– सुधीर खोत
तुम्ही पण प्रत्येक महिन्याच्या २१ तारखेला पुढच्या पगाराची वाट पाहत असता का? मग जाणून घ्या वैयक्तिक आर्थिक विवरणपत्र (Personal Financial Statement) तयार करण्याचे महत्त्व!
“पैसा कितीही कमावला, तरी महिन्याच्या अखेरीस शिल्लक राहत नाही.” अनेक लोक याबाबत तक्रार करत असतात. या गटामध्ये सुशिक्षित, नोकरी करणारे आणि व्यावसायिकही आहेत जे या सापळ्यात अडकलेले असतात. महिन्याच्या शेवटी, पुढील पैसे कधी येणार या विवंचनेत सगळे अडकलेले असतात. एवढे पैसे कमावून अशी परिस्थिती का होते, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.
याबाबत माहिती घेण्यापूर्वी आपल्या दैनंदिन जीवनातील घटनांचे निरीक्षण करूया. बहुतांश लोक नेहमीच नवीन आणि अधिक पैसा कमावण्याच्या मागे असतात. त्यांना वाटते की, भरपूर पैसा आला की सर्व काही सुरळीत होईल. प्रत्यक्षात पैसा येतोही, पण त्याचे योग्य नियोजन केले जात नाही, म्हणून तो निघून जातो आणि महिन्याच्या अखेरीस हतबलता निर्माण होते. पैसा शिल्लक राहण्यासाठी किंवा त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे उद्दिष्ट असले पाहिजे. याबाबत आपण मागील लेखामध्ये म्हणजे ‘वैयक्तिक आर्थिक कालरेषा’ (Personal Financial Timeline) या विषयावर सविस्तर चर्चा केली आहे.
वैयक्तिक आर्थिक विवरणपत्र म्हणजे काय?
तुमचा स्वतःचा आर्थिक आराखडा म्हणजे वैयक्तिक आर्थिक विवरणपत्र. यामध्ये तुमचे उत्पन्न, खर्च, कर्ज, मालमत्ता आणि बचतीचे विश्लेषण असते.
जेव्हा तुम्ही व्यवसाय करत असता, तेव्हा दर महिन्याला नफा-तोटा पत्रक (Profit & Loss Statement) आणि ताळेबंद पत्रक (Balance Sheet) तपासता. तसेच, तुम्ही स्वतः एकल व्यक्ती कंपनी (One Person Company) आहात. त्यामध्ये तुम्ही आणि तुमचा परिवार हे सर्व सभासद आहेत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने स्वतःसाठी हे आर्थिक विवरणपत्र तयार करणे अत्यावश्यक आहे.
वैयक्तिक आर्थिक विवरणपत्र का गरजेचे आहे? तुम्ही किती पैसा कमावता याला महत्त्व नाही, पण त्या पैशाचे नियोजन किती योग्य पद्धतीने करता, यावर तुमचे आर्थिक यश किंवा अपयश ठरते. शालेय शिक्षणामध्ये आपल्याला आर्थिक नियोजनाचे शिक्षण दिले जात नाही. त्यामुळे पैसा कसा सांभाळायचा, वाढवायचा आणि योग्य वापरायचा, याबाबत आपण अनभिज्ञ असतो. आपल्याला असे वाटते की फक्त पैसा कमावणे महत्त्वाचे आहे, पण तसे नाही. आपण गणित, विज्ञान, अभियांत्रिकी शिकतो, पण पैशाचे व्यवस्थापन शिकत नाही. त्यामुळे आपण महिनाभर मेहनत करून पैसे कमावतो, पण ते कुठे गेले, कसे खर्च झाले, याचा हिशेब ठेवत नाही.
आलेल्या पैशाचे योग्य नियोजन केले तर आर्थिक यश नक्की मिळते. यासाठी वैयक्तिक आर्थिक विवरणपत्र तयार करणे महत्त्वाचे आहे.
वैयक्तिक आर्थिक विवरणपत्र तयार केल्याचे फायदे: १. पैशाचे योग्य नियोजन केल्यामुळे आर्थिक व्यवस्थापन स्पष्ट होते. २. उत्पन्न आल्यावर त्याचा प्रवास कसा होतो, हे समजते. ३. खर्च कोणत्या ठिकाणी जास्त होतोय आणि कुठे कपात करता येईल, हे लक्षात येते. ४. कोणत्या गोष्टी मालमत्ता (Asset) आहेत आणि कोणत्या जबाबदाऱ्या (Liability) आहेत, हे स्पष्ट होते.
वैयक्तिक आर्थिक विवरणपत्र कसे तयार करावे?
१. एक वही घ्या आणि नवीन कोरे पान घ्या. २. त्या पानाचे चार भाग करा आणि त्यामध्ये पुढीलप्रमाणे विभागणी करा:
• पहिल्या चौकोनात उत्पन्न (Income) लिहा – यामध्ये तुमचा पगार, अर्धवेळ कामाचे उत्पन्न, भाडे, गुंतवणुकीतून मिळणारे व्याज किंवा लाभांश (Dividend) इत्यादी लिहा.
• दुसऱ्या चौकोनात खर्च (Expenses) लिहा – यामध्ये निश्चित खर्च (घरभाडे, कर्जाचे हफ्ते, वीजबिल, शाळेची फी) आणि अनिश्चित खर्च (किराणा, वैद्यकीय खर्च, मनोरंजन, खाणे-पिणे) समाविष्ट करा.
• तिसऱ्या चौकोनात मालमत्ता (Assets) लिहा – बचत खाते शिल्लक, मुदतठेवी (Fixed Deposits), म्युच्युअल फंड, शेअर्स, घर, प्लॉट, सोन्याची गुंतवणूक यांचा समावेश करा.
• चौथ्या चौकोनात जबाबदाऱ्या (Liabilities) लिहा – गृहकर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड बिले आणि इतर देणी यांचा समावेश करा.
स्वतःची आर्थिक स्थिती तपासा: तुमच्या मालमत्तेतून जबाबदाऱ्या वजा केल्यावर जी संख्या मिळते ती तुमची निव्वळ संपत्ती (Net Worth) दर्शवते.
जर तुमची निव्वळ संपत्ती सकारात्मक असेल, तर तुमची आर्थिक स्थिती योग्य दिशेने जात आहे. परंतु, जर तुमची निव्वळ संपत्ती नकारात्मक असेल, तर तुम्हाला तुमच्या आर्थिक व्यवस्थापनावर अधिक लक्ष द्यावे लागेल.
नियमित आर्थिक परीक्षण: जर दर महिन्याच्या २१ किंवा २२ तारखेला तुमचे कमावलेले पैसे संपत असतील, तर तुम्ही तुमचे आर्थिक विवरणपत्र तपासणे आवश्यक आहे. त्यामुळे तुमच्या खर्चाची योग्य चिकित्सा होईल आणि गरज पडल्यास रोकड प्रवाह (Cash Flow) सुधारण्यासाठी बदल करता येतील.
वैयक्तिक आर्थिक विवरणपत्राचे महत्त्व:
- कर्जमुक्त होण्यासाठी मदत होते.
- बचत आणि गुंतवणुकीत वाढ होते.
- अनावश्यक खर्चांवर नियंत्रण मिळते.
- आर्थिक दिशा स्पष्ट होते.
- मानसिक शांतता मिळते आणि आत्मविश्वास वाढतो.
एक महत्त्वाचा विचार: तुम्ही किती कमावता हे महत्त्वाचे नाही, पण कमावलेल्या पैशाचे नियोजन कसे करता, हे अधिक महत्त्वाचे आहे. वैयक्तिक आर्थिक विवरणपत्र म्हणजे तुमचा आर्थिक आरसा आहे. त्यामध्ये पाहून स्वतःचे आर्थिक नियोजन सुधारता येते. चुका ओळखून त्या दुरुस्त करता येतात. भविष्यातील उद्दिष्टे निश्चित करून त्यानुसार आर्थिक नियोजन करता येते. हीच आर्थिक शिस्त तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने घेऊन जाईल. त्यामुळे दर महिन्याला पुढच्या पगाराची वाट पाहण्याची गरज भासणार नाही आणि तुम्ही चिंता मुक्त जीवन जगू शकाल. तुमचे वैयक्तिक आर्थिक जीवन यशस्वी करण्यासाठी, वैयक्तिक आर्थिक विवरणपत्र तयार करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी स्वतःवर काम करणे अनिवार्य आहे!
लेखक फायनान्शियल थेरपिस्ट असून फायनान्शियल फिटनेसचे संस्थापक आहेत