अर्थवृ फंड जिज्ञासा जोड अनेक नवीन गुंतवणूकदार म्युच्युअल फंडाकडे वळणे स्वागतार्हच, पण गुंतवणुकीच्या या प्रकाराला समजून घेताना येणाऱ्या अडचणी, प्रश्न, शंका लोकांनी थेट विचारावीत, त्याची समर्पक उत्तेर देणारे पाक्षिक सदर…
१) माझे वय पंचेचाळीस वर्षे असून माझ्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्या असल्या तरी त्याचा भार नाही. कोणतेही कर्ज नाही. गेल्या पाच वर्षांपासून म्युच्युअल फंडात दरमहा दहा हजार रुपये गुंतवणूक करतो आहे. निवृत्तीनंतरच्या काळात स्थिर उत्पन्न मिळण्यासाठी आतापासून फंडात गुंतवणूक कशी करावी? -संकेत परब
आपण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना वय जोखीम आणि परतावा यांची सांगड घालत असतो. आपण दिलेल्या माहितीनुसार, म्युच्युअल फंडात गुंतवणूक करून तुम्हाला फक्त पाचच वर्षे झाली आहेत व आणखी दहा वर्षे तुम्ही गुंतवणूक सुरू ठेवू शकता असे चित्र उभे राहते. तुम्ही खासगी नोकरीत आहात आणि तुम्हाला निवृत्तिवेतन नसावे हे विचारात घेऊन गुंतवणूक करायला पाहिजे. राष्ट्रीयीकृत बँका, पोस्ट ऑफिस अशा गुंतवणूक पर्यायांमध्ये तुमची आधीपासूनच गुंतवणूक आहे व तो निधी पुरेसा आहे, असे गृहीत धरून तुम्हाला पुढील दहा वर्षे समभाग संलग्न म्हणजेच इक्विटी आणि रोखे आणि समभाग या दोहोंचा समावेश असलेल्या हायब्रीड इक्विटी अशा दोन फंड योजनांमध्ये दरमहा ‘एसआयपी’ करण्याचा पर्याय सुचवावासा वाटतो.
दर महिन्याला २५ हजार रुपये पुढील दहा वर्षासाठी गुंतवल्यास (सरासरी १२ टक्के परतावा गृहीत धरल्यास ) ५५ वर्षांच्या अखेरीस तुमच्याकडे ५८ लाख रुपये एवढा निधी जमा झालेला असेल. या रकमेपैकी २०,००० रुपये मिडकॅप आणि फ्लेक्झिकॅप योजनांमध्ये तर ५००० रुपये ऍग्रेसिव्ह हायब्रीड फंडांमध्ये गुंतवावे. दर वर्षाला गुंतवणुकीचा आढावा घेणे आवश्यक असले तरीही एका वर्षात एखादा फंड अपेक्षित परतावा देत नाही, म्हणून बदलणे योग्य नव्हे. म्हणूनच सुरुवातीपासून फंड निवडतानाच कमीत-कमी सात वर्षांचा उत्तम परतावा दिलेला फंडच निवडावा. पंचावन्न वर्षे वय झाले की, त्या वेळी असलेल्या परिस्थितीचा विचार करून हळूहळू गुंतवणूक रोखे संलग्न पर्यायाकडे वळवता येईल.
आणखी वाचा-माझ्यासाठी ‘सही’ ठरशील : अल्फा पोर्टफोलिओ कसा तयार करायचा?
२) मी सरकारी नोकरीत असून ‘एसआयपी’च्या माध्यमातून आठ हजार रुपयांची गुंतवणूक फंडांमध्ये केली जात आहे. निवृत्तिवेतनाचा लाभ असल्याने अधिक जोखीम घेण्याची तयारी आहे. गेल्या दोन महिन्यांपासून भारतातील शेअर बाजार नक्की दिशा दाखवत नाहीत असे वाटते. मुदत ठेवीतील पैसे हाताशी असून या संधीचा वापर करून ते गुंतवावे असे वाटते, मग अशा वेळी एकरकमी गुंतवणूक करू की ‘एसआयपी’ मार्फत? -मनोहर सामंत
दिवाळीनंतर भारतातील शेअर बाजारांमध्ये वातावरण तेजी-मंदी असे संमिश्र स्वरूपाचे आहे. कधी आंतरराष्ट्रीय घटक त्याला कारणीभूत ठरत आहेत, तर कधी भारतीय बाजारातील परिस्थिती, त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता चुकीची नाही. पण तुमच्या फंडातील गुंतवणुकी नेमक्या किती आहेत? किती काळापासून आहेत व तुमचे ध्येय काय आहे? यावर आता गुंतवणूक कशी करावी हा निर्णय घेणे अवलंबून आहे.
तुमच्याकडे असलेले पैसे एकरकमी गुंतवून कमीत-कमी तीन ते पाच वर्षे वाट पाहण्याची तुमची तयारी असेल, तरच मिडकॅप किंवा लार्जकॅप फंडाचा विचार करता येईल. घरातील शुभकार्य, मुलाचे शिक्षण वगैरे अशा एखाद्या भविष्यात उद्भवणाऱ्या खर्चासाठी तुम्ही पैसे बाजूला काढून ठेवले असतील तर अल्पकाळात भरपूर पैसे कमावण्याच्या मोहाने एकरकमी गुंतवणूक करावी असा सल्ला देता येणार नाही.
आणखी वाचा-माझा पोर्टफोलिओ : देशाच्या संरक्षण सिद्धतेतील सच्चा भागीदार – डीसीएक्स सिस्टीम्स
तुमच्या ‘एसआयपी’ सुरू असतील तर त्या बंद करण्यापेक्षा पडत्या बाजार संधीचा लाभ घेणे अधिक फायद्याचे ठरेल. येत्या दोन-तीन महिन्यांत अधिकच मंदीसदृश वातावरण तयार झाले आणि बाजार खूपच घसरले तर थोडे एकरकमी पैसे चांगल्या लार्जकॅप आणि फ्लेक्झिकॅप फंडांमध्ये गुंतवणे हा पण चांगला पर्याय आहे. तुम्ही ज्या मुदत ठेवीतील पैशाचा विचार गुंतवणुकीसाठी करत आहात, ते पैसे तुम्हाला येत्या दोन ते तीन वर्षांत लागणार असतील तर ती गुंतवणूक इक्विटी फंडात न करता म्युच्युअल फंडातील रोखे संलग्न योजनांचा विचारसुद्धा करता येईल. या योजनांमध्ये जोखीम नसते असा गैरसमज आहे, पण अर्थातच इक्विटी योजनांपेक्षा ती निश्चितच मर्यादित असते.
काही निवडक फ्लेक्सिकॅप आणि मिडकॅप फंड योजना
पराग पारीख फ्लेक्सिकॅप फंड
फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सिकॅप फंड
डीएसपी फ्लेक्सिकॅप फंड
एचडीएफसी मिडकॅप ॲपॉर्च्युनिटी फंड
कोटक इमर्जिंग इक्विटी फंड
डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड योजना आणि त्यातील गुंतवणूक बाजारातील जोखमीच्या अधीन आहे, योजनेविषयीचे दस्तऐवज वाचून आणि गुंतवणूक सल्लागाराच्या माध्यमातूनच गुंतवणूक करावी.
(म्युच्युअल फंड गुंतवणुकीविषयी तुमच्या अडचणी, प्रश्न थेट आम्हाला ईमेल- arthmanas@expressindia.com द्वारे कळवा)