अजय वाळिंबे
‘माझा पोर्टफोलियो’ या साप्ताहिक सदरातून गुंतवणुकीसाठी शेअर्स सुचविले जातात. हे सुचविलेले शेअर्स म्हणजे खरेदीची ‘टिप’ नसून एक अभ्यासपूर्ण विवेचन असते. तुमचा पोर्टफोलियो तयार करताना सदरात सुचवलेल्या समभागाचा देखील विचार करावा, परंतु तो स्वतः अभ्यासून. या सदराचे उद्दिष्ट केवळ सुचवलेले समभाग खरेदी करणे हे नसून वाचक गुंतवणूकदारांनी दिलेल्या गुणोत्तराखेरीज आपलेही इतर निकष लावून मगच गुंतणूक करावी हा आहे. अनेक वाचकांनी पोर्टफोलियो म्हणजे काय? तो कसा करावा, समभाग कसे निवडावेत किंवा समभाग निवडताना इतर कुठले निकष लावावेत असे प्रश्न विचारले होते. दर महिन्यातील दुसऱ्या सोमवारी आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे उमजून घेणार आहोत.
सखोल परीक्षण
कुठल्याही कंपनीच्या समभागामध्ये गुंतवणूक करण्याआधी गुंतवणूकदाराने त्या कंपनीची संपूर्ण माहिती अभ्यासणे आवश्यक आहे. यात अर्थात प्रवर्तक तसेच स्पर्धेतील इतर कंपन्यांचे संशोधनही आलेच. जाणकार गुंतवणूकदार ‘फंडामेंटल ॲनालिसिस’ करताना काही महत्त्वाची गुणोत्तरे तपासून मग निर्णयाप्रत येतो. आपण गेल्या काही लेखांतून महत्त्वाच्या गुणोत्तरांचा अभ्यास करत आलो आहोत.
हेही वाचा >>> Money Mantra : ‘एसआयपी’च्या माध्यमातून संपत्ती निर्मिती
सध्याचा काळ इंटरनेटचा काळ असल्याने आता सर्वच माहिती आणि गुणोत्तरांचे प्रमाण क्षणात उपलब्ध होते. मात्र तरीही अनेक गुंतवणूकदारांचे नुकसान होताना दिसते. हे बहुधा सखोल परीक्षण केले नसल्याने होत असावे. कारण केवळ इंटरनेटवरील किंवा कंपनीच्या संकेतस्थळावरील महितीवर अवलंबून न राहता त्याच्या बरोबरीने त्या कंपनी संबंधात इतर काही माहिती उपलब्ध आहे का, हे तपासणे गरजेचे आहे. मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) यांच्या संकेतस्थळावर जाऊन कंपन्यांची गुंतवणूकदारांसाठी उपलब्ध असलेली माहिती आणि इतर अहवालातील माहिती यासाठी उपयुक्त ठरते. कंपन्यांचे वार्षिक अहवाल अभ्यासून मुख्यत्वे संचालक मंडळाचा अहवाल आणि लेखापरीक्षकाचा अहवाल वाचून बरीच उपयुक्त माहिती कळते. काही कंपन्यांची व्यवस्थापने आपल्या भागधारकांना पूर्ण अंधारात ठेवून आपले ईप्सित साध्य करीत असतात. कंपनी मुदत ठेव योजना हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. ‘हिंदू बिझनेस लाइन’ या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या एका माहितीनुसार, सप्टेंबर २०१६ पासून एल्डर फार्मा, प्लेथिको फार्मा, वालेचा इंजिनीअरिंग, युनिटेक, जेपी असोसिएट, जेपी इन्फ्रा, झेनिथ बिर्ला, डीएसके अशा अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांची १२,००० कोटींहून अधिक रक्कम अडकली आहे. या सर्व कंपन्यांवर दिवाळखोरी प्रक्रिया विविध न्यायाधिकरणांपुढे सध्या सुरू आहे. केवळ २ टक्के जास्त व्याजाच्या हव्यासापायी अनेक वरिष्ठ नागरिकांनी मोठी रक्कम यात गुंतवली आहे. या सर्व कंपन्यांचे समभाग शेअर बाजारात खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध होते किंवा आहेत हे विशेष. दिवाळखोरीत असलेल्या कंपन्यांच्या समभागात होणारी उलाढाल तसेच भावात येणारी तेजी हाही चिंतेचा तसेच गंभीर विषय आहे. अनेक सामान्य गुंतवणूकदार अशा जाळ्यात फसू शकतात.
योग्यवेळी खरेदी- विक्री
भांडवली बाजारात सर्वात महत्त्वाचे काय असा प्रश्न विचारला, तर त्याचे उत्तर संयम आणि निर्णय असेच देता येईल. प्रत्येक वेळी घेतलेला निर्णय हा योग्य की अयोग्य ते काळच सांगत असतो. मात्र बऱ्याचदा आपण घेतलेला समभाग हा खरेदी केलेल्या दिवसापासून त्याची किंमत पडायला सुरुवात होते किंवा बरेच दिवस अपेक्षेने ठेवलेला एखादा समभाग विकताच त्याची किंमत लागलीच वरच्या दिशेने जाऊ लागते. यात नशिबाचा भाग असलाच तरीही असे नुकसान टाळण्यासाठी नियोजन करून टप्प्यप्प्प्याने खरेदी- विक्रीचे धोरण ठेवावे म्हणजे असे नुकसान कमी होऊ शकते. उदाहरणार्थ, तुमच्याकडे एखाद्या कंपनीचे १,००० समभाग असतील तर विक्री करते वेळी किंवा खरेदी करताना एकावेळी केवळ १००-२०० समभाग विक्री/खरेदी करावी. सर्वसामान्य गुंतवणूकदार अनेकदा मंदीत विक्री तर तेजीत खरेदीचे धोरण अवलंबताना दिसतात. अर्थात त्याची परिणती म्हणजे नुकसान सोसावे लागते. तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर तुमचा विश्वास असला तर बाजारात कितीही चढ-उतार आले तरी संयम राखून गुंतवणूक राखून ठेवायला हवी.
हेही वाचा >>> Money Mantra: क… कमॉडिटीचा : एल-निनो आव्हान आणि जीएम तेलबिया
प्रत्येकाची गुंतवणुकीची पद्धत असते. त्यालाच गुंतवणूक रणनीती (इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी) असे म्हणतात. यामध्ये तो गुंतवणूकदार कुठल्या पद्धतीचा गुंतवणूकदार आहे ते ठरवता येते. यामध्ये प्रामुख्याने मोमेन्टम इन्व्हेस्टिंग (बाजारची दिशा आणि गती ठरवणारे समभाग), इंडेक्स इन्व्हेस्टिंग (फक्त निर्देशांकांत समविष्ट असलेले समभाग), कॉंट्रॅरियन इन्व्हेस्टिंग (प्रवाहाविरुद्ध धोरण ठेवून खरेदी) आणि कॅन स्लिम (टेक्निकल (तांत्रिक) आणि फंडामेंटल यांचे मिश्रण) या महत्त्वाच्या रणनीतींचा समावेश होतो. आतापर्यंत आपण कशा प्रकारची गुंतवणूक केलेली आहे, ते तपासून तुम्हाला तुम्ही कुठल्या प्रकारचे गुंतवणूकदार आहात ते तपासता येईल. या सर्व प्रकारात मला स्वतःला आवडते ती ‘कॅन स्लिम’ आणि ‘कॉंट्रॅरियन’ पद्धत आहे.
गुंतवणुकीचे सहा निकष
गुंतवणूक गुरू वॉरेन बफे यांनी गुंतवणुकीसाठी कुठल्या कंपनीचे समभाग निवडावेत याचे काही महत्त्वाचे निकष सुचवले आहेत. मला वाटते कुठल्याही गुंतवणूकदारांसाठी हे सहा निकष उपयुक्त ठरतील.
१) आपल्याला कंपनीचा व्यवसाय समजू शकेल अशा मोठ्या कंपनीत गुंतवणूक करावी. इतर कंपन्यांच्या तुलनेत काहीतरी अधिक असलेली कंपनी निवडा.
२) कंपनीचे व्यवस्थापन, उत्पादन, मागणी आणि विक्रीचे तंत्र अशा निकषांवर दीर्घ काळ उत्तम कामगिरी करण्याची शक्यता पडताळून मग दीर्घकालीन गुंतवणूक करावी. उत्तम परताव्यासाठी किमान कालावधी १० वर्षे असावा. अल्पकालीन बाजारभावावर बांधलेले अंदाज सहसा चुकीचे ठरतात.
३) ज्या कंपनीचा व्यवसाय आपल्याला कळत नाही त्यांत गुंतवणूक करू नका. अर्थात याचा अर्थ गुंतवणूकदाराला संपूर्ण व्यवसायाचे ज्ञान असणे आवश्यक नाही. परंतु आपण निवडलेली कंपनी नक्की कुठला व्यवसाय करते, त्याचे दीर्घकालीन भवितव्य काय? कंपनीचे प्रमुख ग्राहक कोण आहेत? कंपनीच्या भवितव्यातील योजना काय आहेत? याची माहिती असणे आवश्यक आहे.
४) शक्यतो आपल्या भागधारकांशी हितसंबंध जपणारी, नियमित लाभांश, बक्षीस भाग देणारी कंपनी निवडावी.
५) कुठलेही कर्ज नसलेली किंवा कमी कर्ज असलेली कंपनी निवडावी. तसेच कार्यक्षम व्यवस्थापन असलेली कंपनी दीर्घकाळ अनुकूल कामगिरी करू शकते.
हेही वाचा >>> Money Mantra: शेअर बाजारात उतरण्याआधी काय कराल?
६) कंपनीचा समभाग भाव रास्त किंवा खरेदी योग्य हवा. अनेकदा कंपनी वर सांगितलेल्या सर्व निकषात बसत असून देखील समभागाचा बाजारभाव जास्त असल्यास खरेदी केल्यास ती नुकसानीची गुंतवणूक ठरू शकते. कोणते समभाग घ्यायचे हे जसे महत्त्वाचे असते तसेच ते कधी घ्यायचे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. बाजार मंदीत असताना उत्तम कंपन्यांचे समभाग खरेदी करण्याचे धोरण नेहमीच फायद्याचे असते.
वरील मुद्द्यांखेरीज तुमचे स्वत:चे असे काही मुद्दे आत्मपरीक्षण केल्यास मिळू शकतील. चुका समजल्या आणि त्या मान्य केल्या तरच चुका सुधारता येतात. म्हणून वेळ काढून आतापर्यंतच्या तुमच्या गुंतवणुकीचा आढावा घ्या. आपण गुंतवणूक करताना कुठे चुकतो आहे ते तपासा आणि मग बघा चुका सुधारता येता आहेत का? यशस्वी गुंतवणूकदार होण्यासाठी अपयशाची ही पायरी पार पाडायलाच हवी. आपल्या कार्यालयात ज्याप्रमाणे कर्मचाऱ्याचा सहामाही/वार्षिक कामगिरीचा आढावा घेतला जातो, तसाच दर तिमाहीस आपल्या गुंतवणुकीचा आढावा घ्या आणि पुढील गुंतवणुकीची दिशा ठरवा. यश तुमचेच आहे !
Stocksandwealth@gmail.com