बाजाराचा विकास आणि बाजाराला प्रगतिपथावर नेणारी अनेक माणसे या सदरात आजवर आली. काही माणसे बाजारात पायाचा दगड म्हणून काम करतात. पण हा बाजार अतिशय क्रूर आहे तो अशा माणसांचे योगदान विसरतो. अशांपैकी एक त्या वेळच्या भारतीय युनिट ट्रस्ट या संस्थेचे कार्यकारी विश्वस्त आणि त्यानंतर म्युच्युअल फंडाची शिखर संस्था ‘ॲम्फी’ला भक्कम पायावर उभा करणारे ए. पी. कुरियन यांचा उल्लेख करावा लागेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कुरियन यांचा जन्म २६ जून १९३३ ला केरळमध्ये झाला. केरळचा हा पहिला विद्यार्थी की जो अर्थशास्त्र व संख्याशास्त्र यात द्विपदवीधर झाला. १९६१ ते १९७५ पहिल्या श्रेणीचे रिसर्च ऑफिसर म्हणून रिझर्व्ह बँकेत त्यांच्या कारकीर्दीची प्रगती सुरू झाली. रिझर्व्ह बँकेत ग्रामीण अर्थशास्त्र, ग्रामीण पाहणी संचालक, ग्रामीण पतपुरवठा अशी अनेक वर्षे जबाबदाऱ्या सांभाळल्यानंतर ते भारतीय युनिट ट्रस्ट या संस्थेच्या सेवेत आले. त्या ठिकाणी डायरेक्टर इन्व्हेस्टमेंट, डायरेक्टर प्लॅनिंग ॲण्ड डेव्हलपमेंट, चीफ जनरल मॅनेजर – प्लॅनिंग ॲण्ड डेव्हलपमेंट, सिस्टीम्स, ऑपरेशन्स, इंटरनॅशनल मार्केटिंग आणि ऑडिट डिपार्टमेंट अशा जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. १९८७ ते १९९३ एक्झिक्युटिव्ह ट्रस्टी, यूटीआय म्हणून त्यांनी काम बघितले. त्या ठिकाणी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या स्वीकारल्या. भारताच्या कानाकोपऱ्यात खेड्यापाड्यात फिरून त्यांनी या संस्थेची मुळे रुजवली. ही कामे करीत असताना अनेक आव्हानांना त्यांनी तोंड दिले.

हेही वाचा…खिशात नाही आणा…

त्या काळात संस्थेला ठिकठिकाणी शाखा सुरू करता येणे शक्य नव्हते. म्हणून मग जिल्ह्याचा मुख्य प्रतिनिधी अशी देशातल्या प्रमुख जिल्ह्यांत विविध व्यक्तींची नियुक्ती करून त्यांच्या हाताखाली गुंतवणूक प्रतिनिधीचे जाळे निर्माण करण्याचे ठरले. प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या दृष्टीने हे अतिशय कठीण काम कुरियन यांनी करून दाखवले. पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे देशाच्या कानाकोपऱ्यात ते जायचे. युनिट ट्रस्ट संकल्पना समजावून सांगायची, अल्पबचत प्रतिनिधी, विमा कंपनीचे प्रतिनिधी यांना यूटीआय एजंट म्हणून काम करण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे प्रयत्न त्यांनी कसोशीने केले. हे करत असताना जर्मन बुंदेसबँक या ठिकाणी एक्स्चेंज प्रोग्राममध्ये जर्मनीला जाणे, बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट, बेसल, बँक ऑफ फ्रान्स, बँक ऑफ इंग्लंड अशा विविध परदेशी बँकांत जाऊन त्या ठिकाणी त्यांनी त्या संस्थांना मदत केली. श्रीलंकेतही युनिट ट्रस्ट सुरू करण्यासाठी त्या देशाला कुरियन यांनी मदत केली.

यूटीआय या संस्थेतून १९९३ ला निवृत्त झाल्यानंतर ते घरी बसले नाहीत, तर ॲपल फायनान्स या कंपनीला ॲपल म्युच्युअल फंड हा खासगी क्षेत्रातील म्युच्युअल फंड सुरू करण्यासाठी मोलाचे योगदान केले. हळूहळू देशात बँकांनी स्थापन केलेले म्युच्युअल फंड्स, विमा कंपन्यांनी सुरू केलेले म्युच्युअल फंडस्, परदेशातून भारतात आलेले म्युच्युअल फंड्स अशा विविध म्युच्युअल फंडांना एकत्र आणून या सर्व म्युच्युअल फंडांची शिखर संस्था म्हणून ‘ॲम्फी’ या संस्थेची कुरियन यांनी निर्मिती केली. १९९८ ला ते या संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष झाले. १९९८ ते २४ फेब्रुवारी २०१० एवढी वर्षे त्यांनी ही संस्था सांभाळली. या संस्थेला मोठे केले आणि हे करत असताना सेबी, रिझर्व्ह बँक, भारत सरकार या सर्वांमध्ये समन्वय करून ॲम्फी संस्थेची नियमावली तयार केली. म्युच्युअल फंडात काम करणाऱ्या प्रतिनिधींचे व्यावसायिक ज्ञान वाढविणे व त्यांना गुंतवणूक प्रतिनिधी म्हणून योग्य रीतीने काम करण्यासाठी चौकट निर्माण करणे हे अत्यंत महत्त्वाचे काम कुरियन यांनी केले. ‘ॲम्फी’चे शिष्टमंडळ कुरियन यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेत गेले, आपल्यासारखी त्या ठिकाणी काम करणारी सिक्युरिटी एक्स्चेंज कमिशनशी (एसईसी) संपर्क साधून भांडवल बाजाराची प्रगती कशी होईल यासाठी त्यांनी प्रयत्न केले. काही काळ जिओजित बीएनपी परिबा फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीचे ते अध्यक्ष होते. तसेच ग्रॅन्युअल इंडिया, मुथूट कॅपिटल सर्व्हिसेस, मुथूट फिनकॉर्प, नॅशनल स्टॉक एक्स्चेंज या कंपन्यांचे ते स्वतंत्र संचालक होते. १९८७ ला त्यांना इन्स्टिटयूट ऑफ मार्केटिंग या संस्थेने ‘बेस्ट मार्केटिंग मॅन ऑफ द इयर’ म्हणून सन्मानित केले, तर १९९३ ला आयएमएन या संस्थेने ‘बेस्ट प्रोफेशनल मॅनेजर’ म्हणून त्यांची निवड केली तर १३ फेब्रुवारी २०१८ ला बीएनबी परिबा या संस्थेने जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला.

हेही वाचा…बांगलादेशातील अराजकता अन् कापूस उत्पादकांना लाभ

आयुष्यभर या माणसाने भांडवल बाजार देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. म्युच्युअल फंड व्यवसायाचे रोपटे रुजले आणि आता वाढू लागले आहे. यामुळे जुन्या व्यक्तींनी भांडवल बाजार वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न व त्या काळात आलेल्या अडचणी याची जाणीव आज या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना असायला हवी. या काळात अनेक संघर्ष झाले. युनिट ट्रस्ट या संस्थेच्या ‘युनिट स्कीम १९६४’ या योजनेने असंख्य वादळांना तोंड दिले. संस्थेचे अध्यक्ष बदलले आणि वेळोवेळी नवनवीन योजना आणण्यासाठी नियोजन करणे, त्याची अंमलबजावणी करणे, १९८६ साली सुरू झालेली मास्टर शेअर ही योजना, मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी बालभेट योजना अशा अनेक योजना आणण्यात कुरियन यांचा पुढाकार होता. बँका तांत्रिकदृष्ट्या प्रगत झाल्याने नियमित गुंतवणूक पद्धत (एसआयपी) रुळली. परंतु गुंतवणुकीचे तर सोडाच, बँकेकडून कर्ज घेतलेल्या व्यक्तीला पुढच्या तारखांचे (पोस्टडेटेड) धनादेश बँकेला देऊन ठेवावे लागायचे, ही त्या वेळची वस्तुस्थिती होती. रस्ता सुरळीत झाल्यानंतर वेगाने प्रवास करणे सोपे असते, पण रस्ता निर्माण करण्याचे काम कठीण असते जे कुरियन यांनी केले.

रिझर्व्ह बँकेकडून भारतीय युनिट ट्रस्ट या संस्थेकडे १९७५ मध्ये कुरियन आले याचा उल्लेख सुरुवातीला केला आहे. जेम्स एस. राज. त्या वेळेस यूटीआयचे अध्यक्ष होते. त्यांनी संस्थेचा निधी वाढविण्यासाठी नवीन नवीन गुंतवणूक योजना आणायला कुरियन यांना सांगितले. त्यासाठी संस्थेत नियोजन आणि विकास असा एक नवा विभाग सुरू केला. या विभागात सुरुवातीला फक्त तीन कर्मचारी होते. या तिघांनी ‘युनिट स्कीम १९६४’चा एक भाग म्हणून बालभेट विकास अशी योजना सुरू केली. याचबरोबर ज्या व्यक्तींना मासिक उत्पन्नाची योजना हवी होती त्यांच्यासाठी मासिक उत्पन्न योजना आणली. निवृत्त झालेले, विधवा स्त्रिया, अपंग व्यक्ती यांच्याकरिता विशेष योजना त्यांची गरज म्हणून सुरू केली. एम. जे. फेरवाणी यांच्या अध्यक्षीय कालखंडात खूप नवीन नवीन योजना आल्या. एका योजनेचा जन्म तर ट्रेनमध्ये झाला. फेरवाणी आणि कुरियन शाखेच्या उदघाट्नाला ट्रेनने जात होते, त्या वेळेस कुरियन यांनी त्यांच्या डोक्यातली संकल्पना फेरवाणी यांना सांगितली. ‘शेअर ऑफ शेअर’ असे नाव सुचले. १५ ऑक्टोबर १९८६ ला ही योजना प्रत्यक्षात आली त्या वेळेस तिचे ‘मास्टर शेअर’ असे नामकरण झाले. त्यानंतर मग मास्टर प्लस, मास्टर गेन अशा योजना आल्या. गुंतवणूकदार त्या वेळेस बँकेच्या ठेव योजना किंवा पोस्ट ऑफिसच्या योजना किंवा कंपनीच्या ठेव योजना कर्जरोखे यांचाच फक्त गुंतवणुकीसाठी विचार करायचे. योजनेचा सर्व पैसा शेअर्समध्येच गुंतविला जाईल अशी योजना सर्वप्रथम यूटीआयने आणली. बाजारासाठी कुरियन यांनी हे फार महत्त्वाचे काम केले. कुरियन त्या वेळेस गमतीने असे म्हणायचे – ‘पाळण्यातल्या लहान मुलांपासून आराम खुर्चीतल्या वृद्ध अशा सर्व प्रकारच्या व्यक्तींसाठी यूटीआयकडे गुंतवणूक योजना आहेत.’ अरुण गजानन जोशी यांना बरोबर घेऊन सातारा, सांगली, कोल्हापूर, अमरावती, बुलढाणा, अकोला, नागपूर अशा असंख्य ठिकाणी कधी बसने, कधी ट्रेनने जायचे. महिन्यातले २५ दिवस त्यांचा प्रवास चालायचा. अशा पद्धतीने एक लाखापेक्षा जास्त गुंतवणूक प्रतिनिधी कुरियन यांनी तयार केले. जिल्ह्यासाठी मुख्य प्रतिनिधीची नेमणूक करणे असा नवीन उपक्रम त्यांनी सुरू केला. बाजाराची आजची इमारत ही उभी राहिली ती अशा व्यक्तींमुळे.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Executive trustee of bharatiya unit trust and apex body of mutual funds a p kurian print eco news sud 02