आजच्या आपल्या कहाणीचा नायक वयाच्या २५ व्या वर्षी लक्षाधीश झाला. जन्म २५ जुलै १९४२. वडील व्यापारी होते. जर्मनीमध्ये १९६१ ला खासगीकरण सुरू झाले. फोक्सवॅगन या कंपनीचे प्रत्येकाला फक्त पाच शेअर्स घेता येतील असे कंपनीने जाहीर केले. कार्ल हेलरडिंग (Karl Ehlerding) त्या वेळी हायस्कूलमध्ये शिक्षण घेत होता. विद्यार्थ्यांनी त्या वयातच शेअर बाजाराची गोडी लागावी, या हेतूने कंपनीने विद्यार्थ्यांना कमी भावात शेअर मिळू शकतील, असे जाहीर केले. कार्ल त्यानुरूप बँकेत शेअर घेण्यासाठी गेला. पण बँकेने फक्त एकच अर्ज त्याला दिला. मात्र त्याने त्याच्या वर्गातील २७ विद्यार्थ्यांसाठी अर्ज मागितले आणि प्रत्येकी २१० डॉइश मार्कला शेअर्स मिळविले. हे मिळालेले सर्व शेअर्स त्याने ८८० डॉइश मार्कला विकले. एखादा शेअर तीन महिने सांभाळल्यावर विकला तर सर्व भांडवली लाभ तेव्हा तेथे करमुक्त असे. साहजिकच त्याला यातून चांगला पैसा बनविता आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिक्षण घेत असताना गुंतवणुकीची अशा सुरुवातीला त्याने अनुभवाची जोड दिली. हॅम्बर्गला विद्यापीठात वर्तमानपत्रे वाचायला मिळायची. त्याने सर्व वर्तमानपत्राचे बारकाईने वाचन केले. चांगला गुंतवणूकदार व्हायचे असेल तर १) गणित चांगले पाहिजे २) तर्कशास्त्राचा वापर करता आले पाहिजे आणि ३) व्यवहार ज्ञान पाहिजे.

आणखी वाचा-माझा पोर्टफोलियो : पोर्टफोलिओला महारत्नाची जोड

फक्त या तीन मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करून त्याने गुंतवणुकीस सुरुवात केली. जर्मनीत रेल्वे कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करता येत होती. एका रेल्वे कंपनीचे दिवाळे निघणार अशा बातम्या वर्तमानपत्रात येऊ लागल्या. या कंपनीची दर्शनी किंमत ३०० डॉइश मार्क होती आणि बाजारात तिचे शेअर्स ३६ डॉइश मार्क उपलब्ध होते. कार्लने बारकाईने ताळेबंदाचा अभ्यास केला. या कंपनीचे जास्तीत जास्त शेअर्स गोळा केले. फक्त २२ वर्षांचा असताना आयुष्यात ही मोठी संधी त्याने पैसे मिळविण्यासाठी वापरली. त्याने प्रत्येकी ५३० डॉइश मार्क या भावाने सर्व शेअर्स विकले आणि तुफान पैसा कमावला. जर्मनीचा वॉरेन बफे असे त्याला का संबोधले जाते, याचे हे वर दिलेले काही नमुने. बफेला बेंजामिन ग्रॅहमसारखा आयुष्याच्या सुरुवातीला गुरू लाभला, तसे कार्ललासुद्धा त्याच्या सुरुवातीच्या काळात जोहान्स फेटल या प्राध्यापकाने शेअर बाजार गुंतवणुकीविषयी सर्व काही शिकविले आणि यातून तो मोठा गुंतवणूकदार बनला. २२ जुलै २०२२ या दिवशी त्याने आपला ८० वा वाढदिवस साजरा केला.

जर्मनीची अर्थव्यवस्थेच्या तुलनेने तिथला शेअर बाजार अजूनही लहान आहे. अमेरिकेत जगाच्या पाठीवरील कोणताही गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतो. परंतु जर्मनी, जपान ही अशी ठिकाणे आहेत जेथे भाषेची अडचण मोठी आहे. तरी जगाच्या शेअर बाजारातील माणसे ही सारखीच असतात. बाजारातून पैसा कमवायचा ही महत्त्वाकांक्षा भारत असो वा जर्मनी सर्वत्र असतेच. गुंतवणुकीची शैली ही मूल्य विरुद्ध भांडवलवृद्धी यानुसार वेगळी असू शकते. बाजार प्रत्येक वेळी कंपनीचे योग्य मूल्यमापन करेलच असे अजिबात नाही आणि त्यामुळे जगाच्या बाजारात अनेक कंपन्या त्यांचे मूल्य आणि शेअरची किंमत यातील तफावत यांचे संशोधन निरंतर सुरू असते. मग या सर्वांचा अभ्यास करून पुन्हा गुंतवणुकीशी संबंधित तीन मुद्देच कामी येतात – गणित चांगले हवे, तर्कशास्त्राचा चांगला वापर आणि सामान्य व्यवहारज्ञान वापरता यायला हवे. कार्लने हे सर्व व्यवस्थित वापरले म्हणूनच तो यशस्वी झाला. भारतातही काही कंपन्यांच्या बाबतीत काही गुंतवणूकदारांनी याच मुद्द्यांचा वापर करून बक्कळ पैसा कमावला याची अनेक दाखले या साप्ताहिक स्तंभानेच दिले आहेत. मात्र आजसुद्धा अनेक कंपन्यांबाबत हे अनुभवास येते की, स्वस्त शेअर महाग असतो आणि महाग शेअर स्वस्तात पडतो, महागातील शेअर दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगला ठरतो.

आणखी वाचा-दुरावलेला खरेदी उत्साह बाजारात परत दिसेल?

१९८५ ला हिंदुस्थान लिव्हर या कंपनीचा १० रुपये दर्शनी किमतीचा शेअर ८५ रुपयांना उपलब्ध होता. बाजारात फायनान्स लिझिंग कंपन्यांचे पेव फुटले होते. रॉस मुरारका फायनान्स नावाच्या कंपनीचा १० रुपये दर्शनी किमतीचा शेअर १३० रुपयांस उपलब्ध होता. शर्ट, पायजमा आणि फक्त ७ वीपर्यंतचे शिक्षण अशा एका नाशिकच्या माणसाने रॉस मुरारका विकून हिंदुस्थान लिव्हरचे शेअर्स खरेदी केले. त्या वेळचे त्यांचे एक वाक्य पक्के डोक्यात बसलेले आहे. ते म्हणजे – ‘कभी कभी गधा घोडे से भी आगे निकल जाता है.’ कार्लची बाजारात नोंदणी असलेली एक कंपनी होती. ती कंपनी त्याच्या सर्व गुंतवणुकीची होल्डिंग कंपनी होती. डब्ल्यूसीएम ही कंपनी दिवाळखोर झाली. मात्र कार्ल त्यातून सहीसलामत बाहेर पडला आणि त्याने स्थावर मालमत्ता विकासक म्हणून काम सुरू केले. भरपूर पैसा कमावल्यावर दानशूर म्हणून नाव कमावले. ६० वर्षे गुंतवणूक क्षेत्रात राहिला, पण शक्यतो प्रसिद्धी, प्रसारमाध्यमांपासून दूर राहिला. नव्या पिढीला तर त्याची माहितीसुद्धा नाही.

कंपन्यांचा बारीक नजरेने अभ्यास करणे, त्यांच्या ताळेबंदांची छाननी, वर्तमानपत्रांचे बारकाईने वाचन हे त्याचे रोजचे काम होते. एका कार निर्मात्याबद्दल जर्मनीतील मोठ्या दैनिकाने बातमी छापली. मथळा होता – ‘परमेश्वरसुद्धा या कंपनीच्या शेअर्सची खरेदी करत असेल.’ ती कंपनी म्हणजे पोर्शे. पोर्शे व फोक्सवॅगनचे खासगीकरण आणि या दोन कंपन्यांत ज्या ज्या व्यक्तींची मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होती, त्यांच्याशी कार्लने संपर्क करून या कंपन्या आपल्या ताब्यात कशा येतील यासाठी प्रयत्न केले. शक्यतो नोंदणी असलेल्या मोठ्या कंपन्या त्याला गुंतवणुकीसाठी आवडायच्या.

एका कंपनीचा अभ्यास करताना त्याला लक्षात आले की, ही कंपनी अतिशय छोटी (मायक्रो कॅप) आहे. पण कंपनीकडे शहरात मोक्याच्या ठिकाणी ८०० एकर जागा आहे. त्या जागेत कंपनीचे एक रेस्टॉरन्ट आहे, कंपनीच्या मालकीचे ३० अपार्टमेंट् होते आणि एक म्युझियमदेखील होते. या कंपनीचे शेअर्स वेगवेगळ्या भावाने खरेदी करण्यास त्याने सुरुवात केली. सुरुवातील ६०-७० डॉइश मार्क, नंतर २००, ३०० डॉइश मार्क असा भाव मोजून त्याने २० टक्के भागभांडवल होईल इतके शेअर्स खरेदी केले. कंपनीच्या जागेजवळ एक सिमेंट उत्पादन करणारी कंपनी होती. त्या गावात जाऊन तेथे स्थानिक वृत्तपत्रात एक महत्त्वाची बातमी त्याला वाचायला मिळाली. या भागात जर्मन सरकार दोन नद्यांना जोडणारा कालवा निर्माण करत आहे. त्यासाठी लागणारे सिमेंट मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. या कंपनीच्या शेअर्सचीदेखील खरेदी करून अत्यंत आकर्षक भावात त्याने विक्री केली.

आणखी वाचा-‘व्याजदर शिखरावर असताना दीर्घ मुदतीची रोखे गुंतवणूक योग्य’

एखाद्या कंपनीचे शेअर्स विकल्यानंतरही कंपनीकडे दुर्लक्ष करायचे नाही हे त्याचे धोरण होते. एका कंपनीच्या बाबतीत, कंपनीने शेअर्सची पुनःखरेदी (बायबॅक) केल्यानंतर राहिलेल्या भागधारकांना प्रत्येक शेअरला २४,६०० डॉइश मार्क अशी ऑफर दिली आणि त्यातही त्याने पैसा कमावला. वॉरेन बफेला चार्ली मुंगेर हा सोबती मिळाला तसा कार्ललासुद्धा क्लॉस हॅन मित्र म्हणून लाभला. मात्र गुंतवणूक संशोधन कार्ल स्वतः करायचा आणि त्यानंतर पुढच्या सर्व बाबी हॅन सांभाळायचा. कार्लला जर्मनीबाहेर गुंतवणूक करण्यासाठी जाण्याची गरजच त्यामुळे पडत नसे.

जर्मनीविषयी महत्त्वाच्या एका गोष्टीचा उल्लेख करायला हवा. शेअर गुंतवणूक संस्कृती जर्मनीमध्ये पुरेशी विकसित झालेली नाही. जर्मनीने दोन महायुद्धे अनुभवली. महागाईचे फटके सहन केले. त्यामुळे अनेकांचे बाजारात प्रचंड नुकसान झाले. या अनुभवामुळे गुंतवणूकदारांचा तेथे बाजारावर विश्वास नाही हे कटू सत्य आहे. या स्थितीतील जर्मनीतसुद्धा कार्लने कसा पैसा कमावला याचा हा वेध म्हणून अधिकच रंजक बनतो.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Germanys warren buffett karl hellerding print eco news mrj