करप्रणाली सुरळीतपणे चालवणे हा वस्तू आणि सेवा कर प्रणाली लागू करण्याचा उद्देश आहे. अनेक व्यापारी अन् दुकानदार कर भरत नाहीत किंवा कराच्या नावाखाली लोकांकडून जास्तीची रक्कम वसूल करतात. अशा परिस्थितीत अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी जीएसटी विधेयक लागू करण्यात आले आहे. सध्या अनेक छोटे व्यावसायिक बनावट जीएसटी बिले देऊन ग्राहकांची फसवणूक करतात. या प्रकारच्या फसवणुकीपासून सावध राहण्यासाठी खऱ्या आणि बनावट जीएसटी बिलामध्ये काय फरक आहे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
GST बीजक (invoice) म्हणजे काय?
जीएसटी इनव्हॉइस हे एक प्रकारचे बिल आहे. वस्तू किंवा सेवा प्रदान केल्यावर हे बिल पुरवठादाराकडून दिले जाते. हा एक दस्तऐवज आहे, जो पुरवठादाराने ग्राहकाला कोणती वस्तू दिली आहे, त्यावर किती रक्कम आणि किती कर आकारला गेला हे सांगतो. या बिलामध्ये पुरवठादाराचे नाव, उत्पादन, उत्पादनाची माहिती, खरेदीची तारीख, सवलत आणि इतर माहिती असते.
बनावट जीएसटी बीजक (invoice) म्हणजे काय?
वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार बनावट जीएसटी बिल किंवा इनव्हॉइसमध्ये वस्तूंची योग्य माहिती नसते. हे बिल करचोरी, मनी लाँड्रिंग आणि बनावट बुकिंगसाठी बनवले जाते. याशिवाय मिळकत जमा करण्यासाठी बनावट बिलेही तयार केली जातात. आता प्रश्न असा आहे की, खरे आणि बनावट जीएसटी बिल कसे ओळखायचे?
हेही वाचाः AI जगतातील दिग्गज सॅम ऑल्टमन का आहेत चर्चेत? जाणून घ्या OpenAI ची संपूर्ण कहाणी
बनावट GST बिल कसे ओळखावे?
बनावट जीएसटी बिल ओळखण्याचा सोपा मार्ग म्हणजे त्याचा जीएसटी क्रमांक असतो. जीएसटी बिलावर १५ अंकी जीएसटी क्रमांक असतो. या क्रमांकाच्या पहिल्या दोन अंकांमध्ये राज्य कोड असतो आणि उर्वरित १० अंकांमध्ये पुरवठादार किंवा दुकानदाराचा पॅन क्रमांक असतो. १३ वा अंक पॅन धारकाचे युनिट आहे आणि १४ वा ‘Z’ आहे आणि शेवटचा ‘checksum digit’ आहे.
तुम्ही जीएसटी क्रमांकाच्या फॉरमॅटद्वारे खरा आणि बनावट जीएसटी क्रमांक देखील ओळखू शकता
तुम्ही GST वेबसाइटवर GST बिल देखील तपासू शकता. तुम्ही वेबसाइटवर जीएसटी बिल टाका, त्यानंतर पुरवठादाराचा तपशील स्क्रीनवर दर्शविला जाईल.
जीएसटी फसवणुकीची तक्रार कुठे करायची?
तुम्हाला कधीही बनावट जीएसटी बिल मिळाल्यास तुम्ही जीएसटीच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन तक्रार नोंदवू शकता. याशिवाय तुम्ही cbecmitra.heldesk@icegate.gov.in या ईमेलवर तक्रार नोंदवू शकता.