हा हा म्हणता २०२३ संपायला आलं! पुन्हा नव्याने सुरुवात करायची नवीन संधी देत वर्ष २०२४ अगदी काही दिवसांवर आलं आहे. गेल्या वर्षभरात अनेक घडामोडी घडल्या. जसे की, रशिया-युक्रेन युद्धाने दुसऱ्या वर्षात पदार्पण केलं, इस्राईल-हमास युद्ध सुरू झालं, भारताने लोकसंख्येमध्ये चीनला मागे टाकलं, पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान इम्रान खानला अटक झाली, स्वतंत्र खलिस्थान चळवळीचे नायक निज्जर सिंग याची हत्या झाली आणि त्यामुळे भारत-कॅनडा संबंध अधिक दुखावले, चांद्रयान-३ला चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरण्यात यश मिळालं, इत्यादी. जगात काय किंवा आपल्या देशात काय, घटना घडली की तिचे पडसाद कुठे उमटतात हे प्रत्येक जण तपासत असतो. एक नागरिक म्हणून तर आपण या घटनांचा आढावा घेत असतोच. पण एक गुंतवणूकदार म्हणूनसुद्धा आपण या गोष्टींकडे बघितलं पाहिजे.

उदाहरण घ्यायचे झाले तर रशिया-युक्रेन युद्धामुळे नक्की काय झालं – महागाई आणि अस्थिरता वाढली. काही काळापुरती शेअर बाजारात अस्थिरता होती. रशियावर निर्बंध लागल्यानंतर तेलसंबंधीचे व्यवहार वेगळ्या पद्धतीने होऊ लागले. पुढे पुरवठा साखळीत व्यत्यय आले आणि भारताला स्वस्त तेल मिळालं. आता दुसरं उदाहरण घ्यायचं तर जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश म्हणून आता भारत जाणला जातोय. या गोष्टीचा फायदा आणि तोटा दोन्ही आहे. जास्त लोकसंख्या सांभाळताना पायाभूत सुविधांवर भार पडतो. पण दुसरीकडे आपल्या लोकसंख्येतील जास्तीत जास्त प्रमाण तरुणांचं असल्यामुळे येणाऱ्या काळात त्याचा फायदा सुद्धा आहे. जर उत्पादकता वाढली तर सकल देशांतर्गत उत्पादन तर वाढलेच, पण त्याच बरोबर दरडोई उत्पन्नसुद्धा वाढेल. मिळकत वाढली की खर्च आणि गुंतवणूक करण्याची क्षमता वाढेल आणि या सर्वाचा फायदा हा देशाला होईल. या सर्व घडामोडींचा निश्चितच गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओवर परिणाम होईल.

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
Maharashtra kunbi vidhan sabha
कुणबी समाजाला डावलल्याची खंत, यवतमाळात तिसरा पर्याय देण्याचा प्रयत्न
rupee falls for fourth consecutive session
रुपयाचे ८-१० टक्क्यांपर्यंत अवमूल्यनाचा अंदाज; सलग चौथ्या सत्रात घसरण; रिझर्व्ह बँकेच्या हस्तक्षेपाने मोठे नुकसान टळले
boney kapoor financial crisis roop ki raani movie
दिग्दर्शकाने अर्ध्यावर सोडली साथ; फ्लॉप झाला बिग बजेट सिनेमा, बोनी कपूर यांना कर्ज फेडायला लागली होती ‘इतकी’ वर्षे

हेही वाचा : Money Mantra : कोव्हिडच्या बातम्यांमुळे फार्मा शेअर्समध्ये तेजी

वर्ष २०२३ हे गुंतवणूकदारांसाठी आव्हानात्मक होतं. डिसेंबर २०२२ मध्ये हिंडनबर्गच्या अहवालाने अदानी समूहाबाबत केलेल्या विधानांनंतर शेअर बाजारात घसरण झाली. यामध्ये पुढे ३ महिने गेले. मार्च २०२३ च्या अखेरीस पुन्हा बाजाराने नव्याने वरचा प्रवास सुरू केला. जुलैच्या मध्यापर्यंत तो चालू राहिला. पुढे दीड महिने बाजार खाली आला आणि पुढे अगदी १५ दिवसांत बाजाराने नवीन उच्चांक गाठला. तिथून परत दीड महिने बाजार खाली आणि मग सरतेशेवटी दिवाळीचं औचित्य साधून बाजाराने परत मुसंडी मारली आणि अगदी गेल्याच आठवड्यात नवीन ऐतिहासिक पातळी गाठली. निफ्टीतून वर्षाअखेर परतावा साधारणपणे १९ टक्के जरी मिळाला तरीसुद्धा वर्षभरात खूप हेलकावे झेलावे लागले आहेत. हेच आकडे जर आपण निफ्टी स्मॉलकॅप निर्देशांकाचे पाहिले तर ५१ टक्के फायदा तर ११ टक्के नुकसान झाले. वर्ष २०२२ सुद्धा असंच होतं. मार्च २०२० ते ऑक्टोबर २०२१ सारखा प्रवास इतक्यात काही गुंतवणूकदारांच्या वाटेला येईल असं वाटत नाही. परंतु तरीही पोर्टफोलिओ चांगल्या पद्धतीने वाढवायच्या संधी मिळतील असं मला वाटतं आणि म्हणून २०२३च्या शेवटच्या लेखातून मी वाचकांना येत्या काळासाठी कोणत्या संधीकडे लक्ष द्यायचं आणि कोणत्या गोष्टी टाळायच्या याबाबत काही माहिती देते.

जागतिक पातळीवर येत्या वर्षात अस्थिरता वाढलेली असेल अशी चिन्हे दिसत आहेत. युद्धजन्य परिस्थिती, राजकीय धोरण, वातावरणातील झपाट्याने होणारे बदल या कारणांमुळे महागाई आटोक्यात येणं जरा कठीण वाटतंय. जवळजवळ सर्वच देशांच्या मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढ थांबवलेली आहे, परंतु तरीसुद्धा ते कदाचित लवकर खाली येणार नाही. तेव्हा शेअरबाजारात चढ-उतार चालूच राहतील. म्हणून प्रत्येक गुंतवणूकदाराने जागरूक राहणं गरजेचं आहे. आपल्या पोर्टफोलिओमध्ये किती जोखीम घ्यायची आणि कशी वाढ साधायची याबाबतचं नियोजन वेळोवेळी करावं. कारण चांगला परतावा मिळवायचा आहे. पण त्याचबरोबर तोटा कमी होईल याची खबरदारी घ्यायची आहे. प्रत्येक वेळी गुंतवणूक कुठे करायची हे नीट तपासावं लागणार आहे. म्युच्युअल फंडामध्ये मासिक गुंतवणूक जरी चालू असली तरी फंड चांगली कामगिरी करतोय की नाही हे वेळोवेळी बघावं. थेट समभाग गुंतवणूक जर असेल, तर कंपन्यांचे निकाल आणि त्यात केलेलं दिशानिर्देशन हे व्यवस्थितपणे समजून घेतल्याने वेळीच पोर्टफोलिओमध्ये बदल घडवून आणता येतील. येत्या काळामध्ये अक्षय्य ऊर्जा, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, आरोग्य-निगा, कमॉडिटी, गृहनिर्माण या क्षेत्रांना फायदा होऊ शकेल. परंतु या क्षेत्रांमधील आघाडीच्या कंपन्यांचे समभाग महाग आहेत. तेव्हा बाजार खाली येईल, तेव्हा निवडक कंपन्यांचे समभाग घेता येऊ शकतील.

हेही वाचा : वित्तरंजन: रंजक तरीही वैचारिक

बाजार भांडवलानुसार पाहायचे झाल्यास, स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यांमध्ये घसरण अपेक्षित आहे. मागील आठवड्यात एका दिवसात यांच्या निर्देशांकामध्ये ३.२५ ते ३.५ टक्के घसरण झाली आणि १२ दिवसांत झालेली वाढ नाहीशी झाली. तेव्हा यानुसार चालणाऱ्या म्युच्युअल फंड योजना किंवा यांच्यावर जास्त भर असणाऱ्या पोर्टफोलिओंना जास्त धोका आहे. गुंतवणूकदारांनी वेळीच फायदा काढून घेऊन, पुन्हा नव्या संधीची वाट पाहावी. जोखीम व्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून म्युच्युअल फंडातील फ्लेक्झी कॅप आणि बॅलन्सड स्कीम जास्त सोयीची असू शकेल. पुढे अर्थसंकल्पानंतर नवीन क्षेत्र निश्चित ठरवता येऊ शकतील.

आगामी वर्ष अवाजवी जोखीम घेण्याजोगं नसावं असा माझा अंदाज आहे. सामान्य गुंतवणूदाराने जास्त नुकसान होऊ शकेल अशा ठिकाणी पैसे गुंतवू नये. मात्र जास्तीत जास्त गुंतवणूक करावी. महागाई जास्त राहिली तर गुंतवणूक करायला पैसे कमी पडतील. मात्र जमेल तितकी गुंतवणूक करत राहणे फायदेशीर ठरेल. महिन्याच्या शेवटी अगदी ५००-१००० रुपये शिल्लक राहिले तरीसुद्धा ते गुंतवावे. परंतु हे सर्व करायच्या आधी कुटुंबाचं आर्थिक नियोजन पहिलं करून घ्यावं. कारण आपत्कालीन निधी, आयुर्विमा, आरोग्यविमा, अपघात विमा आणि नजीकच्या काळातील आर्थिक ध्येयांची तरतूद करून मग पुढच्या काळासाठी गुंतवणूक करायची आहे.

हेही वाचा : Money Mantra : प्रश्न तुमचे उत्तरं तज्ज्ञांची

विशीतील तरुणांनी म्युच्युअल फंड आणि शेअरची गुंतवणूक सुरू करून स्वतःचा आर्थिक पाय मजबूत करावा. कुटुंब वाढवू पाहणाऱ्यांनी वाढीव गरजा आणि त्यांना साजेशी गुंतवणूक करावी. पन्नाशीतील जोडप्यांनी निवृत्तिनियोजनासंबंधी माहिती घेऊन त्यानुसार आर्थिक आराखडे मांडावे. निवृत्त झालेल्यांनी स्वतःच्या आरोग्यावर लक्ष ठेवून, पोर्टफोलिओतील जोखीम आणि निवृत्तीच्या गरजेनुसार गुंतवणूक करावी.

येत्या काळामध्ये आपल्या देशात चांगले बदल होतील असे अंदाज आहेत. उद्योगांची भरभराट हवी असल्यास व्याजदर खाली यायला हवेत. तेव्हा आता जरी व्याजदर स्थिरावले असले आणि महागाईमुळे वाढले तरीसुद्धा दीर्घकाळात ते खाली येतील. म्हणून फक्त व्याजावर अवलंबून न राहता मिळकतीच्या इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे.

हेही वाचा : Money Mantra: फंड विश्लेषण- आदित्य बिर्ला सनलाइफ फ्रंट लाईन इक्विटी फंड

शेवटी एवढंच म्हणेन की, आपली भरभराट ही आपलीच जबाबदारी आहे. त्यासाठी पैसे आणि प्रयत्न हे आपणच पुरवायचे आहेत. प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेत, परंतु त्यावर मात करत आणि सुबत्तेचा ध्यास मनात धरून पुढची वाट शोधायची आहे. वेळ खूप महत्त्वाची आहे. तेव्हा लवकरात लवकर सुरुवात करून, कालसुसंगत निर्णय घेत आणि वेळेची किंमत समजून आपली आर्थिक प्रगती साधायची असेल तर नवीन वर्ष सुरू होण्याआधीच आर्थिक नियोजनाचं पाऊल उचला. केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे…. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
तृप्ती राणे

trupti_vrane@yahoo.com

प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.