अर्थव्यवस्था ती जगाची असो किंवा भारताची ती चक्राकार पद्धतीने फिरत असते. तेजी-मंदीच्या लाटा उसळत असतात. बरे-वाईट दिवस येत असतात. गुंतवणूकदारांनी या सगळ्याचा विचार करून आपला पैसा बाजारामध्ये गुंतवायचा असतो. पैसे गुंतवणारे व्यावसायिक आणि आपल्या बचतीतून पैसे गुंतवणारे गुंतवणूकदार या दोघांसाठी कळीचा मुद्दा असतो, की ‘काळ – जोखीम आणि परताव्याचे गणित’ जुळवणे. या संदर्भात गेल्या पंधरा वर्षांतील गुंतवणूकदारांच्या बदलत्या वर्गाचा अभ्यास करणे महत्त्वाचे ठरते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
सर्वमान्य गुंतवणूक पर्याय ते भांडवली बाजार
भारतातील गुंतवणूकदारांची अर्थसाक्षरता विकसनशील आणि विकसित राष्ट्रातील गुंतवणूकदारांच्या तुलनेत फारच बेताची आहे, हे वेगळे सांगायला नको. त्यासाठी गुंतवणूकदारांच्या मानसिकतेला दोष देण्यापेक्षा अर्थसाक्षरता वाढण्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत हे मान्य करायला हवे. परिणामी जोखीम पूर्णपणे वर्ज्य करून सरकारी हमी असलेल्या, तुलनात्मकदृष्ट्या कमी व्याजदर परतावा मिळाला तरी चालेल अशा गुंतवणूक पर्यायांमध्ये गुंतवणूकदारांचे प्राबल्य होते. प्रत्यक्ष शेअरच्या माध्यमातून भांडवली बाजारात गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार अगदी दोन टक्केसुद्धा नाहीत. वर्ष १९९१ नंतर टप्प्याटप्प्याने पंधरा वर्षांमध्ये भांडवली बाजारामध्ये सुधारणा झाल्या. त्यासंबंधी माहिती देणारे माध्यमातील लेख वाढू लागले. व्यावसायिक गुंतवणुकीबद्दल चर्चा होऊ लागली. आपला दृष्टिकोन बदलायला हवा हा विचार मनात येऊ लागला. याला दोन गोष्टी कारणीभूत ठरल्या. त्यातील पहिली म्हणजे सेवा क्षेत्रात झालेल्या भरभराटीमुळे ज्या नव्या पिढीतील गुंतवणूकदारांच्या हातात पैसा खेळू लागला त्यांना तो पैसा पारंपरिक माध्यमांमध्ये गुंतवण्याची इच्छा नव्हती. कारण म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय उपलब्ध झाला होता. दुसरी गोष्ट इंटरनेटच्या वाढत्या जाळ्यामुळे गुंतवणूक सुलभ झाली. आज भारताचा खासगी क्षेत्रातील म्युच्युअल फंड व्यवसाय तिशीत पदार्पण करून चाळिशीकडे झुकत असताना गुंतवणूकदारांच्या ‘क्रमांक १’ च्या पसंतीचा पर्याय ठरू लागला आहे ही आशादायक आणि उत्साहवर्धक बाब आहे.
हेही वाचा – Money Mantra: सलग तीन दिवसाच्या घसरणीसह आठवड्याचा शेवट
उत्साही आणि अभ्यासू
याच टप्प्यावर गुंतवणूकदारांचे जोखीम मूल्यमापन करण्यातील यश किंवा अपयश समजून घ्यायला हवे. शेअर बाजारात गुंतवणूक करताना किंवा फंडात गुंतवणूक करताना नेमका कोणत्या गोष्टीचा अभ्यास करायचा असतो याचा अंदाज न आल्याने किंवा तशी जाणीव नसल्याने कुणाच्यातरी फुकट दिलेल्या सल्ल्याने किंवा भरवशाने आपले पैसे बाजारात ‘लावण्याचा’ प्रकार अजूनही सर्रासपणे घडताना दिसतो. ज्यावेळी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सने पाच अंकी टप्पासुद्धा गाठला नव्हता आणि आता ७०,००० अंशांकडे वाटचाल करतो आहे, अशा वेळीदेखील जोखीम आणि गुंतवणूक यांचा अभ्यास तेवढाच महत्त्वाचा ठरतो.
कंपनीचा वार्षिक आणि तिमाही ताळेबंद, नफा आणि विक्रीचे आकडे, कंपनीच्या यशासाठी आणि भविष्यातील प्रगतीसाठी संचालक मंडळ आखत असलेल्या दीर्घकालीन योजना, संचालक मंडळ करत असलेले दीर्घकालीन नियोजन याचा अभ्यास आपण त्या कंपनीच्या शेअरमध्ये पैसे गुंतवण्याच्या आधी करतो का? हा प्रश्न प्रातःस्मरणीय आहे.
हेही वाचा – Money Mantra: प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची
बहुप्रसवाची नशा
भांडवली बाजारात दीर्घकाळाचा विचार करून शेअरमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून मोठी संपत्ती निर्मिती होऊ शकते, त्याचबरोबर रीतसर अभ्यास करून आपले स्वतःचे ठोकताळे बांधण्याची शैली विकसित करून जर ‘ट्रेडिंग’ केले तर त्यातून मासिक उत्पन्नसुद्धा मिळवता येते असा सारासार विचार करण्याच्या ऐवजी नव्याने भांडवली बाजारात पाऊल ठेवलेले गुंतवणूकदार ‘अल्पावधीतच मालामाल करणारे बहुप्रसवा शेअर म्हणजेच मल्टिबॅगर’ शोधायचा प्रयत्न करतात. शिवाय तसे शेअर कसे शोधायचे हे सांगणाऱ्या कोर्स आणि क्लासेसमध्ये प्रवेश घेतात. त्यातून नक्की कोण मल्टिबॅगर होते? हा मुद्दा बाजूलाच राहिला. लार्जकॅपपेक्षा मिडकॅपमध्ये आणि स्मॉलकॅपमध्ये कमी कालावधीत घसघशीत परतावा आहे, म्हणून तिकडेच सगळे पैसे गुंतवणारे भलतीच जोखीम घेत असतात. गेल्या चार वर्षांमध्ये मिडकॅप आणि स्मॉलकॅपची कामगिरी उल्लेखनीय राहिली आहे. सेन्सेक्स आणि निफ्टीच्या तुलनेत मिडकॅप आणि स्मॉलकॅपमधील परतावा आकर्षक आहे. परिणामी म्युच्युअल फंडाच्या मध्यमातून मिडकॅप आणि स्मॉलकॅप फंडांमध्येदेखील गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे.
भारतीय शेअर बाजारांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांचे स्थान आजही अबाधित आहे. बाजारात प्रचंड संख्येने येणारा पैसा परदेशी गुंतवणूकदारांच्या मार्फतच येतो. त्यामुळे त्यांनी बाजारातून निधी काढला की बाजार कोसळत होता. आता मात्र त्यामध्ये बदल होऊन भारतीय संस्थात्मक गुंतवणूकदार यांनी पडत्या बाजारात केलेली शेअरची खरेदी बाजारात तेजी आणते आहे, ही एक दिलासादायक आणि अभिमानाची बाब आहे.
पोर्टफोलिओ हवा ‘अल्बम’ नको
वरील वाक्यप्रयोगामुळे तुम्हाला हसू आले तरी हरकत नाही, पण नव्या गुंतवणूकदारांचे नवलाईचे दिवस हे सर्व काही अनुभवण्याचे असतात. बाजारात आलेल्या प्रत्येक प्रारंभिक समभाग विक्रीमध्ये (आयपीओ) सहभागी होणे आणि म्युच्युअल फंडाच्या प्रत्येक नव्या योजनेमध्ये गुंतवणूक करणे ही सवय ( किंवा हौस म्हणू या !) अनेक गुंतवणूकदारांना असते. परिणामी आपल्या पोर्टफोलिओचा एकूण परतावा चांगला दिसला तरी, त्यातील चुकीचे गुंतवणूक निर्णय त्यात दडलेले असतात. आपण अशा भ्रमामध्ये राहतो की, आपला पोर्टफोलिओ उत्तम परतावा देत आहे.
हेही वाचा – Money Mantra: एक आकर्षक पण दुर्लक्षित विमा योजना- Whole Life Insurance Policy
भाकरी फिरवायला हवी
गुंतवणूकदारांनी आपल्या पोर्टफोलिओतील शेअर किमान दर सहा महिन्यांनी तपासून पाहून त्या कंपनीच्या व्यवसायामध्ये काही धोका तर नाही ना? कंपनीच्या व्यवस्थापनाने घेतलेल्या एखाद्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम कंपनीच्या किमतीवर दिसत नाही ना? एखाद्या बदललेल्या सरकारी धोरणामुळे ती कंपनी वाटते तितकी आकर्षक राहिली आहे का? असे जोखीमविषयक मुद्दे ध्यानात घेऊन आपला गृहपाठ सुरू ठेवला पाहिजे. जे आकर्षक आहे ते नेहमीच चांगलेच असते असे नाही, हे प्रत्येक गुंतवणूकदाराने समजून घेतले पाहिजे.
बाजारातील धक्के आणि आपला पोर्टफोलिओ
हा लेख लिहीत असताना अमेरिकेतील सबप्राइम या अरिष्टाला पंधरा वर्षे पूर्ण झाल्याचे लक्षात आले. वर्ष २००३ ते २००८ या कालावधीत भारतीय बाजारांनी अभूतपूर्व घोडदौड अनुभवली. यामुळे अनेक नवोदित गुंतवणूकदार बाजारात आले. मात्र आपण कोणत्या मैदानावर उतरतो आहोत आणि त्या खेळपट्टीचा, वातावरणाचा, वाऱ्याच्या दिशेचा कोणताही अभ्यास न करता मैदानात उतरलेल्या खेळाडूचे जे होईल तेच त्यांचे झाले. देशाअंतर्गत किंवा आंतरराष्ट्रीय संकटांमुळे बाजारामध्ये अचानक पडझड झाली. यासाठीच अल्पकाळ, मध्यम काळ आणि दीर्घकाळ अशा विविध कालावधीच्या गुंतवणूक पर्यायांचा तुलनात्मक अभ्यास करायला हवा.
नवोदितांचे स्वागत आहेच, पण उत्साहाच्या भरात आपले पाऊल चुकीचे पडत नाही ना? याचा विचार पाहिजे तितक्या गांभीर्याने होताना दिसत नाही यासाठीच हा लेखप्रपंच.