर घेऊन झालंय. तेव्हा इतर कुठला मोठा खर्च आता तरी मला दिसत नाही.
त्याने चांगलीच आकडेमोड करून ठेवली होती. तेव्हा आता त्याला दरमहा २ लाख रुपये कसे मिळतील याचं गणित बसवायचं होतं. त्यावर त्याला मी खालील गोष्टी सांगितल्या:
१. शेअर बाजारातून कमाई करताना ‘डे-ट्रेडिंग’, लाभांश, वायदे बाजार, कमॉडिटी या सर्व प्रकारांमधून करता येते.
२. काही पैसे हे शॉर्ट टर्म (३-६ महिने) गुंतवून त्यातूनसुद्धा नफा मिळवता येऊ शकतो.
३. हे सर्व करण्यासाठी पैसे आधी बाजूला काढायला हवे. साधारणपणे जर बाजारातील अपेक्षित वार्षिक परतावा १२ टक्के असेल. तर मासिक परतावा १ टक्का गृहीत धरून २ लाख प्रत्येक महिन्याला मिळवायला २ कोटी रुपयांचा पोर्टफोलिओ लागेल किंवा डे-ट्रेडिंग, वायदे बाजारातून दर दिवशी किमान १५,००० ते २०,००० रुपयांचे लक्ष्य ठेवून त्यानुसार काय शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार करायचे हे रोज ठरवावं लागेल.
४. साधारणपणे २०० ट्रेडिंग दिवस वर्षात असतात ३० लाख वर्षभरात कमवायचे तर रोज निश्चित केलेल्या लक्ष्याप्रमाणे बाजारातून पैसे कमवावे लागतील किंवा ठरावीक दिवशी जास्त कमाई कशी करता येईल यासाठी चांगलाच अभ्यास करावा लागेल. कोणत्या कंपन्यांचे शेअर, ईटीएफ, वायदे बाजार कसे काम करतात, त्यांच्या किमतीमध्ये कधी आणि किती फरक पडतो, कोणत्या वेळी खरेदी करायचे आणि कधी विकायचे हे सर्व आधी नीट ठरवावं लागतं. त्यासाठी आदल्या दिवशी तयारी करायला लागते.
५. मुळात बाजाराची दिशा कोणती असेल त्यावर फायदा-तोटा ठरतो. त्यासाठी सखोल अभ्यास लागतो. देशांतर्गत आणि देशाबाहेरील परिस्थितीचा आढावा, अर्थव्यवस्थेतील अपेक्षित आणि अनपेक्षित बदल, कंपनीसंदर्भातील काही माहिती, कंपन्यांचे त्रैमासिक आणि वार्षिक निकाल, रिझर्व्ह बँकेची धोरणं, यांचा चांगला अभ्यास करावा लागतो.
६. प्रत्येक दिवशीचा नफा कमवायची ‘स्ट्रॅटेजी’ ठरवली आणि नफा मिळाला असं होत नसतं. एखादा दिवस अपेक्षेपेक्षा चांगला नफा देऊन जातो तर एखाद्या दिवशी अनपेक्षित नुकसान सहन करावं लागतं. तेव्हा ट्रेडिंग करताना ‘स्टॉप लॉस’ लावल्याशिवाय काम करायचं नाही. एक ‘डे ट्रेडर’ आणि एक गुंतवणूकदार म्हणून स्वतःला वेगळं ठेवावं लागतं.
७. तेजीच्या बाजारामध्ये बऱ्यापैकी यश मिळवता येतं. मात्र पडत्या बाजारात कमाई करायला खूप मेहनत घ्यावी लागते. मागील परतावे बघून पुढेपण असेच मिळतील ही अपेक्षा करणं चुकीचं ठरेल. प्रत्येक दिवस वेगळा, तेव्हा मिळेल तशा परिस्थितीत फायदा कसा काढायचा याचा निर्णय त्वरित घ्यावा लागतो.
८. मुळात सुरुवात करताना थोड्या पैशांनी करावी. आपल्याला नक्की काय आणि किती जमतंय हे नीट समजलं की, मग हळू हळू रक्कम वाढवावी. वायदे बाजाराच्या बाबतीत तर खूप जास्त खबरदारी घ्यावी लागते. जरी व्यवहार करण्यासाठी मार्जिन कमी लागत असली तरीसुद्धा किमतीतील थोड्या फरकानेसुद्धा मोठा फटका बसू शकतो. हे प्रकार खूप क्लिष्ट असतात. तेव्हा यांच्यातून पैसे मिळवताना खूपच जास्त खबरदारी घ्यावी लागते.
९. सकाळी ९ ते ३:३० दरम्यान शिस्तीत काम करावं लागतं. जेवढं जास्त ‘ट्रेडिंग’ कराल तेवढं जास्त लक्ष्य बाजारातील घडामोडींकडे ठेवावं लागतं. इतर उद्योगांना या वेळात पूर्णपणे बाजूला ठेवावं लागतं.
१०. या गोष्टीचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतोय याकडेसुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. दिवसाचे अनेक तास एकाच ठिकाणी बसल्यामुळे आणि सतत बाजारावर लक्ष ठेवल्यामुळे मानसिक ताण येतो. प्रत्येक दिवसाची कामगिरी मग ती चांगली असो की वाईट त्याच दिवसाबरोबर संपवून दुसरा दिवस सुरू करायचा असतो. तेव्हा ही कामं करताना आपल्या भावनांवर प्रचंड नियंत्रण लागतं.
११. मुळात आपण रोज ‘ट्रेडिंग’ करू शकणार आहोत का हे नीट समजून त्यानुसार कमाईचे लक्ष्य निश्चित करावं. सणवार, भटकंती, आजारपण, इत्यादी गोष्टींमुळे आपल्या कामामध्ये व्यत्यय येऊ शकतो. तेव्हा ‘मार्जिन ऑफ सेफ्टी’ ठेवून त्यानुसार ‘ट्रेडिंग स्ट्रॅटेजी’ ठरवाव्यात.
१२. या सर्व गोष्टी करण्यासाठी भरपूर वाचन आणि सराव असावा लागतो. तेव्हा बाजार बंद झाल्यावर दुकान बंद नाही होत. कुठे कोणती माहिती मिळते, कधी मिळते आणि त्यानुसार काय करायला हवं, हे सर्व दुपारी ३:३० नंतरचे उद्योग असतात.
१३. मोह आणि भीती यांसारख्या भावना नीट समजून मग आपल्याला या क्षेत्रात उतरावं लागतं. अति मोहापायी होत्याचं नव्हतं होतं आणि अति भीतीमुळे फायदा कमी आणि मनस्ताप जास्त होऊ शकतो. तेव्हा स्वतःची क्षमता ओळखून व्यवहार सांभाळलेले बरे.
१४. आपण कितीही हुशार असलो तरीसुद्धा शेअर बाजार हा आपल्यापेक्षा हुशार असतो. त्याला प्रत्येक वेळी मात देऊन नियमितपणे फायदा करून घेणं अजिबात सोप्पं काम नाहीये. वॉरन बफे, पीटर लिंच, राकेश झुनझुनवाला ही नावं आज आपण ऐकतो, त्यांनी खूप विचार, अभ्यास आणि मेहनत केली आहे. तीसुद्धा अनेक वर्षं आणि प्रत्येक वर्षागणिक चांगली कामगिरी करणं हे सर्वांनाच जमत नाही. तेव्हा आपल्या मर्यादा ओळखून प्रयत्न करावे.
हे सर्व ऐकून माझा मित्र चांगलाच विचारात पडला. त्याला वाटलं होतं की, नोकरी सोडली की ऑफिसचे ‘टार्गेट’पण सुटेल. पण इथे तर प्रत्येक दिवशी त्याला स्वतःच्या रोजी-रोटीसाठी हात आणि डोकं वापरायला लागणार होतं. शिवाय ऑफिसमध्ये इतर कर्मचाऱ्यांबरोबर जरा गप्पाटप्पा केल्याने बरं वाटतं. परंतु घरात बसून एकटयाने फक्त ‘ट्रेडिंग’ करणं हे सोप्पं नाहीये. मनाची चांगलीच तयारी करून मग यावर निर्णय घेतो, असं म्हणून तो निघून गेला. पण मला मात्र लेख लिहिण्यासाठी एक चांगला विषय देऊन गेला.
सर्व वाचकांना नवीन आर्थिक वर्षाच्या अनेक शुभेच्छा.
© The Indian Express (P) Ltd