डॉ.आशीष थत्ते

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

(फ्युचर्स आणि ऑप्शन्स मार्केट) (भाग १)

गेल्या आठवड्यात बोलताना भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच यांनी सामान्य लोकांच्या वायदे बाजाराकडे (एफ ॲण्ड ओ) वाढत्या स्वारस्याकडे बघून आश्चर्य व्यक्त केले. त्यांच्या मते, यामध्ये अपयश येण्याची शक्यता जास्त असते आणि त्यामुळे याकडे सामान्य गुंतवणूकदारांचा वाढता ओढा गोंधळात टाकणारा आहे. वायदे बाजारात मुख्यत्वेकरून जे सराईत व्यापारी आहेत तेच जास्त यशस्वी होतात. ज्यांची संख्या फक्त १० टक्के असून उर्वरित सुमारे ९० टक्के पैसे गमावतातच. तरीही सामान्य गुंतवणूकदार याकडे आकर्षित होत आहे. तर चला हा वायदा बाजार नेमका कसा आहे? आणि यातील नेमके धोके काय आहेत ते समजून घेऊ या.

प्रत्येकालाच वाटते की, आपण कमीत कमी गुंतवणुकीतून भरपूर नफा कमवावा. याचे कारण म्हणजे त्यांच्याकडील भांडवल कमी असते. मग जर थेट शेअर बाजारात (कॅश सेंगमेंट) गुंतवणूक केली तर बरेच पैसे गुंतून राहतात. समभागांच्या किमतीत वाढ किंवा घसरण होईपर्यंत थांबावे लागते. शिवाय यात बाजारातील अनिश्चिततासुद्धा ओघाने आलीच. म्हणून यावर उपाय म्हणून वायदे बाजार (डेरिव्हेटिव्ह मार्केट) अशी संकल्पना आणली. डेरिव्हेटिव्ह म्हणजे वित्तीय करार जो पूर्णपणे औपचारिक असतो. कल्पना करा की, तुम्ही मकाऊमध्ये कॅसिनोत अमेरिकन रूलेट (एक प्रकारचा जुगाराचा खेळ) खेळत आहात आणि पुढील नंबर काय येणार याचा तुम्हाला अंदाज आहे. मग अर्थातच तुम्ही सगळे पैसे लावून बराच नफा कमाऊ शकता. असेच शेअर बाजारातील ठरावीक कंपनीच्या समभागांच्या किमतीसंदर्भात किंवा निर्देशांकातील चढ-उतारासंबंधित तुम्हाला अंदाज असेल तर त्यानुसार योजना (स्ट्रॅटेजी) आखून तुम्ही पैसे लावू शकता. या दोन्ही उदाहरणांवरून तुम्हाला लक्षात येईल की, हे पूर्णपणे सट्टा लावण्यासारखेच आहे. काही वस्तूंमध्ये (अन्नधान्य, चलन वगैरे) किंवा मोठ्या उलाढालींमध्ये निधी रक्षणासाठी ‘हेजिंग’ केले जाते.

जो नवीन गुंतवणूकदार बाजारात उतरतो त्याला बऱ्याच वेळेला वायदे बाजारात व्यवहार करण्याचा सल्ला दिला जातो. कारण तिथे कमीत कमी भांडवलामध्ये मोठे व्यवहार करण्याची मुभा असते. म्हणजे जर फायदा झाला तर मोठा होईल आणि नुकसान झाले तर ते जास्त मोठे नसेल. मात्र या व्यवहारांची पूर्ण माहिती गुंतवणूकदाराला नसल्याने जास्त जोखीम असते. नवीन गुंतवणूकदाराला तो भविष्यातील भावावर सट्टा लावतो आहे याबाबत काळात नाही. त्यापेक्षा कॅश सेंगमेंटच्या माध्यमातून समभाग खरेदी करून दीर्घ कालावधीसाठी जर ठेवले आणि वेळोवेळी कंपनीच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यास त्याचे चांगले फायदे मिळतात. बुच यांनी भांडवली बाजार नियामकांच्या अलीकडील शोध व निरीक्षणांकडे उपस्थितांचे लक्ष वेधले. यानुसार एफ ॲण्ड ओमधील ४५.२४ लाख वैयक्तिक उलाढालकर्त्यांपैकी केवळ ११ टक्केच (सराईत) व्यापारी आहेत आणि त्या विभागालाच नफा कमावता आला आहे. बुच म्हणाल्या की, वैयक्तिक गुंतवणूकदारांनी महागाईला मात देणारा सरस परतावा मिळण्याची शक्यता अधिक जास्त आहे, अशा दीर्घ मुदतीच्या गुंतवणुकीवर लक्ष देण्याची गरज आहे. असो, पुढील भागात आपण ‘एफ ॲण्ड ओ मार्केट’विषयी अजून माहिती घेऊ या.

@AshishThatte

ashishpthatte@gmail.com

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Concept of derivatives market and information print eco news asj