निश्चित उत्पन्न देणाऱ्या गुंतवणुका जसे की बँकेच्या मुदत ठेवी, कर्ज रोखे किंवा मनी मार्केटमध्ये गुंतवणूक करणारे म्युच्युअल फंड गुंतवणुकीसाठी सुरक्षित समजले जातात. पण त्यातून मिळणारा परतावा समभागांतील गुंतवणुकीपेक्षा बऱ्याचदा कमी असतो. किंबहुना चांगली पत असलेल्या रोख्यांवर महागाईवर मात करेल इतकेही व्याज मिळताना फारसे दिसत नाही!

चांगल्या परतावा शक्यतेमुळे समभाग गुंतवणूक ही संपत्ती निर्मितीसाठी ओळखली जाते. पण त्यात जोखीम तुलनेने जास्त असते. तसेच सातत्याची हमी नसते! त्यामुळे अधिक परतावा मिळविण्यासाठी काही गुंतवणूकदार अतिरिक्त जोखीम घेऊन कमी पत (बिलो इन्व्हेस्टेबल ग्रेड) असणाऱ्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करताना दिसतात, पण यात समभागांपेक्षा जास्त धोका असल्याचेही दिसते. अशा परिस्थितीत निश्चित उत्पन्न देणाऱ्या साधनांत गुंतवणूकदारांनी गुंतवणूक का करावी असा प्रश्न अनेकांना पडतो. त्याच्या उत्तरासाठी हा लेखनप्रपंच!

१. दीर्घकाळात निश्चित उत्पन्न साधनांतील गुंतवणूक समभाग गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा मिळवू शकेल काय ?

समभाग गुंतवणूक दीर्घकालीन गुंतवणुकीवर दोन आकड्यांतला परतावा देताना दिसतात. पण रोखे गुंतवणुकीने विशिष्ट परिस्थितीत समभागांपेक्षा सरस कामगिरी केली आहे.

• २०१० ते २०१३ : ‘निफ्टी ५०’ने वार्षिक ४.८ टक्के परतावा दिला, तर दीर्घकालीन केंद्र सरकारच्या रोख्यांनी ८-९ टक्क्यांदरम्यान परतावा दिला.

• २००० ते २००३ : निर्देशांकात फारशी वाढ झाली नाही. परंतु ‘ट्रिपल ए’ पत असलेल्या कॉर्पोरेट रोख्यांनी वार्षिक १०-१२ टक्के परतावा दिला.

• २०२२ : मिड-कॅप आणि स्मॉल-कॅपमध्ये झपाट्याने तीव्र घसरण झाली. डेट फंडांनी ६-७ टक्के स्थिर परतावा दिला.

रोखे गुंतवणूक समभागांपेक्षा जास्त कमाई कधी करते ?

• घसरलेले व्याजदर – दीर्घकालीन रोखे भांडवली लाभ देतात.

• बाजार घसरणीच्या काळात – रोखे गुंतवणूक पोर्टफोलिओला स्थैर्य प्रदान करते.

• आर्थिक मंदी – समभाग गुंतवणुकीची कामगिरी आर्थिक मंदीच्या काळात खालावते. या काळात रोखे गुंतवणूक जोखीम-समायोजित चांगला परतावा देते. कॉर्पोरेट कमाईत घसरण झालेली असताना, निश्चित उत्पन्न गुंतवणूक अधिक आकर्षक बनते.

२. रोखे गुंतवणूक खरोखर सुरक्षित आहे का? रोखे गुंतवणुकीतील धोके कोणते आहेत?

रोखे गुंतवणुकीत दोन धोके असतात. पहिला मुद्दल परत न मिळण्याचा धोका ज्याला ‘क्रेडिट रिस्क’ असे म्हणतात. आणि दुसरा धोका व्याजदर वाढण्याचा धोका ज्याला ‘ड्युरेशन रिस्क’ असे म्हणतात.रोखे हे सहसा ‘सुरक्षित’ मानले जाते, परंतु त्यातही मुद्दल कमी होण्याचा धोका असतो.

इतिहासात मुद्दल बुडण्याचे अनेक प्रसंग येऊन गेले आहेत –

• आयएल अँण्ड एफएस घोटाळा (२०१८) : आयएल अँण्ड एफएस त्यांचे दायीत्व पूर्ण करण्यास असमर्थ ठरल्याने रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांचे प्रचंड नुकसान झाले.

• फ्रँकलिन टेम्पल्टन संकट (२०२०): फ्रँकलिन टेम्पल्टनच्या अनेक फंड गुंतवणूकदारांना त्यांचे पैसे काढता आले नाहीत.

• डीएचएफएल बाँड डिफॉल्ट (२०१९): अनेक फंडांनी डीएचएफएलच्या रोख्यांत केलेली गुंतवणूक मुदतपूर्तीनंतर मुद्दल आणि व्याज न मिळाल्याने युनिटधारकांच्या भांडवलाचे नुकसान झाले.

व्याजदर वाढीची जोखीम – जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा रोख्यांच्या किमती कमी होतात, पोर्टफोलिओचे बाजार मूल्य कमी होते.

• उदाहरण: १० मे २०२२ पासून रिझर्व्ह बँकेच्या रेपो दर वाढीमुळे दीर्घ मुदतीच्या रोख्यांच्या किमतीत मोठी घट झाली.

पत आणि तरलता जोखीम –

• कमी मानांकन असलेल्या कॉर्पोरेट रोख्यांमध्ये मुद्दल बुडण्याची किंवा घटण्याची जोखीम.

• उदाहरण: २०१८ मध्ये आयएल अँण्ड एफएस संकटानंतर अनेक एनबीएफसी रोख्यांचे मूल्य घटले. कुठलीही गुंतवणूक जोखीम मुक्त नसते तसे रोखे गुंतवणूकसुद्धा जोखीममुक्त नसते. कमी पत असलेल्या रोख्यांची निवड किंवा वाढत्या व्याज दरांमुळे मुद्दलात घट होऊ शकते.

३. उच्च पत असलेले रोखेदेखील नेहमीच करपश्चात महागाईपेक्षा अधिक परतावा देत नाहीत

३.१ भारतातील सर्वोच्च सुरक्षित रोखे गुंतवणूकीचे करोत्तर परतावे

• मुदत ठेवी: सध्या बँकेच्या मुदत ठेवींवर ६.५ ते ७.५ टक्के करपूर्व व्याज दर आहेत. परंतु करोत्तर परताव्याचा दर केवळ ४-५ टक्केच असल्याने या ठेवी महागाईपेक्षा अधिक परतावा मिळवीत नाहीत.

• सरकारी रोखे (जी-सेक): सुरक्षित, परंतु दीर्घकालीन उत्पन्न ६.५ ते ७ टक्के, जे महागाईशी जुळणारे आहे. परंतु व्याजावर कर द्यावा लागतो.

• सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (पीपीएफ): ७.१० टक्के करमुक्त परतावा, परंतु १५ वर्ष पैसे काढता येत नाहीत त्यामुळे मर्यादित रोकडसुलभता हा पर्याय कमी आकर्षक बनवते.

३.२ महागाई आणि कर आकारणी हे वास्तवातील व्याज कमी करतातमहागाई ६ टक्के असल्यास, बहुतेक निश्चित-उत्पन्न पर्याय केवळ क्रयशक्ती राखतात.

३.३ जास्त परतावा मिळविण्यासाठी, गुंतवणूकदारांना कमी पत असलेल्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करणे क्रमप्राप्त होते.

महागाईवर मात करण्यासाठी, रोखे गुंतवणूकदारांनी यामध्ये जोखीम घेणे आवश्यक ठरते:

• क्रेडिट रिस्क फंड: ‘डबल ए’ किंवा ‘ए’ पत असलेल्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करतात. या फंडांनी ८ ते १० टक्क्यांदरम्यान परतावा मिळविला असला तरी मुद्दल गमावण्याचा धोका असतो.

• कॉर्पोरेट बाँड फंड: उच्च उत्पन्न, परंतु जोखीम कमी असलेला फंड निवडा.

• एनबीएफसी आणि शाश्वत बाँड्स: ९ % ऑफर, परंतु कमी अथवा रोकडसुलभ नसतात.

समस्या: कर्जातील जोखीम समभाग गुंतवणुकीप्रमाणे अस्थिर असू शकते.

• आयएल अँण्ड एफएस (२०१८), डीएचएफएल (२०१९), फ्रँकलिन टेम्पलटन (२०२०): गुंतवणूकदारांनी डेट फंडातील मुद्दल गमावले आहे.

४ तर मग रोखे गुंतवणूक करावीच का?

४.१ पोर्टफोलिओ स्थिरता आणि विविधतारोखे गुंतवणूक अस्थिरता कमी करते आणि अरिष्टाच्या स्थितीतीही पोर्टफोलिओचे मूल्यात मोठी घट होण्याचा धोका टाळता येतो.

• २००८ मध्ये वैश्विक आर्थिक संकटामुळे समभागांचे मूल्य ५० टक्क्यांनी घसरले, तर डेट फंड स्थिर राहिले.

४.२ आणीबाणीसाठी रोकड सुलभता

• समभागांच्या किंमती अस्थिर असल्याने डेट फंड रोकडसुलभ असतात. आणीबाणी प्रसंगी पैसे उभे करणे सहज शक्य असते.

• करोना टाळेबंदी २०२० : अनेक गुंतवणूकदारांनी तरलतेच्या गरजेमुळे तोट्यात समभाग विकले

४.३ विशिष्ट बाजार आवर्तनात रोखे गुंतवणूक ही रणनीती आहे.

• जेव्हा व्याजदर वर असतात आणि कमी होण्याची अपेक्षा असते (जसे उद्यापासून सुरू होणाऱ्या पतधोरण आढाव्यात रिझर्व्ह बँकेकडून व्याज दर कपात अपेक्षित आहे) , तेव्हा दीर्घ मुदतीचे रोखे भांडवली लाभ मिळवून देतात.

• उदाहरण: २०२०-२०२१ मध्ये रिझर्व्ह बँकेने रेपो दर आजवरच्या ऐतिहासिक तळाला आणून ठेवले. या व्याज कपातीमुळे गिल्ट फंडांमध्ये दुहेरी आकड्यात नफा झाला.

४.४ सेवानिवृत्ती आणि उत्पन्न स्थिरता

• सेवानिवृत्तांना स्थिर उत्पन्न आवश्यक आहे, जे समभाग गुंतवणूक देऊ शकत नाही .

• ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एससीएसएस), रोखे गुंतवणुकीतून ‘एसडब्ल्यूपी’ दैनंदिन खर्चासाठी रोकड उपलब्ध करून देऊ शकते.

४.५ अल्प-मुदतीच्या उद्दिष्टांसाठी योग्य साधन

• पुढील १ ते ३ वर्षासाठी लागणारे पैसे (घरखरेदी, शिक्षण) समभागासारख्या अस्थिर मालमत्तेत गुंतवू नयेत.

• रोखे गुंतवणूक अशा वित्तीय ध्येयांसाठी आदर्श साधन आहे.

५ . निष्कर्ष: रोखे गुंतवणुकीसाठी योग्य दृष्टिकोन१. रोखे गुंतवणूक आर्थिक आवर्तनाच्या काही टप्प्यांमध्येच अधिक परतावा देते

२. मंदीच्या काळात भारतीय रोखे आणि डेट फंडांनी समभाग गुंतवणुकीपेक्षा अधिक परतावा दिला आहे.

३. रोखे गुंतवणूक ही जोखीममुक्त नाही (मुद्दल गमावण्याचा धोका व्याजदर वाढण्याची जोखीम आणि रोकड सुलभता या समस्या मुद्दल कमी करू शकतात.)

४. चांगली पत असलेले रोखे नेहमीच महागाईवर मात करू शकत नाहीत. (जसे बँकांच्या एफडी आणि पीपीएफ हे करपश्चात आकर्षक परतावा देत नाहीत, बचतीचे मूल्य जेमतेम टिकवून ठेवतात.)

५. समभाग संपत्ती निर्माण करतात परंतु ते अस्थिर असतात.

६. रोख्यांचा पोर्टफोलिओ तुलनेने स्थिर आणि रोकड सुलभ असतो. अल्पकालीन उद्दिष्टांसाठी या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत.

७. समतोल पोर्टफोलिओमध्ये स्थिरतेसाठी कर्ज आणि वाढीसाठी इक्विटी यांची सांगड घातली पाहिजे.रोखे गुंतवणूक टाळणे धोक्याचे आहे, तसेच त्यावर अतिरिक्त विसंबून राहाणेसुद्धा धोक्याचे आहे.