२८ फेब्रुवारी रोजी म्हणजेच शुक्रवारी बंद झालेल्या बाजाराच्या आकडेवारीनुसार सेन्सेक्स आणि निफ्टी जवळपास दोन टक्क्यांनी पडून एका नव्या नीचांकाच्या दिशेने मार्गक्रमण करते झाले आहेत. सलग पाचव्या महिन्याअखेरीस सेन्सेक्स आणि निफ्टी नकारात्मक वाटचाल दाखवत आहे. असे गेल्या दहा वर्षात घडलेले नाही हे महत्त्वाचे !
बाजाराची दिशा दाखवणारे सगळे १३ क्षेत्रीय निर्देशांक (सेक्टरल इंडेक्स) लालेलाल दिसत असून स्मॉल कॅप, आणि मिडकॅप सुद्धा दोन टक्क्याने घसरले आहेत. माहिती तंत्रज्ञान, आयटी आणि फायनान्शियल सर्व्हिसेस यामध्ये परदेशी गुंतवणूकदारांचा सगळ्यात मोठा गुंतवणूक हिस्सा असतो व या क्षेत्रातच मोठी पडझड झालेली दिसते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यावर त्यांनी असा एकही निर्णय घेतलेला नाही की ज्यामुळे अमेरिकेच्या व जगाच्या शेअर मार्केटमध्ये सकारात्मकता दिसून यावी ! अमेरिकेचे व्यापार शत्रू असलेले चीन, मेक्सिको आणि कॅनडा या देशांशी असलेले संबंध ट्रम्प यांनी अधिकच बिघडवून टाकले आहेत. २७ फेब्रुवारी रोजी ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या निर्णयानुसार मेक्सिकोतून येणाऱ्या वस्तूंवर २५ % कर तर चीनमधून येणाऱ्या वस्तूंवर जादाचा दहा टक्के कर आकारला जाणार आहे. हा कर आधी लादल्या गेलेल्या करांपेक्षा जास्त असणार आहे. म्हणजेच आधीपासून कर होताच, आता त्यात आणखी भर पडली आता पुढच्या आठवड्यापासून या नियमाची अंमलबजावणी व्हायला सुरुवात झाली की चीन मधून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर २० टक्के कर आकारला जाईल. याचा थेट प्रभाव भारतीय आणि जागतिक शेअर बाजारावर पडला आहे.
परदेशी गुंतवणूकदारांचा विक्रीचा सपाटा कायम !
परदेशी गुंतवणूकदारांचा भारतीय बाजारातील विश्वास परत येताना दिसत नाही तो नाहीच ! काल बाजार बंद झाला त्या दिवशी परदेशी गुंतवणूकदारांनी ११६३९ कोटी रुपयांचे शेअर्स विकले तर एकूण फेब्रुवारी महिन्याचा विचार करता परदेशी गुंतवणूकदार विक्रीचा सपाटा थांबवताना दिसत नाहीत. जानेवारी महिन्यापासून परदेशी गुंतवणूकदारांनी १४६००० कोटी रुपयांचे शेअर्स विकले असून देशांतर्गत गुंतवणूकदारांनी १५१००० कोटींची खरेदी केली आहे. पडत्या बाजारात आकर्षक शेअर्स विकत घेणे हेच भारतातल्या मोठ्या गुंतवणूकदारांचे धोरण असणार.
अमेरिकेची अर्थव्यवस्था व्यापार युद्धामुळे दोलायमान राहणार आहे व याचा थेट परिणाम भारतातील आयटी कंपन्यांच्या शेअर्सवर होताना दिसतो आहे. अमेरिकेतील बेरोजगारीचा टक्का वाढल्याचे आकडेवारीतून पुढे येताच भारतातील निफ्टी आयटी इंडेक्स घसरायला सुरुवात झाली. जवळपास आठ टक्क्यांनी तो घसरला आहे. टाटा मोटर्स, एसीसी, आरती ड्रग्स, आरती इंडस्ट्रीज, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक, 3m इंडिया या कंपन्यांचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरलेले दिसले.
तिसऱ्या तिमाहीचे जीडीपीचे आकडे आशादायक?
ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांसाठी भारताच्या अर्थव्यवस्थेची वाढ ६.२ % एवढी नोंदवली गेली. त्याच्या आधीच्या तिमाहीसाठी हीच वाढ ५.६ % इतकी होती. जीडीपी मध्ये वाढ झालेली दिसली तरीही एकेकाळी ९ % एवढी जीडीपीतील वाढ नोंदवलेल्या अर्थव्यवस्थेसाठी सध्या अनुकूल वातावरण नाही हे समजून येईल. प्राथमिक क्षेत्र, द्वितीय क्षेत्र आणि सेवा क्षेत्र यापैकी सेवा क्षेत्रातील वाढ ही सतत होतच असते. मात्र औद्योगिक उत्पादन क्षेत्राने जीडीपीतील १५ % चा वाटा काही सोडलेला नाही. पाच ट्रिलियनच्या दिशेने जायचे असेल तर आपल्याला कमीत कमी २५ ते ३५ टक्के जीडीपीतील वाटा कारखानदारी क्षेत्रातून निर्माण करता आला पाहिजे.
उत्पादन आणि खाणक्षेत्रांनी गेल्या तिमाहीच्या जीडीपीमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केल्यामुळे जीडीपी दर म्हणावा तसा वाढू शकला नाही. सरकारने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीवरून ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीत देशाचा जीडीपी दर 6.2% इतका नोंदवला गेला. आर्थिक वर्ष २०२४-२०२५ या पूर्ण वर्षासाठी जीडीपी दराचा आकडा साडेसहा टक्के एवढा नक्की होईल असा सरकारचा दावा किंवा आत्मविश्वास असला तरी तो बाजारासाठी सकारात्मक ठरणार नाही.