देवदत्त धनोकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सणोत्सवाच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. साहजिकच दसरा, दिवाळीच्या काळात अनेक जण वाहन खरेदी, सोने खरेदीसह विविध खरेदी या शुभ मुहूर्तावर करत असतात. तुम्हीदेखील या सणोत्सवाच्या काळात वाहन खरेदीच्या विचारात असाल तर त्याआधी योग्य आर्थिक नियोजन करा आणि मगच वाहन खरेदीचे स्वप्न प्रत्यक्षात आणा.

गुंतवणूकदार आर्थिक उद्दिष्टे निश्चित करून विविध गुंतवणूक साधनांमध्ये गुंतवणूक करत असतो. त्यातील बहुतांश गुंतवणूकदारांच्या आर्थिक उद्दिष्टांमध्ये नवीन वाहन खरेदी हे एक महत्त्वाचे उद्दिष्ट असते. मध्यमवर्गीय व्यक्ती वाहन खरेदी करताना बचत, कर्ज किंवा बऱ्याचदा गुंतवणूक मोडून वाहन खरेदी हे स्वप्न पूर्ण करतो. मात्र वाहन खरेदीचे स्वप्न कसे साकारावे, ते साकारताना काय दक्षता घ्यावी याबाबतची माहिती आपण आजच्या लेखात घेणार आहोत.

आणखी वाचा-आरबीआयने बजाज फायनान्ससह ‘या’ दोन बँकांवर ठोठावला कोट्यवधींचा दंड, खातेदारांवर काय परिमाण?

चारचाकी वाहन खरेदी करण्यापूर्वी आर्थिक नियोजन करणे का आवश्यक आहे? मुलांचे शिक्षण, गृह खरेदी, पर्यटन यांसारख्या विविध आर्थिक उद्दिष्टांप्रमाणेच वाहन खरेदीचेदेखील अनेक कुटुंबांचं उद्दिष्ट असते. योग्य आर्थिक नियोजन केल्यास हे उद्दिष्ट निश्चितच साकारता येते. मात्र जर आर्थिक उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम योग्य नसेल आणि वाहन खरेदीसाठी पुरेसा निधी नसताना खरेदी केली तर अन्य आर्थिक उद्दिष्टांवर परिणाम होतो. याकरिताच अन्य आर्थिक उद्दिष्टांप्रमाणेच वाहन खरेदीसाठी योग्य नियोजन करून आर्थिकदृष्ट्या सक्षम असतानाच खरेदी करावे.

वाहन खरेदीचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय करावे?

  • सर्वप्रथम आर्थिक नियोजनकाराच्या मदतीने आर्थिक योजना तयार करावी.
  • या आर्थिक योजनेमध्ये वाहन खरेदीचा समावेश करावा.
  • आर्थिक उद्दिष्टांचा प्राधान्यक्रम निश्चित करावा.
  • वाहन खरेदीसह अन्य उद्दिष्टांसाठी गुंतवणुकीला प्रारंभ करावा.
  • जर सध्याच्या उत्पन्नात वाहन खरेदीसाठी गुंतवणूक करणे शक्य नसेल तर अन्य उद्दिष्टांसाठी गुंतवणुकीला प्रारंभ करावा आणि भविष्यात उत्पन्न वाढल्यावर वाहन खरेदीसाठी गुंतवणुकीला प्रारंभ करावा .
  • गुंतवणूक महागाईवाढीपेक्षा जास्त परतावा देणाऱ्या पर्यायात करावी.
  • गुंतवणुकीचा वेळोवेळी आढावा घ्यावा आणि आवश्यकतेनुसार त्यात योग्य ते बदल करावेत.

वाहन कर्ज घ्यावे का?

वाहन खरेदीसाठी बँकांकडून देण्यात येणारे ‘कार लोन’ अर्थात वाहन कर्जदेखील घेऊ शकता. वाहन कर्जाच्या माध्यमातून नवीन वाहन घेताना तुम्ही हप्ते नियमित भरू शकाल आणि त्या हप्त्यांमुळे अन्य आर्थिक उद्दिष्टांवर विपरीत परिणाम होणार नाही इतक्याच रकमेचे कर्ज घ्यावे. आयुर्विमा कवच- वाहन कर्ज घेतल्यास कर्जाच्या रकमेइतके किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचे अतिरिक्त आयुर्विमा कवच घ्यावे. उदाहरणाच्या मदतीने आपण वाहन खरेदीतील नियोजनाचे महत्त्व समजून घेऊया.

आणखी वाचा-लॅपटॉप आणि टॅबलेटच्या आयातीबाबत मोदी सरकारचा महत्त्वाचा निर्णय, आता…

रमेश आणि त्याचा मित्र संकेत या दोघांनाही वर्ष २०१५ मध्ये वाहन खरेदी करायचे होते. रमेशने मित्राच्या सल्ल्याने वाहन खरेदीचे उद्दिष्ट साध्य केले आणि संकेतने आर्थिक नियोजनकाराच्या मदतीने वाहन खरेदीसह अन्य उद्दिष्ट साध्य करण्याचे ठरवले.

रमेश आणि संकेतचे वर्ष २०१५ मध्ये ५०,००० उत्पन्न होते. रमेशने तुलनेने घरखर्च जास्त केला तसेच वाहन कर्जाच्या मदतीने महागडी गाडी घेतली. साहजिकच त्याच्याकडे भविष्यासाठी फारच कमी रक्कम शिल्लक राहिली. संकेतने मात्र घरखर्च मर्यादित ठेवला आणि तुलनेने स्वस्त गाडी खरेदी केली. शिवाय भविष्यासाठी जास्त रकमेची गुंतवणूक केली.

वर्ष २०२२ मध्ये उत्पन्न वाढल्यावर रमेशने घरखर्च वाढवला तसेच जुनी गाडी बदलून नवीन गाडी घेतली. संकेतने मात्र घरखर्च खूप जास्त न वाढवता गृहकर्जाच्या मदतीने गृह खरेदीचे स्वप्न साकारले. भविष्यासाठीदेखील जास्त रकमेची गुंतवणूक केली. संकेतने आर्थिक नियोजन योग्य प्रकारे केल्यामुळे मुलांचे शिक्षण, पर्यटन, नवीन वाहन, गृह खरेदी , सेवानिवृत्ती असे विविध उद्दिष्ट संकेत आणि त्याचे कुटुंबीय निश्चितपणे योग्य प्रकारे पूर्ण करू शकतील.

वाहन खरेदीसाठी महत्त्वाचे मुद्दे –

  • वाहन खरेदी आर्थिक नियोजनातील एक उद्दिष्ट असेल आणि त्यासाठी योग्य नियोजन केले तर गाडी खरेदीचे उद्दिष्ट योग्य प्रकारे साध्य करता येते आणि त्यामुळे अन्य उद्दिष्टांवरदेखील परिणाम होत नाही.
  • केवळ सामाजिक प्रतिष्ठा आणि बडेजाव यासाठी महागडे वाहन खरेदी करू नका. आपले उत्पन्न आणि आर्थिक कुवतीनुसार गाडी घ्या. जर नवीन वाहन खरेदीसाठी पुरेसा निधी नसेल तर प्रसंगी जुने वाहन घ्या व उत्पन्न वाढल्यावर नवीन खरेदी करा.
मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Financial planning while realizing the dream of buying vehicle print eco news mrj
Show comments