मागील पंधरवड्यातील ‘सोन्याहून हळद पिवळी’ या लेखामध्ये आपण हळदीपुढे सोन्याची चमक कशी फिकी पडली यावर चर्चा केली होती. अर्थात व्यापक दृष्टीने विचार केल्यास सोने आणि हळद या दोन्ही कमाॅडिटीजची तुलना होऊ शकत नाही. लेखातील तुलना ही केवळ अल्पकालीन कमाॅडिटी ट्रेडिंग आणि गुंतवणूक व त्यावरील परतावा या कोनातूनच केली होती. त्यामध्ये सोन्याची चमक फिकी पडली असे म्हटले तरी त्याची कारणमीमांसा केली नसल्याने आज आपण त्यावर विस्तृत चर्चा आणि अल्प-ते-मध्यम कालावधीमधील सराफा बाजाराची दिशा याबाबत माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे.
सोने ही एक अशी मालमत्ता आहे की ती कधी अमेरिकी डॉलरबरोबर कुस्ती खेळणारे चलन असते, कधी संपत्ती सुरक्षित आणि तरल ठेवण्याचे साधन असते. भारतासारख्या देशात ती शुभप्रसंगी आणि सांस्कृतिक कार्यक्रमात देवाण-घेवाण करण्याची वस्तू असते. पाश्चिमात्य देशांमध्ये ते एक गुंतवणुकीचे साधन असते, तर फारच कमी वेळा ती कमाॅडिटी असते. त्यामुळे त्याची किंमत ठरवणारे घटकदेखील कायम बदलत असतात आणि झपाट्याने बदलणाऱ्या आजच्या जगात दीर्घ-कालावधीच्या दृष्टीने सोन्याबाबत अंदाज देणे अत्यंत जिकिरीचे बनत चालले आहे. केवळ मागील ४०-५० वर्षांचा कल पाहूनच पुढील पाच-१० वर्षांतील सोन्याची वाटचाल कशी राहील याबाबत अंदाज बांधले जातात आणि त्या अनुषंगाने शेअर्स व वित्तीय गुंतवणुकीतील जोखीम व्यवस्थापनासाठी १० ते २० टक्के निधी सोन्यात ठेवावा असे मानणाऱ्या लोकांची, खरे तर मोठ्या गुंतवणूकदारांची, संख्या वाढत जाताना दिसते. जागतिक अर्थव्यवस्थेतील सध्याची परिस्थिती ही अत्यंत गुंतागुंतीची, अनिश्चिततेची आणि परस्परविरोधी घटकांनी भरलेली असल्यामुळे कमाॅडिटी आणि शेअर बाजारदेखील दोलायमान होताना दिसत आहेत. आणि तीच परिस्थिती सोन्याचीदेखील आहे. जेमतेम तीन महिन्यांपूर्वी सोन्यासाठी ‘अब की बार ७० हजार’ आणि चांदीमध्ये ‘अब की बार एक लाख’ असे मथळे घेऊन माध्यमांमध्ये चर्चा झडताना आपण पाहिल्या होत्या. कारण जागतिक बाजारात सोन्याने २,०५० डॉलर्स प्रति औंस ही पातळी गाठून नवीन विक्रमाला साद घातली होती. भारतात सोने ६३,००० रुपयांच्या पलीकडे जाऊन दररोज नव-नवीन विक्रम प्रस्थापित करत होते. तिथपासून ते आज सोने ७० हजार सोडाच, पण ६५ देखील गाठू शकले नाही आणि आता तर साठीखाली घसरून ५८,२०० रुपयांपर्यंत घसरले आहे. त्यामुळे ते साठीतच म्हातारे झाल्यासारखे वाटू लागले आहे आणि मागील दोन-तीन वर्षे ज्यांनी ते जवळ बाळगले ते सोने विकत आहेत असे दिसून येते.
हेही वाचा – Money Mantra: प्रोटेक्टिव्ह पुट स्ट्रॅटेजी काय असते?
सोन्याच्या घसरणीला कारणे देताना वर्ल्ड गोल्ड काऊंसिल या प्रामुख्याने सोने उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मार्केट रिसर्च संस्थेच्या अहवालाप्रमाणे, सोन्यातील ‘ईटीएफ’मधून गुंतवणूकदारांनी काढून घेतलेले पैसे, मध्यवर्ती बँकांची सोने विक्री आणि वाढीव किमतीमुळे मागणीत झालेली घट या प्रमुख कारणांमुळे सोन्याच्या किमती खाली आल्या असाव्यात. मात्र वरील कारणांमागचे कारण प्रामुख्याने एकच होते. ज्याप्रमाणे मे महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या किमती विक्रमी पातळीजवळ गेल्या त्या वेळी अमेरिकी आणि इतर देशांमधील व्याज दरवाढीला लगाम लागेल अशा अपेक्षा वाढीस लागल्या होत्या. मात्र मागील दोन महिन्यांत याच्या उलट चित्र निर्माण झाले आहे. महागाई आटोक्यात येईल आणि व्याजदर कमी झाले नाही तरी निदान वाढणे थांबेल ही आशा या दोन महिन्यांतील आर्थिक आकड्यांनी जवळपास संपुष्टात आणली. अमेरिकेतील रोजगार, किरकोळ महागाई यासारखे आकडे अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे दाखवत असल्याने फेडेरल रिझर्व्ह चिंताग्रस्त झाली असून या वर्षअखेरपर्यंत अजून दोन दरवाढींची शक्यता बळावली असल्याने सोन्यात विक्रीचा जोर वाढला आहे. दुसरीकडे करोना उद्रेकानंतर मागील सहा महिने चीनच्या अर्थव्यवस्थेचे तळ्यात-मळ्यात चालले होते. परंतु अलीकडील आकडेवारी पाहता चीन मंदीमध्ये गेल्याचे निश्चित झाले आहे. आयात-निर्यात दोन्ही घटत चालली असून चीनचे चलन म्हणजे युआन नऊ महिन्यांतील नीचतम पातळीवर आले आहे. चीनमधील स्थावर मालमत्ता म्हणजे रियल इस्टेट मार्केट डबघाईला आले आहे. कर्जाचा सापळा इतका अक्राळविक्राळ की या क्षेत्रातील कंपन्यांना गिळून टाकण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकार व्याजदर कमी करून मलमपट्टी लावत आहे, तोपर्यंत एव्हरग्रँडे या मोठ्या रियल इस्टेट कंपनीने अमेरिकेत दिवाळखोरीची घोषणा करून खळबळ उडवून दिली.
खरे तर ही परिस्थिती सोन्याला एरव्ही पूरक आहे. परंतु चीनमधील कर्जसंकट गहिरे होणे ही संपूर्ण जगालाच झोप उडवणारी गोष्ट आहे. जगातील प्रमुख अर्थव्यवस्था चीनवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. त्यामुळे चिनी अर्थव्यवस्थेत विपरीत घडणे सर्वांनाच कटकटीचे असते. अशा वेळी अमेरिकी डॉलर मजबूत होऊ लागतो आणि वर म्हटल्याप्रमाणे डॉलरची सोन्याशी कुस्ती असल्यामुळे डॉलर मजबूत म्हणजे सोने अशक्त असे काहीसे समीकरण निदान अल्पकाळासाठी तरी दिसून येते. दुसरी गोष्ट म्हणजे चीन सातत्याने सोन्याचे साठे वाढवत असून अर्थव्यवस्था डबघाईला आली तर यातील बरेच सोने विकण्याची शक्यता गृहीत धरूनदेखील बाजारात सोन्यामध्ये पैसे टाकण्यात कुणाला रस उरला नसेल अशी शक्यता आहे. अशी परिस्थिती आपण तुर्कीमध्ये अनुभवली आहे. मग सोन्याची पुढील वाटचाल कशी राहील आणि ज्यांनी सोन्यात गुंतवणूक केली आहे त्यांनी काय करावे हा प्रश्न निर्माण होतो. तर ऐतिहासिक उदाहरणे पाहता सोने जेव्हा विक्रमी पातळीवर, म्हणजे भारतात ६४,००० रुपये प्रति १० ग्रॅम या किमतीला पार करण्यासाठी दोन-तीन वेळा प्रयत्न करावे लागतात. जागतिक किंमत खाली राहिली आणि तरी रुपयाचे अवमूल्यन होत राहिले तर, अशा परिस्थितीत हे घडून यायला पुढील १२ ते १८ महिने लागतील. मूलभूत घटक पाहता ब्रिटन आणि युरोपमध्ये व्याज दरवाढ होतच असून अमेरिकी व्याजदरदेखील डिसेंबरपर्यंत दोन वेळा वाढतील असे अंदाज आहेत. तसेच व्याजदर खाली येण्यास २०२४ ची दुसरी तिमाही उजाडेल अशी परिस्थिती आहे. जरी व्याजदर वाढ थांबवण्याचे संकेत अमेरिकेने दिले तरी सोने लगेच फार वाढणार नाही. कारण त्या वेळी जोखीम-मालमत्ता म्हणजे शेअर्स बाजारात अगोदर तेजी येईल आणि नंतर सोने वाढेल.
हेही वाचा – मार्ग सुबत्तेचा : मुलं आणि आर्थिक नियोजन
सध्या प्रति औंस १,९२० डॉलर असलेले सोने १,८५० डॉलर किंवा वाईट परिस्थितीत अगदी १,८२० डॉलरवर येण्यासाठी बाजारातील परिस्थिती अनुकूल असून, २,०२५ – २,०४५ डॉलर ही त्याची वरची पातळी राहील, असे मत ‘मेटल्स फोकस’ या वर्ल्ड गोल्ड काऊंसिलसाठी संशोधन आणि माहिती संकलन करणाऱ्या कंपनीने म्हटले आहे. याचा अर्थ हाच की, मध्यम कालावधीत भारतात सोने ५६,५०० रुपयांपर्यंत खाली जाऊ शकते आणि ६०,४०० ते ६०,८०० रुपये पातळीवर मोठा अडसर राहील. वायदे बाजारातील काँट्रॅक्ट समाप्तीला सोन्यात मोठे चढ-उतार दिसून आल्यास नवल वाटू नये आणि म्हणून अल्पकालीन तेजी-मंदी याच कक्षेत येत राहील.
पुढे काय करावे? सोने-चांदी गुंतवणुकीचे मग पुढे काय करावे, हा लाखमोलाचा प्रश्न ठरतो.
गुंतवणूकदारांनी ५७,००० रुपयांवर सोने ईटीएफ घ्यावे आणि ६०,४०० रुपये पातळीवर नफा वसूल करावा, अशा प्रकारची व्यूहरचना योग्य ठरेल. व्यापकपणे पाहता सोन्याबरोबरच चांदी चालत असल्यामुळे सोने ५७,००० रुपयांपर्यंत आल्यास चांदीदेखील ६७,५०० ते ६६,००० रुपयांपर्यंत घसरू शकेल. तर ७२,५०० ते ७४,००० रुपयांचा मोठा अडथळा पार पडेपर्यंत चांदी ८०,००० रुपयांचे शिखर गाठू शकणार नाही. चांदीत गुंतवणुकीसाठी निप्पॉन ॲसेट मॅनेजमेंट किंवा आयसीआयसीआय प्रुडेन्शियल यांचा ‘सिल्व्हर ईटीएफ’ योग्य ठरावा.
लेखक वस्तू बाजार विश्लेषक
ksrikant10@gmail.com
(अस्वीकृती : कमाॅडिटी बाजार हा मुख्यत: जोखीम व्यवस्थापनासाठी असून, वरील लेख या गोष्टीचे महत्त्व आणि त्यातील गणित विशद करून सांगण्यासाठी आहे, लेखाला गुंतवणुकीचा सल्ला मानण्यात येऊ नये.)