कौस्तुभ जोशी, अर्थ विश्लेषक
आठवड्याअखेरीस सेन्सेक्स ६५९७० वर तर, निफ्टी १९७९४ वर बंद झाला. बाजाराचा एकूण अंदाज घ्यायचा झाल्यास १७२१ शेअर्समध्ये वाढ दिसून आली तर ८४९ शेअर्स मध्ये घट झालेली दिसली. १९८५० ही बाजाराची पातळी महत्त्वाची मानली जात आहे. एकूण बाजाराचा विचार करायचा झाल्यास निफ्टी आयटी जवळपास एक टक्क्यांनी घसरला. त्या खालोखाल निफ्टी एफ.एम.सी.जी आणि निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकात घट दिसून आली, तर आठवड्यात निफ्टी फार्मा ०.८७ टक्क्यांनी वाढलेला दिसला. सिपला या कंपनीच्या शेअरमध्ये सव्वादोन टक्क्याची वाढ नोंदवली गेली.
१९९०० या पातळीच्या वर सलग एक आठवडा जोपर्यंत निफ्टी टिकून राहत नाही तोपर्यंत वाटचाल पुन्हा एकदा वीस हजाराच्या दिशेने सुरू झाली आहे असे म्हणता येणार नाही. निफ्टी ५० ला १९८०० – २०००० या दरम्यान रेझिस्टन्स दिसून येत आहे.
हा आठवडा पब्लिक इश्यूचा
एकूण दीड लाख कोटी रुपयासाठी या आठवड्यामध्ये पब्लिक इश्यूसाठी गुंतवणूकदारांनी बाजारात उतरवले. ‘ओव्हर सबस्क्रीप्शन’ म्हणजे जेवढे शेअर्स कंपनीने गुंतवणूकदारांना उपलब्ध केले आहेत त्यापेक्षा जास्त शेअर्सना गुंतवणूकदारांनी बोली लावली. उदाहरणार्थ एका आयपीओ मध्ये कंपनीने गुंतवणूकदारांना दहा लाख शेअर्ससाठी बोली लावण्याची संधी दिली आहे आणि गुंतवणूकदारांनी एकूण २० लाख शेअर्ससाठी बोली लावली तर तो इश्यू ‘ओव्हर सबस्क्राईब’ झाला असे म्हणता येईल.
एकूण पाच आघाडीच्या कंपन्यांनी आपले पब्लिक इश्यू बाजारात आणले. आयआरइडीए या कंपनीच्या इश्यूला दमदार प्रतिसाद मिळाला व एकूण शेअर्सच्या तुलनेत ३८ पट अधिक शेअर्ससाठी गुंतवणूकदारांनी बोली लावली, तर टाटा टेक्नॉलॉजी या बहुप्रतीक्षित टाटा समूहातील कंपनीसाठी गुंतवणूकदारांनी अभूतपूर्व प्रतिसाद नोंदवताना ६९ पट अधिक मागणी नोंदवली. गंधार ऑइल रिफायनरी या कंपनीचा पब्लिक इश्यू सुद्धा ६४ पट ओव्हर सबस्क्राईब झाला. फ्लेअर रायटिंग इंडस्ट्रीज या स्टेशनरी क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीचा पब्लिक इश्यू ४६ पट ओव्हर सबस्क्राईब झाला.
आणखी वाचा-Money Mantra: गो-टू-मार्केट स्ट्रॅटजी म्हणजे काय?
‘ममाअर्थ’ या ब्रँडशी संबंधित ‘होनासा कन्स्युमर्स’ या कंपनीच्या शेअरमध्ये १२% ची घसघशीत वाढ दिसून आली. ऑलकार्गो गती या कंपनीच्या शेअरमध्ये ४% ची वाढ दिसली; ही कंपनी लॉजिस्टिक्स आणि शिपिंग क्षेत्राशी संबंधित आहे. कंपनीने बंगलोर येथे महाकाय लॉजिस्टिक केंद्र उभारण्याचा आपला निर्णय जाहीर केला आहे. एकूण २१ अत्याधुनिक ऑटोमेटेड आणि पर्यावरणीयदृष्ट्या अनुकूल लॉजिस्टिक तळ उभारण्याचा कंपनीचा मानस आहे.
भारतातील सर्वाधिक जीवन विमा उद्योग हाताळणाऱ्या एल.आय.सी.चा शेअर दहा टक्क्यांनी वाढला. येत्या काळात कंपनी तीन ते चार नवीन विमा योजना बाजारात आणणार आहे. या घोषणेमुळे शेअरमध्ये वाढ दिसून आली.
पेटीएम अर्थात ‘वन97 कम्युनिकेशन’ या कंपनीचा शेअर तीन टक्क्यांनी घसरला. अमेरिकेतील आघाडीची कंपनी बर्कशायर हॅथवे या कंपनीने आपले शेअर्स विकून ७०० कोटी रुपयाचा लॉस बुक केल्याची बातमी बाजारात आल्यावर कंपनीचा शेअर अधिकच घसरण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा-Money Mantra: उच्चशिक्षण + ट्रिपचे प्लानिंग. डबल मजा और कम दाम… कसे कराल प्लानिंग?
भारतातील स्मार्ट वॉचच्या व्यवसायामध्ये घसघशीत वाढ होताना दिसत आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी २१% वाढ झाली आहे. नॉईज आणि बोट या कंपन्यांच्या स्मार्ट-वॉचला सर्वाधिक मागणी असलेली दिसून येत आहे. फायर बोल्ट, नॉईज, बोट, फास्टट्रॅक, बोट या कंपन्याचे स्मार्टफोन मार्केटमध्ये प्राबल्य आहे. डिजिटल बाजारपेठेकडे वेगाने वाटचाल होत असल्याचे आणखी लक्षण या निमित्ताने पुढे येत आहे.
‘जेफिरिज’या न्यूयॉर्क अमेरिकेतील इन्व्हेस्टमेंट बँकिंग आणि वित्तीय क्षेत्राशी संबंधित कंपनीने आपल्या भारताच्या गुंतवणूक करण्यासाठी प्रस्तावित शेअर्स मध्ये होनासा, आयशर मोटर्स, एन.टी.पी.सी. एच.डी.एफ.सी. बँक, आय.सी.आय.सी.आय. प्रुडेन्शियल लाइफ या कंपन्यांचा समावेश करण्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेतील बाजार, आंतरराष्ट्रीय खनिज तेलाच्या वाढत्या किमती आणि पुढील वर्षी भारतातील सार्वत्रिक निवडणुका यांचा विचार करून आपल्या मॉडेल पोर्टफोलिओ मध्ये बदल करत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.