आजच्या या सदराच्या मानकरी आहेत राधिका आणि स्वानंद कुलकर्णी. राधिका या पुण्यातील एका कायम विना-अनुदानित शाळेत संगीत शिक्षिका आहेत. स्वानंद कुलकर्णी हे एका कारखान्यात लिपिक पदावर काम करतात. दोघांनी मिळून सात वर्षांपूर्वी संयुक्तरित्या २५ लाखांची धायरी फाटा येथे सदनिका घेतली असून, त्याकरिता १५ लाखांचे वीस वर्षे मुदतीचे गृहकर्ज घेतले होते. या गृहकर्जापैकी ३ लाखांची परतफेड झाली आहे. राधिका यांनी आर्थिक नियोजनासाठी संपर्क केला होता. कुलकर्णी कुटुंबियांची दोन वित्तीय ध्येये निश्चित करण्यात आली. पहिले येत्या सात ते आठ वर्षांत कर्जमुक्त होणे आणि दुसरे त्यांच्या निवृत्ती नियोजनासाठी तरतूद करणे. राधिका आणि स्वानंद कुलकर्णी यांच्याकडे पाच लाखांच्या मुदत ठेवी आहेत.
कृती योजना
राधिका यांना वित्तीय नियोजनाबाबत अनेक प्रश्न पडले होते. त्या मुख्यत: संगीत शिक्षिका आहेत. त्यांना सांगीतिक परिभाषेत त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. जशी एखाद्या मैफिलीची सुरुवात मंद लयीतील आलापीने होते आणि मध्य लय आणि शेवटी द्रुत लयीतील एखाद्या बंदिशीने त्या रागाची सांगता होते, तसेच वित्तीय नियोजनाची सुरुवात मुदतीच्या विम्याने करायला हवी. मुदत विमा हा तुमच्या वित्तीय नियोजनाचा पाया असतो. मुदत विमा तुमच्या कुटुंबाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करतो. मुदतीचा विमा मूलभूत आर्थिक गरजांपैकी एक आहे. विशेषतः आजच्या काळात टर्म इन्शुरन्स परवडणाऱ्या प्रीमियमपासून ते अतिरिक्त रायडर्सपर्यंत अनेक वैशिष्ट्ये आणि फायदेदेखील घेता येतात. पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास टर्म इन्शुरन्स योजना संपूर्ण कुटुंबाला आर्थिक सुरक्षा देतात. पॉलिसीधारकाला गंभीर आजार किंवा अपघाती मृत्यू झाल्यास अतिरिक्त विमाछत्र घेता येते. आपल्या उपलब्ध बचतीपैकी दरमहा तीन हजार खर्च करून दोघांनी प्रत्येकी ५० लाखांचा मुदतीचा विमा घ्यावा.
वित्तीय नियोजनाची दुसरी पायरी म्हणजे आरोग्य विमा. स्वानंद कुलकर्णी यांना नोकरीच्या ठिकाणाहून दोन लाखांचे आरोग्य विम्याचे छत्र आहे. सध्याच्या काळात हे विमाछत्र पुरेसे नाही. मेडिक्लेम पॉलिसी ही पॉलिसीधारकांना कॅशलेस हॉस्पिटलायझेशन सुविधा किंवा दाव्याच्या रकमेची जवळजवळ ८० टक्के इतक्या रकमेची भरपाई मिळवून देते.
- दोघांनी संयुक्त (फ्लोटर) ५ लाखांचे आरोग्य विमाछत्र असणारी पॉलिसी घ्यावी.
- ५ लाखांच्या मुदत ठेवीपैकी २ लाख तातडीच्या खर्चासाठी ठेवावे. उर्वरित ३ लाख खालीलप्रमाणे गुंतविणे
- १ लाख : कॅनरा रोबेको फ्लेक्झीकॅप फंड
- १ लाख : निप्पॉन इंडिया मल्टीकॅप फंड
- १ लाख : फ्रँकलीन इंडिया फोकस्ड इक्विटी फंड
- प्रत्येकी ५००० ची ‘एसआयपी’ वरील तीन फंडात करावी.
जमा (हजार रुपये)
वेतन
राधिका कुलकर्णी – ३५
स्वानंद कुलकर्णी – ३५
एकूण जमा – ७०
खर्च (हजार रुपये)
घर खर्च – २२
गृहकर्जाचा हप्ता – २२
आरोग्य विमा – २
मुदतीचा विमा – ३
बचत – २१
एकूण खर्च – ७०
वसंत माधव कुळकर्णी
shreeyachebaba@gmail.com
म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.