कौस्तुभ जोशी
या आठवड्याअखेरीस बंद होताना शेअर बाजारांनी आपला ‘बुलिश अजेंडा’ कायम ठेवला आणि निफ्टी 21300 या पातळीवर बंद झाला. शुक्रवार २२ डिसेंबर रोजी बाजार बंद होताना सेंसेक्स ७११०६ (२४१ अंकांनी वर ) अंशांवर तर निफ्टी २१,३४९ (९४ अंकांनी वर ) वर बंद झाला. आठवड्याभराचा अंदाज घेतल्यास बाजारांमध्ये किंचितशी घसरण दिसून आली.
गेले सलग सात आठवडे बाजार आठवड्याच्या शेवटी बंद होताना पॉझिटिव्ह दिसले. म्हणजेच सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांमध्ये वाढ नोंदवली गेली. या आठवड्यात या तेजीला थोडासा ब्रेक लागलेला दिसला.
विप्रो, एचसीएल टेक्नॉलॉजी, टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प आणि हिंडाल्को या कंपन्यांच्या शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. विप्रो सर्वाधिक वाढलेला शेअर म्हणून नोंदवला गेला. आठवड्या अखेरीस विप्रोचा बाजारभाव ४६२ रुपये इतका होता तर, ग्रासिम, एसबीआय लाइफ, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि आय.सी.आय.सी.आय. बँक या शेअर्समध्ये घट दिसून आली.
ऑटो, कॅपिटल गुड्स, हेल्थकेअर आणि ऑइल अँड गॅस हे इंडेक्स एक टक्क्याने वाढले, तर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, मेटल्स आणि रियल इस्टेट या सेक्टरल इंडेक्स मध्ये दोन टक्क्यापेक्षा अधिक वाढ नोंदवली गेली. या आठवड्यात निफ्टी आयटी इंडेक्स सव्वा दोन टक्क्याने वाढून ३५६३७ वर बंद झाला.
हेही वाचा : वित्तरंजन: रंजक तरीही वैचारिक
कोव्हिड विषाणूचा प्रभाव पुन्हा एकदा आशिया खंडात वाढू लागला आहे. चीन आणि आग्नेय आशियातील देशात कोव्हिडच्या नवीन विषाणूचे रुग्ण सापडू लागले होते आता भारतातही JN1 या विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसते आहे व एकूण केसेसची संख्या ६४० एवढी नोंदवली गेली आहे. या बातमीमुळेच फार्मा क्षेत्रातील कंपन्यांचे शेअर्स पुन्हा एकदा वाढू लागले आहेत. निफ्टी फार्मा इंडेक्स शुक्रवार २२ डिसेंबर रोजी एक वर्षातील उच्चांकाला पोहोचलेला दिसला.
पिरामल फार्मा आठ टक्क्याने वाढलेला दिसला. एस्ट्राझेनका फार्मा आठ टक्क्याने वाढून ५१९३ या ५२ आठवड्यातील उच्चांकाला पोहोचला. या कंपनीच्या कॅन्सरवरील उपचारांमध्ये महत्त्वाच्या मानल्या गेलेल्या औषधाचे जानेवारी २०२४ मध्ये लॉन्चिंग होणार आहे या बातमीने शेअरमध्ये तेजी आली.
जे बी केमिकल सात टक्के वाढून ५२ आठवड्यातील उच्चांकाला पोहोचला. ग्लॅंड फार्मा ५% वाढून ५२ आठवड्यातील उच्चांक पातळीवर पोहोचला. दिविज, ग्लेनमार्क, डॉक्टर रेड्डीज या शेअर्समध्ये तीन टक्क्याची वाढ दिसून आली.
२०२३ या वर्षात निफ्टी फार्मा इंडेक्सने ३०% परतावा दिला आहे.
सण आणि उत्सवाच्या वातावरणात ग्राहकांनी केलेल्या जोरदार खरेदीमुळे एसबीआय कार्ड या कंपनीच्या व्यवसायात नोव्हेंबर महिन्यात ५० टक्के वाढ नोंदवली गेली.
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड या कंपनीला २६०० कोटींची ऑर्डर्स मिळाल्याने कंपनीचा शेअर वाढलेला दिसला.
सार्वजनिक क्षेत्रातील एलआयसीलं सार्वजनिक भागधारणेच्या नियमातून सूट मिळाल्यामुळे कंपनीचा शेअर ४ % वाढून वार्षिक उच्चांकावर पोहोचला.
या वर्षभरातील आयपीओची लाट चांगलीच दमदार ठरली. एकूण ५७ कंपन्यांनी पब्लिक इश्यूद्वारे जवळपास पन्नास हजार कोटी रुपयांची उभारणी केली. लिस्टिंगही दमदार झाल्याने गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला आहे.
हेही वाचा : Money Mantra : प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची
१५ डिसेंबरच्या आठवड्याअखेरीस रिझर्व बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताची परकीय चलन गंगाजळी ६१५ बिलियन डॉलर्स एवढी झाली आहे. यामध्ये नऊ बिलियन डॉलरची भर पडली असे रिझर्व बँकेकडून स्पष्ट करण्यात आले.
या वर्षाच्या शेवटच्या आठवड्यात बाजारात उत्साह कायम टिकेल अशी शक्यता दिसत आहे. २१००० हा निफ्टीला भक्कम सपोर्ट दिसतो आहे. जर देशातील आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांनी आपली खरेदी कायम ठेवली तर निफ्टी २१६०० च्या आसपास जाऊ शकतो. आयसीआयसीआय डायरेक्ट या दलाली पेढीने वर्तवलेल्या अंदाजानुसार परदेशी गुंतवणूकदारांचा भारत हा शेअर खरेदीसाठी क्रमांक एकची पसंती असलेला देश आहे व तोच प्राधान्यक्रम कायम राहिला तर २०२४ अर्थात पुढच्या वर्षाच्या अखेरीस निफ्टीची पातळी २४२०० इथपर्यंत जाऊ शकते. अमेरिकन बाजारामध्ये व्याजदर कपातीच्या शक्यतेमुळे भारतात वित्तसंस्थामार्फत येणाऱ्या पैशाचा ओघ वाढता राहणार आहे.