‘वित्तरंजन’च्या गेल्या पन्नास भागांत आपण बरीच माहिती मिळवली. कित्येक वाचकांनी ई-मेल आणि प्रत्यक्ष भेटीत या स्तंभलेखनाला यथोचित प्रतिसाद दिला. त्याबद्दल सगळ्यांचे आभार. या लेखमालेचा उद्देश फक्त वित्त क्षेत्रातील काही संकल्पना स्पष्ट करण्याचा होता. जेणेकरून तुम्ही स्वतःसुद्धा त्याविषयी अधिक माहिती घ्यावी. हे उद्दिष्ट निश्चितच पूर्ण झाले, असे वाटते.
या लेखमालेच्या निमित्ताने कित्येक गोष्टी शिकलो आणि अशा कित्येक गोष्टी नव्याने वाचनांतसुद्धा आल्या. अन्यथा देशाचे पहिले आणि दुसरे अर्थमंत्री तसे विस्मरणातलेच. आपल्या देशातील बँकांना मोठा इतिहास लाभला आहे, हेसुद्धा आपण या लेखमालिकेतून बघितले. आपल्या देशात ‘एटीएम’ कसे सुरू झाले आणि त्यांची रंजक माहितीसुद्धा आपण घेतली. अगदी सोन्याचे एटीएमसुद्धा आपण समजून घेतले. देशात आणि जगात अशा कित्येक महिला आहेत, ज्यांनी पुरुषांच्या बरोबरीने वित्त क्षेत्रात आपली छाप सोडली आहे, अशा काही कर्तृत्ववान महिलांची माहितीसुद्धा आपण या लेखांमधून घेतली. भारताचे वित्तीय वर्ष म्हणजे एप्रिल ते मार्च आणि इतर देशांचे जानेवारी ते डिसेंबर असते असा माझासुद्धा समज होता. पण वित्तीय वर्षांवर लेख लिहिताना कळून चुकले की, कितीही विचित्र वित्तीय वर्षेसुद्धा असू शकतात.
लहानपणापासून आपण ऐकत आलो आहे की, मुंबईला देशाची वित्तीय राजधानी म्हणतात. पण नक्की असे काय आहे मुंबईत की, तिला हा दर्जा प्राप्त झाला हेसुद्धा या लेखमालिकेत आपण बघितले. मुंबईतील कित्येक अशा संस्था आहेत, ज्या आपल्या शहराला देशाची वित्तीय राजधानी बनवतात. काही लेखांमध्ये आपण गुंतवणुकीचे इतर काही मार्गसुद्धा बघितले जसे नाणी, नोटा, जुनी ऐतिहासिक वाहने किंवा वाइनसुद्धा.
देशातील वित्त क्षेत्रातील मोठे बदल आणि खऱ्या अर्थाने आपल्या देशाला वित्तीय दिशा देणारे आधुनिक अर्थमंत्रीसुद्धा आपण या लेखमालेतून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. जगातील असे कित्येक देश असे आहेत, जे खरे तर भौगोलिक दृष्टीने छोटे आहेत. पण त्यांनी आपले नाव ‘टॅक्स हेवन’ हे बिरुद नोंद करून घेतले आहे.
थोडक्यात काय, तर लेखाचे शब्द मर्यादित असले तरीही त्या विषयीचे ज्ञान अमर्यादित आहे. ‘वित्तरंजन’च्या पहिल्या लेखात म्हटल्याप्रमाणे एखादी संकल्पना किंवा विषय तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही पुढे जाऊन माहिती-महाजालातून त्या विषयी अजून माहिती गोळा करू शकता. ज्याला अक्षरशः कुठलीही मर्यादा नाही. लेखमालेचा उद्देश जिज्ञासा जागवणे हा होता आणि मला लिहून नक्की कळवा की लेखमालिका तुम्हाला कशी वाटली. अर्थात हा फक्त स्वल्पविराम आहे. २०२४ मध्ये अजून काही तरी नवीन जाणून घेऊ. तोपर्यंत नवीन वर्षाच्या आगाऊ शुभेच्छा.