एक दिवस मला एका बाईने फोन केला. मला म्हणाल्या – मॅडम, मी ७० वर्षांची आहे. माझे पैसे मी म्युच्युअल फंडात गुंतवले आहेत. आता मला माझ्या घरासाठी ते हवे आहेत. पण मला ते काढता येत नाही. तुम्ही माझी मदत कराल का? त्यांचं एवढं म्हणणं ऐकून मला वाटलं की, कदाचित त्यांना रिडेम्पशन फॉर्म भरता येत नसेल किंवा कुठे तो द्यायचा हे माहीत नसेल. तर मी त्यांना म्हणाले – काकू, तुम्ही ज्याच्याकडून पैसे गुंतवताना फॉर्म भरला होता त्याच्याकडून हे काम करून घ्या. त्यावर त्यांनी मला जे सांगितलं ते ऐकून मला धक्काच बसला. त्या म्हणाल्या – अहो काय सांगू तुम्हाला, ज्या लोकांनी ही गुंतवणूक करायला मदत केली होती, ते मला पैसे काढू नका म्हणून सांगत आहेत. माझ्या घरात डागडुजीसाठी मला मोठी रक्कम हवी आहे, पण हे लोक मला गुंतवणुकीतून बाहेर पडायला देत नाहीयेत. मी ३-४ वेळा त्यांच्या कार्यालयात जाऊन आले. प्रत्येक वेळी त्यांनी मला काही ना काही कारण देऊन परत पाठवलं. घरात मी आणि माझे ८० वर्षांचे यजमान. फार धावपळ नाही करता येत आम्हाला. घरात अजून कोणी नाही ज्याला हे काम करायला सांगू शकेन. मला कळत नाहीये की, मी माझे अडकलेले पैसे कसे काढून घेऊ? त्यांना ऑनलाइन व्यवहार करता येत नसल्यामुळे मी त्यांना त्यांच्या म्युच्युअल फंडाच्या कार्यकारी व्यक्तीचा नंबर दिला आणि त्यांच्याकडून ते काम करून घ्यायला सांगितलं. या बाईंच्या बाबतीत जे घडलं ते अतिशय चुकीचं होतं. त्यांचा गैरफायदा घेतला जात होता आणि गरज असून त्यांचा पैसा त्यांनाच मिळत नव्हता.

अजून एक किस्सा सांगते, माझ्याकडे एकदा एक काकू आल्या. काही वर्षांपूर्वी त्यांना एक महागडी आणि अयोग्य विमा योजना कोणीतरी विकली होती. त्यांनी ३-४ वर्षं विम्याचे मोठे हप्ते (प्रीमियम) भरल्यावर त्यांच्या लक्षात आलं की, ही योजना त्यांच्या उपयोगाची नाही आणि मुळात त्यांना ती परवडत पण नव्हती. काकू वयस्कर होत्या. विमा योजना बंद करायला गेल्या तर तिथल्या एका अधिकारी व्यक्तीने त्यांना पुन्हा दुसरी विमा योजना घ्या तर पहिलीचे पैसे मिळतील असं सांगितलं. काकूंची खूप मोठी रक्कम अडकली होती, शेवटी नाईलाज म्हणून त्यांनी पुन्हा एक मोठा हप्ता असलेली योजना विकत घेतली आणि एका वर्षाने ती बंद केली. आता हा प्रकारदेखील किती वाईट आहे. आपलेच पैसे मिळवायला परत आपणच भरपूर दंड भरल्यासारखं झालं.

china biggest dam in the world
चीनमधील ‘या’ अवाढव्य धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला? धरणाचा नेमका परिणाम काय होतोय?
Amitabh Bachchan And Rajesh Khanna
“आम्ही अमिताभ बच्चन यांना आणून राजेश खन्नाचे करिअर…
Pune Samadhan Chowk viral Video
Pune City Post Office viral Video: “अख्खा ट्रक बघता बघता…”, सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्री लक्ष्य; म्हणाल्या, ‘हीच का स्मार्ट सिटी’
PM Narendra Modi US visit, Narendra Modi US,
अमेरिकेने भारताला ‘गिऱ्हाईक’ समजू नये…
tupperware
डबे, बाटल्या तयार करणारी लोकप्रिय ‘टपरवेअर’ कंपनी झाली दिवाळखोर; कारण काय? या कंपनीचे नक्की काय चुकले?
Why Atishi was AAP choice to Delhi CM
Atishi Marlena Delhi New CM: केजरीवाल यांनी आतिशी मार्लेना यांनाच मुख्यमंत्री पद का दिले? ‘आप’ची मोठी खेळी
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा >>>बाजार रंग : बाजाराचा उत्साह टिकेल का?

एका विधवा स्त्रीच्या बाबतीत घडलेला किस्सा तर अजून दुर्दैवी होता. तिच्या नवऱ्याने मुदत विमा काढला होता. तो वारल्यानंतर तिच्या सासरच्या लोकांनी ती विमा योजना तिच्या हातात येऊ दिली नाही. त्या स्त्रीला इतर कोणत्या प्रकारे ‘क्लेम’ करता येऊ शकतो हे माहीत नसल्याने तिला तिचे पैसे मिळवायला खूप त्रास झाला.

या प्रकारांना आर्थिक गुंडगिरी म्हटलं जातं. असे अनेक किस्से आपण आपल्या ओळखीच्या लोकांकडून ऐकतो. ३१ मार्चला बँकेच्या खात्यातून पैसे काढता न येणं, आई-वडील गेल्यानंतर त्यांच्या गुंतवणुकीवर नाव चढवताना अनेक वेळी वेगवेगळे कागदपत्र मागणं आणि कार्यालयात सारख्या फेऱ्या मारायला लागणं, विमा योजना रद्द करताना कोणताही आधार ना मिळणं, बँकेत लॉकर हवा असेल तर इतर कोणती तरी गुंतवणूक करणं, शेअर डिमॅट करताना किंवा आयईपीएफकडून परत मिळवताना लाच द्यावी लागणं हे सर्व आर्थिक गुंडगिरीचे प्रकार आहेत. अनेकदा इथे वरिष्ठ नागरिक, महिला आणि अनिवासी भारतीय गुंतवणूकदारांना त्रास दिला जातो. त्यातसुद्धा ज्यांना ऑनलाइन व्यवहार करता येत नाही, किंवा ज्याच्याकडे वेळ आणि योग्य माहिती नसते त्यांच्या बाबतीत असे किस्से जास्त झाल्याचे लक्षात येतात.

अशा वेळी जर एखादा गुंतवणूकदर कोणत्या अनधिकृत व्यक्ती किंवा संस्थेकडून सेवा घेत असेल तर तिथे त्याच्या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या पैशांना जास्त धोका असतो आणि फसवणूक होऊ शकते. परंतु काही वेळा तर अधिकृत व्यक्ती किंवा संस्थांकडून जसे की, बँक, विमा वितरक (एजंट) किंवा सल्लागार, अशांकडूनसुद्धा आर्थिक गुंडगिरी होऊ शकते याची जाणीवसुद्धा प्रत्येक गुंतवणूकदाराने ठेवली पाहिजे. कुटुंबातील सदस्यसुद्धा असं करू शकतात हे वर दिलेल्या एका घटनेतून लक्षात आलाच असेल. जो कोणी आपले पैसे मिळवताना अयोग्य किंवा अनधिकृत अडथळे आणतो तो आपल्यासाठी योग्य नाही. आणि अशा व्यक्तीविरुद्ध कोणती कार्यवाही करता येऊ शकते हे गुंतवणूक करण्यापूर्वी जर माहीत करून घेतलं तर आपण आपलं नुकसान होण्यापासून वाचू शकतो. शिवाय एक वारसदार म्हणूनसुद्धा आपले कोणते हक्क आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे. जिथे एकत्रित गुंतवणूक असेल किंवा नामनिर्देशन असेल तिथेसुद्धा कोणती खबरदारी घ्यायला हवी हेसुद्धा प्रत्येक गुंतवणूकदाराला माहिती असायला हवं.

हेही वाचा >>>बाजारातली माणसं : वेगळ्या विचारांचा शेअर दलाल- राधाकिशन दमाणी

आजच्या लेखातून मी काही टिप्स देत आहे जेणेकरून गुंतवणूकदाराला स्वतःच्या गुंतवणुकीची सुलभता सांभाळता येईल.

१. गुंतवणूक इतरांच्या नावाने करताना खबरदार राहावं. ज्याचं नाव तो मालक आणि मग तो त्याच्या मालकीचा हवा तसा उपयोग करू शकतो हे नेहमीच ध्यानात ठेवा.

२. गुंतवणूक करण्यापूर्वी, त्यातून हवे तेव्हा पैसे काढता येतील का, काढताना कोणते अर्ज (फॉर्म) भरावे लागतील, किती दिवसांत कुठल्या खात्यात पैसे जमा होतील, किती दिवस लागतील, कोणते शुल्क आहे का? असे प्रश्न नक्की विचारावेत आणि शक्य होत असेल तर या संदर्भातील नियम कुठे लिहिले आहेत हे तपासावे.

३. आपला ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबर गुंतवणुकीमध्ये दिसतोय की नाही हे नीट बघून घ्या. दुसऱ्याचा ई-मेल आयडी किंवा मोबाइल नंबर वापरू नका.

४. ऑनलाइन व्यवहार करायला शिका. योग्य खबरदारी घेतली की नुकसान शक्यतो होत नाही आणि खबरदारी घेऊनसुद्धा नुकसान झाले तर त्या संदर्भात तक्रार करता येते.

५. आपली केवायसी अद्ययावत ठेवा. जर पत्ता (रेसिडेन्शिअल स्टेटस), मोबाइल नंबर, ई-मेल आयडी बदलला असेल तर वेळेवर केवायसी बदलून घ्या.

६. बँक खातं (अकाऊंट) बदललं असल्यास तातडीने प्रत्येक गुंतवणुकीत ते नोंदवून घ्या.

७. वयानुसार आपली सही बदलत असते. तेव्हा वेळोवेळी तुमचं पॅन कार्ड, फोटो आणि सहीसाठी अद्ययावत करून घ्या. खासकरून जे लोक ऑनलाइन व्यवहार करत नाहीत त्यांच्यासाठी हे महत्त्वाचं आहे.

८. एक गुंतवणूकदार म्हणून तुमचे हक्क समजून घ्या. तक्रार निवारण कुठे, कधी आणि कशी करता येईल हे जाणून घ्या. प्रत्येक नोंदणीकृत व्यक्ती आणि संस्थेला तक्रार निवारणासंबंधीचे नियम पाळावे लागतात. जर वेळेत तक्रार निवारण झाले नाही किंवा योग्य निवारण झाले नाही तर पुढे कोणत्या नियामक संस्थेकडे दाद मागायला हवी आणि तेसुद्धा किती अवधीमध्ये हे वेळीच माहीत असल्यास तक्रार कालबाह्य होत नाही.

९. वरिष्ठ नागरिक खासकरून ज्यांची मुलं परदेशात स्थायिक आहेत, त्यांच्यासाठी एक विश्वासू व्यक्ती नेमण्याची आवश्यकता आहे. अशा व्यक्तींच्या नावे कुलमुखत्यारपत्र (ज्यात हस्तांतरणाचे अधिकार नसतील) करून ठेवल्याने गुंतवणुकीसंदर्भातील व्यवहार करणे शक्य होते.

१०. बँकिंग, लोकपाल, विमा भरोसा प्रणाली, सेबी स्कोर्स, स्मार्ट ओडीआर, कंपनी लॉ बोर्ड, ग्राहक मंच, दिवाणी न्यायालय – या ठिकाणी वेळीच तक्रार अर्ज भरून गुंतवणूकदाराला पुढे त्याचा पाठपुरावा करावा लागतो. इथे वेळ, पैसे आणि संयम तिन्ही गोष्टी लागतात. तेव्हा शक्यतो पैसे बुडणार किंवा अडकणार नाहीत याची काळजी घ्या.

तुमच्या पैशांवर तुमचा हक्क आहे, आणि तुम्हाला हवं तेव्हा तो बजावता आला पाहिजे. यासाठी सुलभता हवीच. आपण योग्य चौकशी करून, नीट वाचून, काय चुकू शकतं याचा अंदाज बांधून जेव्हा व्यवहार करतो, तेव्हा फसगत होण्याचे प्रकार टळू शकतात. मात्र फसगत झालीच तर त्यावर काय उपाय करता येतात हे माहीत असल्यास अजून चांगलं. मुळात सगळी रक्कम किंवा खूप मोठी रक्कम एकाच व्यक्ती किंवा संस्थेच्या अधिकाराखाली असेल तर हा धोका जास्त उद्भवतो. म्हणून वेळोवेळी आपली मालमत्ता किंवा गुंतवणूक सुरक्षित आहे का हे तपासणं प्रत्येक सुजाण गुंतवणूकदाराची जबाबदारी आहे.

तृप्ती राणे

trupti_vrane@yahoo.com

प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.