-प्रवीण देशपांडे
२०२४-२५ हे आर्थिक वर्ष आणि २०२५-२६ हे कर निर्धारण वर्ष १ एप्रिल, २०२४ रोजी सुरू झाले. अर्थसंकल्पात सुचविलेले बदल साधारणतः १ एप्रिलपासून लागू होतात. परंतु या वर्षीच्या हंगामी अर्थसंकल्पात प्राप्तिकर कायद्यात कोणतीही सुधारणा न केल्यामुळे मागील वर्षातील नियम सध्या तरी लागू आहेत. जेव्हा संपूर्ण अर्थसंकल्प निवडणूक निकालानंतर सादर होईल, त्यात प्राप्तिकर कायद्यात सुधारणा होऊ शकतात. या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला पात्र करदात्यांना आपला उद्गम कर (टीडीएस) कापला जाऊ नये असे वाटत असेल तर त्यांनी उद्गम कर कापणाऱ्याला १५ जी किंवा १५ एच फॉर्म याच महिन्यात सादर करावा जेणेकरून त्यांचा उद्गम कर कापला जाणार नाही. नोकरदार करदात्यांनी आपल्या मालकाला, स्वीकारलेली कर प्रणाली आणि इतर उत्पन्न आणि गुंतवणुकीचे घोषणापत्र याच महिन्यात द्यावे म्हणजे त्यानुसार त्यांच्या पगारातून उद्गम कर कापला जाईल.
प्रश्न : मी शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपनीचे समभाग खासगीरीत्या (शेअरबाजाराबाहेर) मित्राला ३ लाख रुपयांना (त्या दिवशीच्या बाजारभावाला) विकले. हे समभाग मी जुलै, २०१४ मध्ये ३५,००० रुपयांना खरेदी केले होते. मी यावर होणारा भांडवली नफा कसा गणावा आणि त्यावर मला किती कर भरावा लागेल?
-रमेश शिंदे
उत्तर : शेअर बाजारात सूचिबद्ध असलेल्या कंपनीचे समभाग शेअरबाजारामार्फत विकल्यास कलम ११२ एनुसार सवलतीच्या दरात कर भरण्याच्या तरतुदी लागू होतात. हे कलम समभाग खासगीरीत्या (शेअर बाजाराबाहेर), म्हणजेच ज्यावर सिक्युरिटीज व्यवहारकर (एसटीटी) न भरता, विकल्यास लागू होत नाही. शेअर बाजारात सूचिबद्ध असलेले समभाग खासगीरीत्या विकल्यामुळे आपण यावर महागाई निर्देशांकाचा फायदा न घेता १० टक्के किंवा महागाई निर्देशांकाचा फायदा घेऊन २० टक्के इतक्या दराने कर भरू शकता. जो पर्याय आपल्याला फायदेशीर आहे, तो तुम्ही निवडू शकता. यानुसार महागाई निर्देशांकाचा फायदा न घेता भांडवली नफा २,६५,००० रुपये (३ लाख वजा ३५,००० रुपये) यावर १० टक्के कर म्हणजे २६,५०० रुपये (अधिक आरोग्य आणि शैक्षणिक कर). दुसरा पर्याय महागाई निर्देशांकाचा फायदा घेऊन भांडवली नफा २,४९,२५० रुपये (३ लाख वजा ५०,७५० महागाई निर्देशांकाचानुसार खरेदी मूल्य) इतक्या नफ्यावर २० टक्के कर ४९,८५० रुपये (अधिक आरोग्य आणि शैक्षणिक कर) हे दोन पर्याय आहेत. त्यापैकी आपल्याला महागाई निर्देशांकाचा फायदा न घेता १० टक्के कर भरण्याचा पर्याय फायदेशीर आहे.
हेही वाचा…Money Mantra: डिजिटल इन्शुरन्स पॉलिसी म्हणजे काय? ती कशी काढावी?
प्रश्न : माझ्याकडे दोन घरे आहेत. एक राहते घर आणि दुसरे घर मी भाड्याने दिले आहे. मला दरमहा ४०,००० रुपये भाडे मिळते. दोन्ही घरांच्या खरेदीसाठी मी गृहकर्ज घेतले आहे. या दोन्ही गृहकर्जावरील व्याजाची वजावट उत्पन्नातून मला घेता येईल का? याला काही मर्यादा आहे का? मी नवीन करप्रणाली स्वीकारल्यास मला किती वजावट मिळेल?
-शंकर कानविंदे
उत्तर : आपल्याला दोन्ही गृहकर्जांच्या व्याजाची वजावट उत्पन्नातून घेता येईल. जे आपले राहते घर आहे त्यासाठी आपल्याला २ लाख रुपयांपर्यंत वजावट घेता येईल (३१ मार्च, १९९९ पूर्वी घेतलेल्या कर्जासाठी ही मर्यादा ३०,००० रुपये इतकी आहे). जे दुसरे घर आपण भाड्याने दिले आहे, त्या घराच्या गृहकर्जावरील व्याजाच्या वजावटीवर कोणतीही मर्यादा नाही. परंतु दोन्ही घरासाठी “घरभाडे उत्पन्न” या स्रोतातील तोटा २ लाख रुपयांपेक्षा जास्त असेल तर फक्त २ लाख रुपयांचा तोटा आपल्याला इतर उत्पन्नातून वजा करता येईल आणि बाकी शिल्लक तोटा पुढील वर्षासाठी कॅरी-फॉरवर्ड करावा लागेल. ही तरतूद आपण जुनी करप्रणाली निवडल्यास लागू असेल. आपण नवीन करप्रणाली स्वीकारल्यास आपल्याला राहत्या घरासाठी घेतलेल्या गृहकर्जावरील व्याजाची वजावट घेता येणार नाही. जे घर भाड्याने दिले आहे त्याच्या गृहकर्जावरील व्याजाची वजावट आपल्याला घेता येईल. परंतु या व्याजाची वजावट घेतल्यानंतर “घरभाडे उत्पन्न” या स्रोतात तोटा येत असेल तर तो इतर उत्पन्नातून वजा करता येणार नाही, तसेच पुढील वर्षासाठी कॅरी-फॉरवर्डसुद्धा करता येणार नाही.
प्रश्न : मी नवीन घर विकत घेण्यासाठी माझ्या मित्राकडून कर्ज घेतले आहे. मला या कर्जाच्या मुद्दल परतफेड आणि व्याजाची वजावट उत्पन्नातून घेता येईल का?
-एक वाचक
उत्तर : घर खरेदी करण्यासाठी घेतलेल्या कर्जावरील व्याजाची वजावट कलम २४ नुसार घेता येते. यासाठी ज्या व्यक्तीकडून कर्ज घेतले आहे, त्याच्याकडून व्याजाचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. असे प्रमाणपत्र घेतल्यास गृहकर्जावरील व्याजाची वजावट घेता येते. कलम ८० सीनुसार फक्त ठरावीक बँक किंवा संस्थांकडून घेतलेल्या कर्जाच्या मुद्दल परतफेडीची वजावट उत्पन्नातून घेता येते. त्यामुळे मुद्दल परतफेडीची वजावट आपल्याला घेता येणार नाही.
हेही वाचा…बाजार रंग : पोर्टफोलिओचा डाव मांडताना….
प्रश्न : माझे वय ७० वर्षे आहे. मला व्याजाचे ४,००,००० रुपये वार्षिक उत्पन्न मिळते. मला सोन्याच्या विक्रीतून ३ लाख रुपयांचा दीर्घ मुदतीचा भांडवली नफा झाला आहे. मी कर बचतीच्या कोणत्याही गुंतवणुका केल्या नाहीत. मला कोणती कर प्रणाली फायदेशीर आहे? मला किती कर भरावा लागेल?
-प्रताप देसाई
उत्तर : जुनी करप्रणाली निवडल्यास, आपण ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ३ लाख रुपये इतकी आहे. व्याजाचे करपात्र उत्पन्न ३,५०,००० रुपये (४,००,००० आणि यातून कलम ८० टीटीबीनुसार ५०,००० रुपयांची वजावट) आहे. या उत्पन्नावर ५ टक्के कर (म्हणजेच २,५०० रुपये) भरावा लागेल आणि ३ लाख रुपयांच्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर २० टक्के इतका म्हणजे ६०,००० रुपये असा एकूण ६२,५०० रुपये (अधिक ४% आरोग्य आणि शैक्षणिक कर) भरावा लागेल. आपण नवीन करप्रणाली स्वीकारल्यास कमाल करमुक्त उत्पन्नाची मर्यादा ३ लाख रुपये इतकी असेल. व्याजाचे करपात्र उत्पन्न ४,००,००० रुपये आहे (यातून कलम ८० टीटीबीनुसार ५०,००० रुपयांची वजावट मिळणार नाही) या उत्पन्नावर १० टक्के कर (म्हणजेच ५,००० रुपये) भरावा लागेल आणि ३ लाख रुपयांच्या दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यावर २० टक्के इतका म्हणजे ६०,००० रुपये असा एकूण ६५,५०० रुपये कर भरावा लागेल. नवीन करप्रणालीनुसार एकूण उत्पन्न ७ लाख रुपये असल्यामुळे आपल्याला २५,००० रुपयांची कलम ८७ ए नुसार करातून वजावट घेता येईल आणि आपल्याला ४०,००० रुपये (अधिक ४ टक्के आरोग्य आणि शैक्षणिक कर) इतका कर भरावा लागेल. त्यामुळे आपल्याल नवीन करप्रणाली फायदेशीर आहे.
लेखक मुंबईस्थित सनदी लेखापाल आहेत.
pravindeshpande1966@gmail.com