डॉ. आशीष थत्ते
आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आपण वित्त क्षेत्रात योगदान देणाऱ्या महिलांची माहिती घेऊ या. अर्थात याची सुरुवात देशाच्या अर्थमंत्र्यांशिवाय होऊच शकत नाही. मागील काही लेखांत आपण केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाविषयीच्या काही रंजक गोष्टी जाणून घेतल्या होत्या.
सावित्री आणि नारायण सीतारामन या दाम्पत्याच्या पोटी १८ ऑगस्ट १९५९ रोजी निर्मला सीतारामन यांनी जन्म घेतला. मद्रास आणि तिरुचिरापल्ली येथे त्यांचे शालेय शिक्षण झाले. नंतर जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यावर त्यांना डॉक्टरेटचे शिक्षणदेखील पूर्ण करायचे होते; पण त्याआधीच त्यांना डॉ. परकला प्रभाकरन भेटले आणि १९८६ मध्ये त्यांचे लग्न झाले. लग्नानंतर प्रभाकरन यांना लंडन येथे नोकरी मिळाल्यामुळे त्यादेखील लंडनला रवाना झाल्या. तिथे मोठी नोकरी मिळण्याआधी चक्क सेल्सवुमन म्हणून हॅबिटॅट या प्रसिद्ध फर्निचरच्या दुकानात त्यांनी काम केले. १९९१ मध्ये मुलीच्या जन्मासाठी ते भारतात आले आणि मग ते इथेच रमले. सीतारामन यांनी २००६च्या सुमारास भारतीय जनता पक्षाचे काम करायला सुरुवात केली. प्रभाकरन आणि त्यांचा कुटुंबीयांचा ओढा काँग्रेसकडे होता. पक्षाच्या प्रवक्तापदावर काम करताना त्यांचे कलागुण सर्व देशाने हेरले आणि मग मोदी सरकारमध्ये त्यांना महत्त्वाची पदे मिळत गेली. संरक्षण आणि अर्थ मंत्रालय पूर्णवेळ सांभाळणाऱ्या त्या पहिल्याच महिला मंत्री आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीदेखील दोन्ही पदे सांभाळली होती.
आर्थिक आघाड्यांवर त्यांच्या पक्षाचे आणि सरकारचे त्या हिरिरीने समर्थन करतात आणि त्यामुळे त्यांची काही वाक्ये प्रसिद्ध आहेत. सप्टेंबर २०१९ साली वाहन उद्योगाच्या मरगळीचे वर्णन करताना अप्रत्यक्षपणे त्यांनी नवीन सहस्रकात जमलेल्या तरुणांच्या मानसिकतेचा उल्लेख करताना ते ओला आणि उबर वापरतात आणि कार खरेदी करण्यास वचनबद्ध नसतात, असे म्हटले. तर डिसेंबर २०१९ मध्ये संसदेत वाढलेल्या कांद्याच्या भावाचे विश्लेषण करताना ‘मी फारसे कांदा आणि लसूण खात नाही. मी अशा कुटुंबातून येते जेथे फारसा कांदा वापरात नाहीत’ असे म्हणून विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला. जानेवारी २०१८ मध्ये सुखोई या लढाऊ विमानातून उड्डाण करून आवाजाच्या वेगाला भेदून त्यांनी संरक्षणमंत्री म्हणून एक विक्रमच प्रस्थापित केला. त्यांना जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने उत्कृष्ट माजी विद्यार्थी म्हणून, तर ‘फोर्ब्स’ने २०१९ मध्ये जगातील ३४ वी प्रभावशाली महिला म्हणून गौरवले होते. वर्षानुवर्षे तांदळाच्या डब्यात पैसे साठवूनदेखील अगदी घर घेण्याचे स्वप्न प्रत्यक्षात आणणाऱ्या सर्वच महिलांना, ज्या आपल्या घरातील अर्थमंत्रीच असतात त्यांना आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या शुभेच्छा!
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाऊंटंट म्हणून कार्यरत /ashishpthatte@gmail.com
@AshishThatte