वायदे बाजारातील व्यवहार हे काहीसे समजण्यास क्लिष्ट असतात. यात काही व्यवहारांमध्ये आपल्या योजनेनुसार जोखीम अगदी नगण्य तर कधी अमर्याददेखील असते. यापैकी फ्युचर्स मार्केटमध्ये विशिष्ट तारखेला आणि किमतीला समभाग खरेदी-विक्रीचे करार केले जातात. करारानुसार त्या किमतीला खरेदी किंवा विक्री करावीच लागते. ही वस्तू प्रत्यक्ष व्यापारी माल किंवा भांडवली बाजारातील समभागदेखील असू शकते. म्हणजे तुम्ही ज्या भावाचा खरेदीचा करार केला आहे आणि समभाग खुल्या बाजारात कमी भावाला मिळत असेल तर कराराप्रमाणे तुम्हाला तोटा सहन करून विकत घ्यावा लागेलच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पण विरुद्ध असेल तर समोरच्याला तो चढ्या भावात विकत घेऊन तुम्हाला कमी भावात विकावा लागेल किंवा तुम्ही दोन्ही वेळेला फक्त फरकाची किंमत घेऊ किंवा देऊ शकता. हे सगळे व्यवहार कायदेशीररीत्या पार पडतात. यावर भांडवली बाजार नियामक सेबीचे नियंत्रण आणि लक्ष असते. जो शेतकरी किंवा व्यापारी प्रत्यक्ष वस्तू विकत घेतो, उत्पादन करतो किंवा शेतात पिकवतो त्याला अशा प्रकारचा वायदा निश्चित एक भाव मिळून देणारा असतो. फ्युचर्स मार्केटप्रमाणे ऑप्शन्समधील व्यवहार अधिक जोखीम असते. कारण खरेदीदार अधिमूल्य देऊन केव्हाही यातून बाहेर पडू शकतो. पण विकणारा (अधिमूल्य घेणारा) मात्र खरेदीदारावर अवलंबून असतो आणि त्याला कराराच्या दिवशी वायदा पूर्ण करावाच लागतो. ज्या कंपन्यांमध्ये आयात निर्यात जास्त असते अशा कंपन्या निधी रक्षणासाठी (हेजिंग) असे करार हमखास करतात. ज्यामुळे चलनाशी संबंधित असणारी कंपनीची जोखीम कमी होते. देशांतर्गत भांडवली बाजारात मर्यादित कंपन्यांच्या समभागांमध्ये ऑप्शन्समधील व्यवहार पार पडतात.

हेही वाचा… वित्तरंजन : वायदे बाजार

अमेरिकी कंपनी हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर स्टॉकमध्ये फेरफार केल्याचा आरोप ठेवल्यानंतर देशभरात चर्चेत आहे. ही कंपनी शॉर्ट सेलिंग व्यवहारातील तज्ज्ञ आहे. शॉर्ट सेलिंग म्हणजेच एखाद्या कंपनीच्या समभागांची किंमत कमी होणार आहे असा विश्वास असल्यास ते आपल्याकडे नसतानादेखील त्याची जास्त भावाने विक्री करायची. नंतर समभागांची किंमत कमी झाल्यावर ते खरेदी करायचे. म्हणजेच यातील जी तफावत असते, ती नफा म्हणून पदरात पडून घेता येते. हिंडेनबर्ग रिसर्च आपल्या ग्राहकांना अशाच प्रकारची माहिती उपलब्ध करून देते. ज्या माध्यमातून एखाद्या कंपनीचे चुकीचे व्यवहार उघडकीस आणले जातात. म्हणजे ग्राहक त्या कंपन्यांचे समभाग जास्त भावात विकण्याचा करार करतात. अहवाल बाजारात खुला झाल्यानंतर समभागांचे भाव जेव्हा कोसळतात तेव्हा हिंडेनबर्गच्या ग्राहकांचा फायदा होतो. अर्थात हे सगळे अनुमान किंवा एक प्रकारचा सट्टाच असतो.

@AshishThatte

ashishpthatte@gmail.com

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Futures and options market concept and information print eco news dvr