डेव्हीड शॉ हे अमेरिकन हेज फंडाचे प्रमुख आहेत. हेज फंड आणि त्यांचे प्रमुख बाजारात कधीच मोकळेपणाने वावरत नाहीत. जरी ते काळा कोट घालत नसले तरी. त्यांचे वागणे, बोलणे गुप्त हेरासारखे असते. डेव्हीड शॉ यांनी आपल्या गुंतवणूकदारांच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करताना क्वान्ट ही संकल्पना वापरली आहे. या संकल्पनेला अंतःप्रेरणा असते. आर्थिक आकडेवारीचे विश्लेषण नेहमीच्या पद्धतीने करणे तिला मान्य नसते. माहितीचे विश्लेषण करण्यासाठी अल्गोरिदम, मॅथमॅटिकल मॉडेल्स तयार करून ती वापरली जातात. बाजारात ‘आर्बिट्राज’ वापरायच्या संधी कशा उपलब्ध आहेत, बाजारात कोणत्या उणीवा किंवा कमतरता यांचा शोध घेतला जातो आणि मग मोठ्या प्रमाणावर उलाढाल केली जाते. डी. ई. शॉ या संस्थेचे असे म्हणणे आहे की, आमचा ३० वर्षाचा संशोधनाचा अनुभव या कामी उपयुक्त ठरतो. जोखीम आणि जोखमीचा मोबदला यांचा पर्याप्त वापर केला जातो. मग मूलभूत संशोधन केले जाते. पोर्टफोलिओ मॅनेजर त्यांचे स्वतःचे आडाखे, निष्कर्ष उपलब्ध आकडेवारीचा वापर करून काढतो आणि मग गुंतवणुकीचे निर्णय घेतले जातात.
संख्यात्मक निर्णय आणि गुणात्मक निर्णय दोन्हींचा वापर केला जातो. जगातल्या बाजारात एकाच वेळी अनेक बाजार पद्धती वापरल्या जातात. हेज फंडाची टीम वेगवेगळ्या संकल्पनावर साधक बाधक चर्चा करते, जोखीम काय आहे हे शोधले जाते. हेज फंडानी जगातले उत्कृष्ट गणितज्ञ, पदार्थ विज्ञान शास्त्रातले तज्ञ, अर्थशास्त्राज्ञ गुंतवणूक विश्लेषक इत्यादी व्यक्तींना नियुक्त केलेले असते. अनेक व्यक्तींचे एकाच वेळेस काम चालू असते. डी. ई. शॉ या संस्थेकडे भारतात १ सप्टेंबर २०२४ या दिवशी ६० अब्ज डॉलरच्या मालमत्तेचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी आहे. तुलनात्मक परतावा यापेक्षा खराखुरा परतावा हे उद्दिष्ट असते. २०१३ ला त्यांनी ओरिन्टीअर योजना आणली गेली. वेगवेगळ्या मालमत्ता गुंतवणुकीसाठी विचारात घेतल्या जातात आणि त्यातून जास्तीत जास्त मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो.
हेही वाचा…Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
डेव्हीड शॉ यांना क्वान्टचा राजा असे टोपण नाव आहे. २९ डिसेंबर १९५१ ला त्यांचा जन्म झाला. ७४ वर्षाच्या या व्यक्तीचा अमेरिकी धनाढ्यांत १४९ वा क्रमांक, तर जगात ३७४ क्रमांक आहे. ७.७७ अब्ज डॉलरची मालमत्ता आहे. या व्यक्तीने सुरुवातीला कोलबिंया युनिव्हर्सिटीमध्ये कॉम्प्युटर सायन्स असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केले. अमेरिकेत सॅन डिएगो आणि स्टॅनफोर्ड या ठिकाणाहून पदव्या मिळवल्या. मॉर्गन स्टॅन्ले या जगप्रसिद्ध संस्थेत काम केले. बिल क्लिंटन, बराक ओबामा या दोन अमेरिकी माजी अध्यक्षांच्या सल्लागार मंडळात यांचा समावेश होता. आई वडील ज्यू होते. शाळेपासूनच त्यांना गणित आणि शास्त्र या दोन विषयाची प्रचंड आवड होती. त्यांनी १९८६ ला डॉक्टररेट मिळवली. १९८८ ला स्वतःची डी.ई. शॉ अशी कंपनी स्थापन केली. अनेक पुरस्कार मिळवले. परंतु प्रकाश झोतात राहण्याची अजिबात आवड नाही शक्यतो ते कोणत्याही व्यक्तीला मुलाखतसुद्धा देत नाहीत. पायलट म्हणून विमान चालवण्याचा परवानासुद्धा त्यांच्याकडे आहे. विमान उडवणे त्यांना आवडतेही.
आर्थिक जगतात डेव्हीड या नावाने बाजारात बरीच कुजबुज सतत असते. पुढे काय होणार याची माहिती देणारा हा अग्रदूत आहे. एका पुस्तकाच्या दुकानात वरच्या जागेत न्यूर्याक शहरात त्यांच्या संस्थेची स्थापना झाली. सुरुवातीला संस्थेकडे फक्त सहा कर्मचारी होते आणि २८ दशलक्ष डॉलरचे भागभांडवल होते. आता संस्थेकडे २,५०० कर्मचारी आहेत. संपूर्ण जगभर शाखा आहेत. डी. ई. शॉ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची स्थापना १९८८ ला झाली. त्यांच्या संशोधनाविषयी बाहेर जास्त माहिती उपलब्ध नाही. १९९७ ला गुंतवणूकदाराचे पैसे परत करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. २१ अब्ज डॉलर त्यांनी बँक ऑफ अमेरिकाकडून घेतले. डी. ई. शॉ वर अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. प्रसार माध्यमाशी फटकून राहणारा कधी कधी व्यवसायाची गुपित फोडत असतो त्यातलेच त्यांचे काही विचार हे वाचकांपर्यंत पोहचवण्याचा हा प्रयत्न समजला जावा.
हेही वाचा…बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
शॉ असे म्हणतात की, मी मोठा होत गेलो त्यावेळेस प्रत्येक व्यक्ती मला हेच सांगायची की बाजारातली स्पर्धा अत्यंत तीव्र आहे. बाजारात, बाजाराला मागे टाकणे हे कोणाला जमत नाही. वस्तूंच्या चढ उतारावर बारकाईने लक्ष द्यावे लागते. परंतु तरीसुद्धा शेअर्ससाठी असलेला बाजार आणि वस्तुसाठी असलेला बाजार या दोन्ही बाजारात काही ना काही, केव्हा ना केव्हा पोकळी सापडते. काही संधी वेळच्या वेळी शोधायला लागतात. कारण अशी संधी आहे हे इतरांना सुद्धा कळते आणि त्यामुळे इतरांना कळण्याच्या अगोदर निर्णय घेण्याची गरज असते. बाजारात एखादी व्यक्ती अमूक एका कामामुळे यशस्वी झाली म्हणून कायमस्वरूपी सतत पैसा मिळवता येईल असे शक्य नाही, जे त्यांचे सगळ्यात मोठे संशोधन होते. बरीच संशोधनं प्रसिद्ध केली जात नाहीत. आणि प्रसिद्ध केली तरी त्यात नाविन्य उरत नाही. थोडक्यात सामान्य गुंतवणूकदारांनी हेज फंडापासून दूर राहणे चांगले. – प्रमोद पुराणिक