मागच्या आठवड्यातील लेखात आपण नवीन लग्न झालेल्या तरुणांनी आपल्या कुटुंबाची आर्थिक घडी कशी बसवावी याचे बेसिक फंडे समजून घेतले. आजच्या लेखात मध्यम आणि लाँग टर्म काळात आपल्या प्लॅनिंगची दिशा कशी असायला हवी ? याचा विचार करूया.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेल्थ इन्शुरन्स नक्की कोणी घ्यावा?

बऱ्याचदा कुटुंबातील कर्त्या पुरुषाचा किंवा दोघेही कमवत असले तरीही ज्याचे उत्पन्न जास्त आहे त्याचाच हेल्थ इन्शुरन्स घेतला जातो. गेल्या काही वर्षात यामध्ये बदल होत आहे पण अजूनही हेल्थ इन्शुरन्सचे महत्व तरुणांना समजत नाही. तुमच्या ऑफिसने दिलेला हेल्थ इन्शुरन्स जरी असला तरीही तुमचा स्वतःचा असा कुटुंबासाठीचा फॅमिली फ्लोटर प्लॅन असायला हवा. वयाच्या चाळिशीच्या आधीच फॅमिली फ्लोटर प्लान घेतल्यास त्याचे प्रीमियम तुलनात्मक दृष्ट्या कमी असतात. सुरुवातीला पाच किंवा दहा लाख रुपयांचा फॅमिली फ्लोटर प्लॅन हा परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध असतो.

दोघांचे पोर्टफोलिओ वेगळे असावेत

वयाच्या या टप्प्यावर नवीन लग्न झालेले असल्यामुळे कुटुंब नियोजन, नवीन घर घेण्याचा प्रयत्न, भाड्याने राहत असल्यास त्याची तरतूद करणे यासाठी दरवर्षी पैसे नेमके किती लागतील याचा आधी अंदाज बांधता येत नाही आणि म्हणूनच ‘इन्व्हेस्टमेंट नंतर करु’ हा विचार करून महत्त्वाचे काम बाकी राहते. म्हणूनच लग्न झाल्यावर सहा महिन्याच्या आत दोघांनीही आपले डिमॅट अकाउंट उघडावेत, जर डिमॅट अकाउंट आधीच असतील तर एकाचा लाँग टर्मच्या दृष्टीने पोर्टफोलिओ आणि दुसऱ्या डिमॅटमधून म्युच्युअल फंडातील एसआयपी सुरू कराव्यात. ज्याच्या डिमॅट अकाउंट मधून लाँग टर्मसाठी शेअर्स विकत घ्यायचे आहेत ते शेअर्स शक्यतो निफ्टी आणि सेन्सेक्स कंपन्यांचेच असावेत. कुणीतरी दिलेल्या ऐकीव टिप्स आणि सल्ल्यांच्या आधारित गुंतवणुका टाळाव्यात. वयाच्या चाळीशीमध्ये उत्तम सुरुवात करून रिटायरमेंटच्या आसपास आपल्याला भरपूर पैसे देतील अशा चांगल्या कंपन्या असलेला पोर्टफोलिओ तुम्हाला तयार करायचा आहे हे लक्षात ठेवा. यासाठी गुंतवणूक सल्लागाराचा नियमितपणे सल्ला घेणे आवश्यक आहे. शेअर्समधील गुंतवणुकी सल्लागाराच्या माध्यमातूनच कराव्यात.

हेही वाचा… Money Mantra : नवविवाहितांसाठी फायनान्शिअल प्लॅनिंग #couplegoals – 1

जोडीदारापैकी एकाने शॉर्ट आणि मिडीयम टर्म मधील गरजांचा विचार करावा. जर तुमचं मुलं लहान असेल तर शाळेचा खर्च, शाळेत प्रवेश घेण्यासाठीचा खर्च, एकापेक्षा अधिक अपत्याचा विचार करत असाल तर त्या दृष्टीने फिक्स डिपॉझिट मध्ये पुरेशी रक्कम असावी.

कर्जाचा विळखा टाळा

‘जगायचे हेच दिवस आहेत, इन्व्हेस्टमेंट काय केव्हाही करता येईल’ असा विचार करून महागड्या वस्तू, फॉरेन टूर, गेट-टुगेदर यावर खर्च करणे, क्रेडिट कार्ड कसे वापरावे हे न समजून खर्च करणे आपण टाळले पाहिजे. आपल्याकडे असलेला पैसा आपल्याला गरजेला कामी आला पाहिजे. त्यामुळेच आपल्यावर कर्ज नाही ना ? याची खात्री करून घ्या. घर विकत घेण्यासाठी कर्ज घेणे यात काहीही चूक नाही. मात्र अनुत्पादक कारणांसाठी ज्यातून आपल्याला कोणताही मोठा फायदा नाही अशा प्रकारे कर्ज घेणे टाळले पाहिजे.

रिटायरमेंट प्लॅनिंगला सुरुवात करा

दर महिन्याला एक ठराविक रक्कम म्युच्युअल फंडाच्या लार्ज कॅप किंवा निफ्टी इंडेक्स फंडामध्ये एस.आय.पी.च्या माध्यमातून गुंतवायला सुरुवात करा. ही रक्कम कदाचित सुरुवातीला मोठी असणार नाही पण थेंबे थेंबे तळे साचे हे तंत्र विसरून चालणार नाही.

तुमचा सोपा प्लान कसा असायला हवा ?

दोन हजार रुपये दर महिना

प्रति महिना अपेक्षित रिटर्न १२ %

गुंतवणूक कालावधी तीस वर्षे

गुंतवणुकीची मार्केट व्हॅल्यू ७० लाख ५९ हजार रुपये

म्हणजेच या तक्त्यावरून तुम्हाला नक्की समजलं असेल की रक्कम लहान किंवा मोठी असण्यापेक्षा सातत्याने केलेली गुंतवणूकच फायद्याची ठरते.

वयानुसार विमा वाढवा

वय वाढेल तसा आरोग्य विमा आणि जीवन विमा यांचे कव्हर वाढले पाहिजे. वयाच्या चाळीशीमध्ये साधारणपणे फार आजारांना आपल्याला सामोरे जावे लागत नाही. याउलट गेल्या दोन दशकात आपल्या लाईफस्टाईलमध्ये झालेल्या बदलामुळे अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते की वयाच्या पन्नाशीनंतर औषधोपचार आणि तत्सम खर्च हे टाळता येणे अशक्य असते. जुन्या पिढीतील लोकांना ज्या वयात हॉस्पिटलमध्ये जावं लागलं त्यापेक्षा कमी वयात जर एखाद्या आजारामुळे हॉस्पिटलचा खर्च उद्भवला तर आपल्याकडे पुरेसा आरोग्य विमा असायला हवा म्हणूनच वय वाढलं की हेल्थ इन्शुरन्स चे कव्हर वाढवायला विसरू नका.

आपल्या सुखी आणि स्थिर सहजीवनासाठी एक उत्तम स्थिर आर्थिक आयुष्य असलं पाहिजे. हे कायम लक्षात ठेवा.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Financial planning for newlyweds mmdc dvr
Show comments