भारतात आणि विशेषकरून आपल्या राज्यासाठी कापूस हे महत्त्वाचे खरीप नगदी पीक. राज्यात सुमारे ४० लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर कापसाची पेरणी केली जाते आणि सरासरी ९० लाख गाठी उत्पादन घेतले जाते. त्यामुळे देश आणि राज्य या दोन्ही अर्थव्यवस्थांच्या दृष्टीने कापूस महत्त्वाचे पीक आहे. मात्र २०२३-२४ (ऑक्टोबर-सप्टेंबर) या पणन वर्षात कापूस उत्पादकांच्या पदरी घोर निराशा पडली. गेल्या अनेक वर्षांतील इतिहास पाहता मागील हंगाम हा पहिलाच असावा, ज्यात कापसाच्या किमतीत एकदाही तेजी आली नाही. त्याची कारणे काय असावीत याबद्दल आपण यापूर्वीच या स्तंभातून विश्लेषण केले आहे.
उपरोक्त परिस्थितीमुळे यावर्षीच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांनी कापसाकडे थोडे दुर्लक्ष करणे अपेक्षित होते आणि झालेही तसेच. कारण कापसाखालील क्षेत्रात १० टक्क्यांनी कपात झाली. त्यातच ऑक्टोबर महिन्यातही पाऊस लांबल्याने अनेक भागांत कापूस वेचणी उशिराने झाली. मात्र तरीही बाजारात कापसाच्या किमतीत सुधारणा झाली नव्हती. आता बाजारात कापूस आवक सुरू झाली आहे, परंतु प्रत्यक्ष बाजारात शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी किमतीत कापूस विकावा लागत आहे. कापूस महामंडळदेखील कापूस खरेदी करीत असून आजमितीला १.५ लाख कापूस गाठी खरेदी हमीभावात झाल्याचे कळते.
हेही वाचा…माझा पोर्टफोलियो : वाहन उद्योगाचा भक्कम कणा
े
जागतिक बाजारात कापूस वायदे दीर्घकाळ मंदीत असल्यामुळे येथील शेतकरीदेखील कापसाची साठवणूक करण्यापेक्षा महामंडळाला हमीभावात विकणे पसंत करीत आहेत. बऱ्याच अंशी ते व्यावहारिकदृष्ट्या बरोबर समजले जात आहे. कारण जागतिक किंवा स्थानिक बाजारपेठेत नजीकच्या काळात तरी कुठल्याच घटना अपेक्षित नाहीत ज्यामुळे कापसासाठी मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकेल. तसेही मागील दोन वर्षे सोयाबीन आणि कापूस साठवणूक केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असल्यामुळे आता पाणीही फुंकून प्यायले जात असावे. एकंदर कापसाकडून उत्पादकांच्या फार मोठ्या अपेक्षा नसल्यामुळे बाजारात मरगळ दिसून येत आहे.
कमॉडिटी बाजाराचे हेच वैशिष्ट्य आहे की, जेव्हा सर्व रस्ते बंद झाले आहेत असे वाटत असताना अचानक एक दार असे उघडते आणि सर्वांच्या आशा पल्लवित होतात. थोडे तसेच काहीसे होत असल्याचे संकेत दिसून येत आहेत. कारण बांगलादेशात मागील काही दिवसांत नियंत्रणात असलेली अराजकसदृश परिस्थिती परत चिघळली आहे. त्यामुळे आधीच अनेक समस्यांनी घेरलेली तेथील अर्थव्यवस्था, तसेच वित्त आणि उद्योग क्षेत्रावर मोठा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. ही परिस्थिती भारतासाठी आपल्यासाठी नवीन राजनैतिक आणि आर्थिक आव्हाने निर्माण करीत असले तरी मंदीच्या विळख्यात असलेल्या भारतीय वस्त्रोद्योग उद्योगासाठी ही सुसंधी प्राप्त झाली आहे. कारण पाश्चिमात्य देशांनी आपली वस्त्रोद्योग मागणी भारताकडे वळवली आहे. तमिळनाडूमधील महत्त्वाचे वस्त्रोद्योग केंद्र असलेल्या तिरुपूरमधील सुमारे ५,००० छोटेमोठे कारखाने परत सुरू झाले आहेत. नुसतेच सुरू नाही तर यातील बहुतेक कारखाने ९०-९५ टक्के क्षमतेने चालू झाले आहेत. अमेरिका आणि युरोपमधून मोठे कार्यादेश मिळत असल्याचे माध्यमांनी म्हटले आहे.
हेही वाचा…बाजाराची घसरगुंडी, गुंतवणूकदारांची घाबरगुंडी!
मागील महिन्यात कापसावर लिहिलेल्या लेखात बांगलादेशातील अराजकतेतून भारताला वस्त्र-प्रावरणे क्षेत्रात मोठी संधी मिळू शकेल, ही शक्यता व्यक्त केली होती. मात्र एवढ्या लवकर आणि एवढ्या प्रमाणात ती खरी होईल असे वाटले नव्हते. खरे म्हणजे बांगलादेश वस्त्र-प्रावरणे उद्योगात जगात तिसऱ्या क्रमांकावर असून भारतातून मोठ्या प्रमाणात कापूस आयात करून जगाला कापड आणि तयार कपडे पुरवत असे. कापूस प्रक्रियेपासून ते वस्त्रे तयार होईपर्यंत सर्व प्रकारच्या प्रक्रिया एकाच ठिकाणी करण्याच्या सोयी-सुविधा उभारल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात बांगलादेश भारतापेक्षा अधिक स्पर्धाक्षम झाला होता. आजच्या युगात एकात्मिक वस्त्रोद्योग कंपन्याच चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. त्यामुळेच तिरुपूरमधील कंपन्या दोन वर्षांच्या मंदीनंतर परत चांगली कामगिरी करण्यासाठी सिद्ध झाल्या आहेत. मागील दोन महिने निर्यातीत चांगली वाढ होत असून केवळ ऑक्टोबर महिन्यात वस्त्रोद्योग निर्यात १०,००० कोटी रुपयांहून अधिक झाली असून ती मागील ऑक्टोबरच्या तुलनेत ३५ टक्के अधिक आहे. दुसऱ्या सहामाहीत एकूण निर्यातीत चांगलीच वाढ होण्याचे संकेत यामुळे मिळत आहेत.
मागील काळात देशांतर्गत वस्त्रोद्योगाने खर्च-कपातीची पावले उचलल्याने दुसऱ्या तिमाहीसाठी प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या वित्तीय कामगिरीतदेखील चांगली सुधारणा झालेली दिसून आली आहे. पेज इंडस्ट्रीज, किटेक्स गार्मेंट्स, अरविंद या कंपन्यांनी आश्वासक कामगिरी केली आहे. एकंदरीत पाहता वस्त्रोद्योगाने कात टाकली असून मंदीत राहिलेल्या कापसाच्या किमतीमुळेदेखील त्यांची कामगिरी सुधारली आहे.
वस्त्रोद्योग क्षेत्रातील सुधारलेल्या परिस्थितीचा थेट फायदा कापसाला होणे साहजिक आहे, परंतु हा फायदा मर्यादित स्वरूपाचा असू शकेल. कारण बांगलादेशातून भारतात आलेल्या मागणीसाठी अधिक कापूस लागला तरी त्यातील बहुतेक माल भारत निर्यात करीत होता. ती निर्यात त्याप्रमाणात कमी होईल. त्यामुळे सध्या तरी कापसाच्या किमतीने तळ गाठून झाला असून यापुढे मंदी संपून मर्यादित तेजीसाठी सिद्ध झाला असे म्हणता येईल. त्यामुळेच कदाचित अनेक कापड गिरण्यांनी कापसाचे तीन महिने पुरतील एवढे साठे उभारले असून इतर गिरण्या तसे करण्याच्या बेतात आहेत, ही जमेची बाजू. यामुळे कापूस पुढील सहा-आठ आठवड्यांत ८,००० रुपयांपर्यंत जाईल असे काही उद्योग धुरीण म्हणत आहेत. मात्र येथील किमती आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीपेक्षा अधिक असल्याने निर्यातीला अजूनही मागणी नाही. तसेच ‘टेक्निकल चार्ट’वरदेखील अमेरिकी वायदे ७१-७२ सेंट्स प्रतिपौंडची पातळी ओलांडू शकत नसल्याने तेजीला आधार मिळत नाहीये. जर हीच किंमत ७४ सेंट्सच्या पुढे काही काळ राहिली तर कापसात अगदी ८,४०० रुपयांपर्यंत तेजी येऊ शकेल. ही शक्यता थोडी लांबची असली तरी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवावे लागेल.