आर्थिक सुरक्षितता राखण्यात विमा संरक्षण महत्त्वाची भूमिका बजावते. विमा संरक्षण घेताना तुम्हाला जीवन विमा आणि मुदत विमा यातील फरक समजला आहे, याची खात्री करणे आवश्यक आहे. जेणेकरून तुम्ही खरेदी करत असलेल्या पॉलिसी कव्हरचा पूर्ण लाभ तुम्हाला घेता येईल. खरं तर मुदत विमा आणि जीवन विमा यांच्यातील फरक अनेकदा गोंधळात टाकणारा असतो. तुमच्या मदतीसाठी दोन्ही लोकप्रिय विमा पॉलिसींमधील फरक फायनान्शिअल एक्स्प्रेसने दिला आहे.

टर्म इन्शुरन्स म्हणजे काय?

टर्म इन्शुरन्स हा विमा पॉलिसीचा एक असा प्रकार आहे, जो विशिष्ट कालावधीसाठी कव्हरेज प्रदान करतो. सामान्यतः ५ वर्ष ते ३० वर्षांपर्यंत हे कोणत्याही गुंतवणुकीशिवाय संरक्षण देते. यामध्ये पॉलिसीच्या मुदतीदरम्यान विमाधारकाचा अकाली मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यांना पूर्वनिर्धारित विम्याच्या रकमेचा लाभ दिला जातो. टर्म इन्शुरन्स पॉलिसींमध्ये कोणतेही रोख मूल्य किंवा बचत घटक नसतात, ज्यामुळे ते इतर प्रकारच्या जीवन विमा योजनांपेक्षा अधिक परवडणारे बनतात.

हेही वाचाः Money Mantra : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याच्या तारखेच्या वाढीबाबत अपडेट; आतापर्यंत २.८ कोटींपेक्षा जास्त ITR दाखल

जीवन विमा म्हणजे काय?

जीवन विम्यामध्ये सर्व प्रकारच्या पॉलिसींचा समावेश होतो. या प्रकारच्या विमा संरक्षणामध्ये पॉलिसीधारकाला संरक्षणासह गुंतवणुकीचे फायदे मिळतात. या पॉलिसी गुंतवणुकीच्या घटकासह जीवन कव्हरेज एकत्र करतात, ज्यामुळे पॉलिसीधारकाला कालांतराने संपत्ती निर्माण करण्यात मदत होते. जीवन विमा पॉलिसींमध्ये जीवन योजना, मनी-बॅक पॉलिसी, युनिट-लिंक्ड विमा योजना (युलिप) आणि एंडोमेंट योजनांचा समावेश असू शकतो. यामध्ये पॉलिसीधारकाला मृत्यू लाभ आणि मुदतपूर्तीचा लाभदेखील मिळतो, जो विमाधारक पॉलिसीच्या मुदतीपर्यंत टिकून राहिल्यास देय असतो.

BankBazaar.com चे आदिल शेट्टी सांगतात की, आर्थिक सुरक्षितता शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मुदत विमा आणि जीवन विमा यातील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. मुदत विमा पॉलिसीधारकाला शुद्ध संरक्षण प्रदान करतो, तर जीवन विमा कर लाभ आणि संरक्षण प्रदान करतो. तुमच्या गरजा आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांचे मूल्यांकन करून तुम्ही तुमची विमा योजना निवडू शकता. अशा परिस्थितीत पॉलिसी खरेदी करणाऱ्या व्यक्तीने गरजेनुसार आणि त्याच वेळी त्यांना आर्थिक सुरक्षा देणारी योजना निवडावी.

हेही वाचाः Money Mantra : Inactive PAN बाबत मोठी अपडेट, अशा पद्धतीनं होणार सक्रिय, जाणून घ्या

मुदत विमा आणि जीवन विमा यातील फरक

उद्देश
टर्म इन्शुरन्स मुख्यत्वे पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कुटुंबातील सदस्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यावर भर देतो. दुसरीकडे जीवन विमा योजनेतील सुरक्षिततेव्यतिरिक्त ती संपत्ती निर्मिती आणि इतर आर्थिक उद्दिष्टांसाठी एक गुंतवणूक घटक प्रदान करतो.

प्रीमियम
टर्म इन्शुरन्स पॉलिसींमध्ये साधारणपणे कमी प्रीमियम असतात, कारण ते फक्त संरक्षण देतात. सुरक्षिततेसह गुंतवणुकीच्या वैशिष्ट्यामुळे जीवन विमा योजनांसाठी प्रीमियम जास्त आहे.

पॉलिसी टर्म
टर्म इन्शुरन्स पॉलिसीचा एक निश्चित कालावधी असतो आणि प्लॅनचे नूतनीकरण न केल्यास पॉलिसी टर्मच्या शेवटी कव्हरेजदेखील संपते. लाइफ इन्शुरन्स पॉलिसीची मुदत जास्त असू शकते, पण त्यात पॉलिसीधारकाच्या संपूर्ण आयुष्याचा समावेश होतो.

रोख मूल्य
टर्म इन्शुरन्समध्ये कोणतेही रोख मूल्य जमा होत नाही आणि त्यात कर्जाची सुविधा नसते. याउलट जीवन विम्यामध्ये रोख मूल्य (Surrender value) असण्याची शक्यता आहे आणि त्यावर कर्ज देखील मिळू शकते.

परिपक्वता लाभ
मुदतीच्या विमा योजनांमध्ये कोणतेही परिपक्वता लाभ नाहीत. यात केवळ जीवन विमा योजनेच्या प्रकारावर अवलंबून मृत्यू लाभाची सुविधा आहे. पॉलिसीधारकाला पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यानंतर परिपक्वता लाभ मिळतो.