मुलगी म्हणजे काळजाचा तुकडा, मुलगी म्हणजे जबाबदारी! मुलगी म्हणजे आई-वडिलांचा अभिमान आणि मुलगी म्हणजे कुटुंबाचे प्राण! आपल्या सर्वसाधारण कुटुंबांमध्ये आधीच्या काळात मुली असणं एक जबाबदारी म्हणून मानलं जात होतं. घरात ज्या दिवशी मुलगी जन्माला आली की तेव्हा पासून तिच्या लग्नासाठी तरतूद करायला तिचे वडील सुरुवात करायचे. पुढे जसजसं मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष वाढलं, तिचं करिअर घडवण्याकडे कुटुंबाचा कल वाढला तसतसं कुटुंबाच्या आर्थिक नियोजनामध्ये तिच्यासाठी करायची तरतूद वाढायला लागली. कोणे एकेकाळी तिचं लग्न आणि त्यानंतर बाळंतपण इतकीच आपली जबाबदारी समजणारे तिचे आई-वडील, आज तिच्या आवडी निवडी, छंद, उच्च शिक्षण, लग्न, व्यवसाय या सर्वांसाठी तरतूद करू पाहत आहेत. या सर्व गोष्टींसाठी पैसे पुरवायचे तर आर्थिक नियोजन वेळीच करायला हवं. या संदर्भात आजच्या लेखातून काही महत्त्वाचे मुद्दे मी वाचकांसमोर मांडत आहे.

तसं पाहायला गेलं तर दीर्घकाळातील उद्दिष्ट लक्षात ठेवून मुलींसाठी गुंतवणूक नियोजन झालं पाहिजे. याच्यासाठी मुळात आर्थिक उद्दिष्ट ठरवायला हवीत – शिक्षण आणि लग्न तर आलंच, शिवाय तिचे छंद, पुढे जाऊन तिच्या उद्योगासाठी लागणारं भांडवल वगैरे. इथे छंदांचा मी विशेष उल्लेख करू इच्छिते, कारण काही छंद फार महाग असतात. उदाहरण घ्यायचं तर काही विशिष्ट क्रीडा – नेमबाजी, घोडेस्वारी, टेनिस अशा गोष्टींसाठी भरपूर पैसे खर्च होतात. तेव्हा तिच्या शिक्षणासाठी तरतूद करताना, या गोष्टींसाठी सुद्धा गुंतवणूक करायला हवी. मुलींच्या बाबतीत कपडे, साज-शृंगाराचे खर्च मुलांपेक्षा जास्त असू शकतात. तेव्हा कुटुंबाच्या मासिक खर्चांमधे याची तरतूद करावी लागते.

Chhoti Tara Tadoba , Tadoba Chhoti Tara Tiger Calf Video, Chhoti Tara Tiger,
VIDEO : ‘तिने’ सहावेळा मातृत्त्वाचा अनुभव घेतला, पण आता…
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
sex ratio of birth in nashik municipal corporation
जिल्ह्यात लिंगोत्तर प्रमाणात घट; लिंग चाचणीची दक्षता समिती बैठकीत साशंकता
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Nagpur Guardian Minister, Devendra Fadnavis,
नागपूरच्या पालकमंत्रीपदावरून तर्कवितर्क
Loksatta chaturang  Temperament Obsessive Compulsive Personality Disorder
स्वभाव-विभाव :परिपूर्णतेचा अट्टाहास
Ner Taluka, groom marriage, groom Ner bullock cart ,
यवतमाळ : शेतकरी नवरदेवाने घोड्यावरून नव्हे तर बैलबंडीवरून काढली लग्नाची वरात, स्वत: धुरकरी बनलेल्या युवकाचे पंचक्रोशीत कौतुक
congress shocking performance In maharashtra assembly election
लोकजागर : काँग्रेसचा ‘नागरी’ पेच!

शिक्षणाच्या बाबतीतसुद्धा मुलींचे खर्च आदल्या काळापेक्षा वाढलेले आहेत. आधी पदवीपलीकडे शिक्षण घेणाऱ्या मुली कमी असायच्या. मात्र त्या तुलनेत आज अनेक मुली पव्युत्तर शिक्षण पूर्ण करून परदेशी सुद्धा जात आहेत. डॉक्टरेट घेत आहेत. मुलींसाठी न समजणाऱ्या क्षेत्रात जसं की, वैमानिक, गोल्फ यामध्ये सुद्धा आज अनेक मुली स्वतःचे स्थान निर्माण करत आहेत.या खर्चांची वेळीच सोय केली तर इतर उद्दिष्ट्ये बाधित होत नाहीत. अन्यथा निवृत्ती निधी कमी पडायची शक्यता वाढते. मुलींच्या शिक्षणासाठी काही सरकारी योजना राबवल्या जात आहेत. त्यांचा फायदा घेऊन मुलींच्या शिक्षणाचा खर्च कमी करता येऊ शकतो. अनेकदा अशा योजना आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्या कुटुंबासाठी असतात. तेव्हा यांची योग्य माहिती मिळवून, व्यवस्थित कागद आणि माहिती पुरवून सरकारच्या अशा योजनांमधून अर्थसहाय्य मिळू शकतं.

हेही वाचा >>>Money Mantra: फंड विश्लेषण – क्वान्ट मिड कॅप फंड

महाराष्ट्र राज्यात माझी कन्या भाग्यश्री नावाची योजना सरकारतर्फे चालवली जात आहे. या योजनेंतर्गत मुलीच्या जन्माच्या वेळी पालकांना ५०,००० रुपये मिळतात. यासोबतच या योजनेत अपघात विमा संरक्षणही उपलब्ध आहे.यावर १ लाख रुपयांचा अपघात विमा आणि ५,००० रुपये ओव्हरड्राफ्टच्या माध्यमातून उपलब्ध आहे. याशिवाय मुलीच्या जन्मानंतर एका वर्षाच्या आत पालकांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर ५० हजार रुपये दिले जातात. तसेच दोन मुलींच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केली तर दोन्ही मुलींच्या नावावर प्रत्येकी २५,००० रुपये मिळतात. माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत मिळालेली रक्कम त्यांच्या शिक्षणासाठी खर्च करता येऊ शकते. याच्या अधिक माहिती साठी राज्य सरकारच्या संकेतस्थळाला भेट द्या.

आता वळूया मुलींसाठीच्या गुंतवणुक पर्यायांकडे. त्यात सुकन्या समृद्धी योजनेचं नाव सर्वात पहिलं लक्षात येतं. केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेमध्ये १० वर्षाच्या आतील मुलींसाठी बँकेत किंवा पोस्टात खाते उघडता येते. या खात्यामध्ये वार्षिक १.५ लाख इतके पैसे जमा करता येतात. या पैशांवर प्रत्येक वर्षी व्याज दिलं जातं. सध्या ८.२ टक्के इतकं व्याज मिळतं. या व्याजावर कर लागत नाही. शिवाय प्रत्येक वर्षीच्या खात्यात भरलेल्या पैशांवर जुन्या करप्रणालीनुसार कर वजावट मिळते. हे खातं २१ वर्षांनी आपोआप बंद होतं. मुलीच्या उच्च शिक्षणासाठी या खात्यातून पैसे काढता येतात. मुलगी १८ वर्षांची झाल्यानंतर हे खातं बंद करता येतं.

या शिवाय दीर्घकाळासाठी उपयुक्त असे गुंतवणूक पर्याय म्हणजे समभाग निगडित म्युच्युअल फंड आणि थेट समभाग गुंतवणूक. मुलीच्या नावाने बँकेत खातं उघडल्यानंतर म्युच्युअल फंडामध्ये नियमित गुंतवणूक करता येते. ऑनलाईन गुंतवणूक सुद्धा शक्य आहे. मुलगी १८ वर्षांची होईस्तोवर पालकांचा त्यावर नियंत्रण असतं. परंतु १८ वर्षांची झाल्यानंतर ती गुंतवणूक पूर्णपणे तिच्या नियंत्रणाखाली जाते. आधी चालू असलेली एसआयपी थांबते आणि पुढे नव्याने सुरू करता येते. थेट समभाग गुंतवणूक करायची म्हटली, तर १८ वर्षांच्या आधी मुलीच्या नावाने ट्रेडिंग खातं उघडता येत नाही. तेव्हा समभाग फक्त घेता येतात, पण विकता येत नाही. याला एक पर्याय असू शकतो. पालकाच्या नावाने डिमॅट आणि ट्रेडिंग खातं उघडून त्यात मुलीला नॉमिनी ठेवणं. हे करण्यापूर्वी एकतर इच्छापत्र करावं किंवा वारसाहक्काचे नियम नीट समजून घ्यावे आणि त्यानुसार तरतूद करावी. सुकन्या समृद्धी आणि म्युच्युअल फंड मिळून एक चांगला पोर्टफोलिओ मुलींसाठी तयार करता येऊ शकतो. पालकाच्या जोखीमक्षमतेनुसार मासिक गुंतवणूक दोन्ही पर्यायांमध्ये करून खालील प्रमाणे रक्कम तयार करता येऊ शकते.

सुकन्या समृद्धी    म्युच्युअल फंड एसआयपी     एकूण

मासिक योगदान        २,५००       २,५००        ५,००० 

अंदाजित परतावा (वार्षिक)८ टक्के        १० टक्के                             –

गुंतवणूक काळ (वर्षे)           २१             २१                                 –

योगदान                रु. ६.३ लाख रु.       ६.३ लाख रु.          १२.६० लाख   रु. 

जमा निधी *         १५.१२ लाख  रु.     रु. १९.२० लाख  रु.         ३४.३२ लाख  रु. 

( *वार्षिक चक्रव्याज वाढीनुसार)

अशाप्रकारे आपल्या मुलींसाठी किंवा नातीसाठी चांगला निधी जमा करता येऊ शकतो. इतरही गुंतवणूक पर्याय आहेत. त्यांची सुद्धा योग्य सांगड घालून आपल्या मुलीची ध्येयपूर्ती होऊ शकेल. फक्त गरज आहे ती दूरदृष्टी, शिस्त आणि चिकाटीची. शिक्षणाच्या जोरावर मुली पुढे जात आहेतच. याला जोड द्या त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्याची. त्यांच्यावर लहानपणापासून केलेले अर्थ संस्कार त्यांच्या पुढच्या आयुष्याला आणि त्यांच्या पुढच्या कुटूंबाला नक्कीच उपयोगी पडतील. 

 trupti_vrane@yahoo.com 

प्रकटीकरण: हा लेख फक्त मार्गदर्शनपर आहे. इथे लेखिका कोणतीही जाहिरात करत नाही.

Story img Loader