कोणते क्षेत्र फंड गुंतवणूकदारांनी निवडले पाहिजेत? आता पुन्हा बाजार सावरल्यानंतर कोणत्या क्षेत्रामध्ये तेजी अनुभवायला मिळेल, याचा अभ्यास करून फंड कसे निवडायचे? – विशाल कदम मुंबई
म्युच्युअल फंडाच्या समभाग संलग्न अर्थात इक्विटी योजनांपैकी ज्या योजना अर्थव्यवस्थेशी संबंधित एखादे क्षेत्र निवडून फक्त त्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या कंपन्यांचे समभाग विकत घेतात, अशा योजनांना सेक्टोरल फंड असे म्हणतात. गुंतवणूकदारांनी मागच्या दहा वर्षांत या सेक्टोरल फंडांना अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. एकूणच शेअर बाजारातील वाढ सतत कायम टिकल्याने सेक्टोरल फंडांना चांगले दिवस आले, हे त्यामागील खरे कारण आहे. पायाभूत सुविधा, ऊर्जानिर्मिती, तंत्रज्ञान, नैसर्गिक संसाधने, खनिजे, वित्तीय क्षेत्र, उत्पादन क्षेत्र, आरोग्य आणि औषधीनिर्माण (फार्मा) क्षेत्र या प्रमुख क्षेत्रांत सेक्टोरल फंड कार्यान्वित आहेत. जवळपास सर्वच फंड घराण्यांनी या प्रकारचे फंड बाजारात आणले आहेत. डिसेंबर २०२४ अखेरीस उपलब्ध आकडेवारीनुसार, वर्षभरात सेक्टोरल फंडांमध्ये जवळपास ३०० टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचाच अर्थ घसघशीत परतावा देणारे फंड म्हणून या फंडांनी लोकांना भुरळ पाडली आहे.
सेक्टोरल फंडात गुंतवणूक का करायची?
अर्थव्यवस्था व्यापारचक्राचे सूत्र पाळून पुढे जात असते. व्यापारचक्रात काही वर्षे एका विशिष्ट उद्योग किंवा उद्योग अर्थव्यवस्थेच्या क्षेत्राला सुगीचे दिवस येणार हे उघड उघड समजते. उदाहरण घ्यायचे झाले तर करोना महासाथीच्या संकटाच्या वेळी फार्मा आणि आरोग्यविषयक सुविधा पुरवणाऱ्या कंपन्यांना अभूतपूर्व व्यवसाय संधी आहेत, हे स्पष्ट दिसत होते. अर्थव्यवस्थेला मंदीच्या फेऱ्यातून बाहेर काढण्यासाठीचा हमखास मार्ग म्हणजे सरकारी गुंतवणुकीतून पायाभूत सुविधांची निर्मिती करणे. गेल्या दहा वर्षांत भारत सरकारच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सतत भांडवली गुंतवणूक वाढती राहिली आहे. द्रुतगती महामार्ग, लॉजिस्टिक कॉरिडॉर, ऊर्जानिर्मिती, बंदरे या क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर प्रकल्प आकाराला येत आहेत व यामुळेच ‘इन्फ्रा’ हा परवलीचा शब्द झाला आहे. भारतातील सरकारी बँकांच्या नकारात्मक ताळेबंद आणि बुडीत कर्जामुळे फारशा आकर्षक नव्हत्या. गेल्या काही वर्षांत नियमित प्रयत्न करून ताळेबंद आकर्षक वाटू लागले आहेत. याउलट याच काळात बॅंकेतर वित्तीय संस्था ग्रामीण भागातील आपल्या अस्तित्वामुळे चांगला व्यवसाय करताना दिसत आहेत. म्हणून वित्तीय सेवा क्षेत्र (फिनसर्व्ह) यामध्ये ठरावीक काळात गुंतवणूक केल्यावर त्याचा परतावा मिळालेला आहे.
कोणते क्षेत्र निवडायचे हा निर्णय कसा घेता येईल?
शेअर बाजाराशी संबंधित सर्वात कठीण प्रश्न म्हणजे नेमक्या कोणत्या क्षेत्राला आता चांगले दिवस येणार आहेत? कारण परदेशी गुंतवणूकदारांनी सध्या भारतातील शेअर बाजारांकडे पाठ फिरवली आहे. अमेरिकेच्या सरकारची व्यापारी धोरणे इतकी बेभरवशाची आहेत, ही नेमक्या कोणत्या कंपनीला किंवा क्षेत्राला याचा किती तोटा होईल किंवा नुकसान होईल याचा अंदाज येणे अत्यंत कठीण बाब आहे. त्यातल्या त्यात पायाभूत सुविधा, तंत्रज्ञान आणि फार्मा या तीन क्षेत्रांकडे गुंतवणूकदारांनी लक्ष द्यायला हवे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेभरवशाच्या व्यापारी धोरणाला कमीत कमी टाळून आपला व्यवसाय करतील, अशी ही तीन क्षेत्रे आहेत.
व्यापारचक्राची सुरुवात गाठणे हे खरे आव्हान
कोणत्याही क्षेत्राच्या तेजीला अचानकपणे सुरुवात होते आणि आपल्याला अंदाज येईपर्यंत त्या क्षेत्रातील कंपन्यांचे समभाग पंधरा-वीस टक्क्यांनी वधारलेले असतात. अशा वेळी म्हणजेच व्यापाराच्या तेजीच्या चक्राच्या सुरुवातीच्या टप्प्यात जे गुंतवणूकदार सेक्टोरल फंडांमध्ये गुंतवणूक करतात, त्यांनाच त्या गुंतवणुकीचा फायदा होतो. एकदा एखादे क्षेत्र वाढू लागले आणि वर्षभरानंतर तुम्ही त्यात गेलात तर त्यातील घसघशीत वाढीचा कालावधी हा निघून गेला असतो. मग तुम्हाला अन्य इक्विटी फंडांप्रमाणेच परतावे मिळतात.
दीर्घकालीन गुंतवणूक म्हणून सेक्टोरल फंड चांगले का?
कोणताही फंड गुंतवणुकीसाठी दीर्घ कालावधीसाठी चांगला असेल किंवा नाही हे ठरवण्यासाठी ‘सीएजीआर’ म्हणजेच वार्षिकीकृत परताव्याचा दर तपासायचा असतो. उपलब्ध आकडेवारीनुसार, बाजारातील १५ आघाडीच्या सेक्टरल फंडांचा अभ्यास केल्यास दहा वर्षे सलग गुंतवणूक कायम ठेवली तर मिळणारा परतावा १३ ते १७ टक्के या दरम्यान राहिला आहे. अशीच आकडेवारी मिडकॅप फंडांविषयी पडताळून पाहिल्यास तेथे आघाडीच्या सर्वच दहा फंडांनी १४ टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे.
सेक्टोरल फंडातील प्रवेशाप्रमाणेच बाहेर पडण्याची वेळही महत्त्वाची
एखाद्या क्षेत्रातील घसघशीत परताव्याचा सुगीचा कालावधी सरला की तेथून गुंतवणूक बाहेर काढून घेणे महत्त्वाचे आहे. शिवाय पुन्हा योग्य संधीची वाट पाहून योग्य वेळी प्रवेशही करायाला हवा. यामुळेच सेक्टोरल फंडातून तुम्ही बाजारात निफ्टी किंवा सेन्सेक्सपेक्षा अधिक परतावा मिळवू शकता, पण हे करणे तितके सोपे नाही.