डॉ. आशीष थत्ते
चारचाकी गाडी घेणे एकेकाळी फक्त श्रीमंतांनाच शक्य व्हायचे. हळूहळू उच्च मध्यमवर्गीय आणि आता मध्यमवर्गीय लोकदेखील चारचाकी वाहन सहज घेतात. म्हणजे वाहन केवळ श्रीमंतांची गरज किंवा हौसेपुरती मर्यादित राहिलेली नाही. अजूनही जुन्या गाड्या ज्यांना ‘विंटेज कार’ असे म्हणतात त्या बऱ्याच श्रीमंतांकडे किंवा अति श्रीमंतांकडे दिसतात. उच्च मध्यमवर्गीयदेखील गुंतवणूक आणि हौस म्हणून विंटेज कार घेतील, असे दिवसदेखील लवकरच प्रत्यक्षात येतील. मागील लेखात आपण पुरातन वस्तूंची माहिती घेतली. मात्र तुम्ही म्हणाल की, जुन्या चारचाकी वाहनालादेखील पुरातन म्हणा विंटेज का म्हणता? ढोबळमानाने बघितल्यास, विंटेज कार म्हणजे सुमारे ४० ते ५० वर्षे जुने आणि त्याहूनही जुन्या असलेल्या वाहनाला म्हटले जाते. चार चाकी वाहनाच्या बाबतीत विंटेज हा शब्द अगदी सामान्य आहे.
विंटेज वाहनातील गुंतवणूक तशी निश्चित महाग आहे. पण याचेदेखील काही दृश्यमान फायदे आहेत. ज्यांच्याकडे गाडी ठेवायला जागा आहे त्यांनी तर नक्कीच विचार करायला हवा. हल्ली जुन्या किंवा विंटेज कार ६ ते ७ लाखांपासून उपलब्ध होतात. त्यातील काही सुस्थितीत म्हणजे रोजच्या वापरातल्यादेखील आहेत. पण जवळचे अंतर कापण्यासाठीच त्या वापरल्या जाऊ शकतात. विंटेज कार खरेदीअगदीच परवडणारी नसेल तर अशा गुंतवणूकदारांना दुचाकी खरेदीचा पर्यायदेखील आहे.
हेही वाचा >>>Money Mantra: पोस्ट ऑफिस की एसबीआय कोणत्या RD वर मिळतेय सर्वाधिक व्याज? १०० रुपयांपासून गुंतवणूक करता येणार
मुंबई आणि सर्वच मोठ्या शहरांमध्ये विंटेज कारचे प्रदर्शन भरवण्यात येते. ही वाहने कित्येक वर्षे जुनी असल्याने या वाहनांचे सुटे भाग मिळण्यास अडचणी येतात. बहुतेकदा तर मिळत नाहीत किंवा ते सुटे भाग दुर्मीळ असल्याने कमालीचे महाग असतात. त्यामुळे एखादे जुने वाहन घेऊन ते दुरुस्त केल्यास त्याचा भाव निश्चित वाढतो. त्यातसुद्धा एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने वापरलेले वाहन असेल तर त्याची किंमत अधिकच वाढते. तुम्ही खरेच उत्साही आणि अतिश्रीमंतदेखील असाल तर वाहन चक्क परदेशातून आणू शकता. प्रत्येक वाहनाचे काहीना काही वैशिष्ट्य असू शकते. जसे, एखादे नवीन तंत्रज्ञान त्यात वापरले असणे, एखादी गाडी दुर्लभ असणे किंवा दिसायला अतिशय सुंदर असणे वगैरे. ही वैशिष्ट्ये वाहनाला अधिक भाव मिळवून देतात.
हेही वाचा >>>Money Mantra: प्रश्नं तुमचे, उत्तरं आमची- म्युच्युअल फंडात प्रथमच गुंतवणूक करण्याची प्रक्रिया कशी असते?
नवीन काळात विंटेज कार किंवा दुचाकी तुम्हाला वेगवेगळ्या संकेतस्थळांच्या माध्यमातून ऑनलाइनदेखील मिळतात. भारतातील इतर शहरातूनदेखील तुम्ही असे वाहन सहज खरेदी करू शकता. अर्थात वाहनासाठी जागा आवश्यक असते. त्यामुळे अशी विंटेज कार खरेदी करून कुठे सुरक्षितरीत्या उभी करायची हे निश्चित करून खरेदी करा. अशा वाहनांची खरेदी-विक्री करताना कायदे आणि नियमांचे पालन करावे लागते. म्हणजेच वाहन विकल्यानंतर होणारा नफा भांडवलवाढीच्या करास पात्र असतो. भारतीय मोटर कायद्याप्रमाणे प्रत्येक गाडीची नोंदणी असणे आवश्यक असते. थोडक्यात काय तर ज्याला आवड आहे, गाडीची माहिती आहे त्यांनीच या विंटेज कार गुंतवणुकीकडे वळावे. अन्यथा अमोल पालेकर यांचा वर्ष १९७६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘छोटीसी बात’ चित्रपटातील मोटरसायकल खरेदी-विक्रीचा प्रसंग आठवा. माहिती नसताना वाहन खरेदी केले तर कर्नल ज्युलिअस नागेंद्रनाथ विल्फ्रेड सिंग म्हणजे अशोक कुमार प्रत्येक वेळेला सध्या गाडीची विंटेज करून देणार नाहीत!
@AshishThatte / ashishpthatte@gmail.com