भारतातील आघाडीची एफएमसीजी (Fast Moving Consumer Goods) ) कंपनी गोदरेज कंझ्यूमर प्रॉडक्ट्स पुन्हा एकदा आपल्या ग्रामीण बाजारपेठेतील दमदार कामगिरीमुळे बाजारात तेजी निर्माण करताना दिसत आहे. १३००० कोटी रुपयांची विक्री आणि जवळपास एक कोटीहून अधिक ग्राहकांच्या पसंतीस उतरलेला हा ब्रँड आहे. गोदरेज हा ब्रँड जरी सुप्रसिद्ध असला तरीही अर्थव्यवस्थेतील सर्वसामान्यांच्या खरेदी करण्याच्या क्षमतेवरच या ब्रँडचे भवितव्य अवलंबून आहे. प्रामुख्याने केसांची निगा राखणारी उत्पादने (Hair Care) घरगुती उत्पादने (Home Essentials) आणि वैयक्तिक वापराची उत्पादने (Personal Care) या कंपनीतर्फे बनवली जातात. भारतासहित सार्क देशात, आफ्रिका, अमेरिका, मध्यपूर्वेच्या देशात आणि लॅटिन अमेरिका खंडात सुद्धा या कंपनीची उत्पादने निर्यात केली जातात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या दोन तिमाही मध्ये कंपनीची कामगिरी सरस आणि समाधानकारक राहिलेली आहे. कंझ्यूमर प्रॉडक्ट बिझनेस मध्ये महाग आणि स्वस्त वस्तू विकणे यापेक्षा वस्तू किती संख्येने विकल्या जातात म्हणजेच, व्हॉल्युम ग्रोथ होते आहे का ? याला महत्त्व असते. घरगुती वापराची उत्पादने आणि वैयक्तिक वापराची उत्पादने यांच्या विक्रीमध्ये गेल्या तिमाहीत दणदणीत वाढ होताना दिसली आहे. समाधानकारक गोष्ट म्हणजे कंपनीच्या इंडोनेशियातील व्यवसायाने आता हळूहळू जम बसवायला सुरुवात केली आहे. याचा कंपनीच्या नफ्यावर निश्चितच चांगला परिणाम होताना दिसतो आहे.

गेल्या तीन महिन्यात भारतीय रुपयाचे मूल्य सतत कमी होताना दिसले. मात्र याचा परिणाम कंपनीवर जास्त झाला नाही. कारण कंपनीची विक्री सतत वाढतच होती. कंपनीची प्रमुख उत्पादने असलेल्या घरगुती वापराची कीटकनाशके आणि खाद्यतेल या दोन्ही उत्पादनांमध्ये विक्रीचे आकडे समाधानकारक दिसले. पर्सनल केअर या श्रेणीतील वस्तूंच्या उत्पादनाचा खर्च घटल्यामुळे नफा अधिक वाढला असे दिसून येत आहे. गेल्या वर्षभरात सतत पाम तेलाच्या किमतीत घट होताना दिसते आहे. खाद्यतेलाशी संबंधित उद्योगात कंपनीचे नफ्याचे मार्जिन सतत वाढताना दिसत आहे. या उद्योगाचे प्रॉफिट मार्जिन जवळपास २० टक्क्यांच्या आसपास राहिले तर कंपनीला नफा कमवणे सोपे जाईल.

यावर्षीच्या सप्टेंबरअखेरीस म्हणजेच दुसऱ्या तिमाहीच्या अखेरीस कंपनी ‘नेट कॅश पॉझिटिव्ह’ या स्थितीत जाण्याचा प्रयत्न करणार आहे. म्हणजेच सर्व खर्च वजा जाता कंपनीकडे रोकड शिल्लक राहील. पुढच्या दोन ते तीन वर्षात कंपनीचा व्यवसाय दुप्पट करण्याचे मॅनेजमेंटचे ध्येय आहे. जसजशी भारतातील देशांतर्गत बाजारपेठ भक्कम होईल तसे आपोआपच कंपनीचे नफ्याचे प्रमाण आणि आकडे दोन्ही वाढताना दिसतील. भारतातील ग्रामीण भागातील लोकांच्या उत्पन्नात जसजशी वाढ होणार आहे आणि लोकांची जीवनशैली जशी बदलणार आहे त्यातूनच नवनवीन गृहपयोगी वस्तूंचे बाजारातील स्थान बळकट होणार आहे.

गोदरेज कंझ्यूमर प्रॉडक्ट लिमिटेड या कंपनीचे ब्रँड्स बघितले तर आपल्याला याचा अंदाज येईल. गोदरेज एक्स्पर्ट, गोदरेज इझी, गोदरेज एअर, प्रोटेक्ट अशा नवीन उत्पादनांसोबत गुड नाईट हिट आणि सिंथॉल ही पारंपारिक उत्पादने सुद्धा ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहेत. कंपनीच्या दृष्टीने दोन महत्त्वाचे घटक म्हणजे यावर्षीचा मान्सून समाधानकारक राहिला तर ग्रामीण बाजारपेठेत पुन्हा एकदा तेजी निर्माण होईल. २०२२-२०२३ या आर्थिक वर्षात शेवटच्या तीन महिन्यात म्हणजेच जानेवारी २०२३ पासून ग्रामीण बाजारपेठेत पुन्हा एकदा तेजी पाहायला मिळाली. येत्या वर्षात निवडणुका असल्याने सरकारकडून अर्थसंकल्पामध्ये कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी तरतुदी वाढवण्यात आल्या तर त्याचा थेट लाभ कंपनीच्या विक्रीला मिळू शकतो. गेल्या तीन-चार महिन्यात भारतातील आघाडीच्या स्टॉक ब्रोकर्स आणि रिसर्च कंपन्यांनी या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. सध्या (१६/०६/२०२३) कंपनीचा बाजारभाव १०६४ रुपये आहे. गेल्या वर्षभरात या शेअरने गुंतवणूकदारांना २३ टक्के इतका परतावा दिला आहे.

**या लेखात उल्लेख केलेल्या शेअर मध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्यानुसारच आणि आपल्या जोखिमेवर गुंतवणूक करावी. सदर लेखकाने किंवा त्याच्या नातेवाईकाने या कंपनीच्या शेअर मध्ये वैयक्तिक गुंतवणूक केलेली नाही.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Godrej consumer fmcg share market first quarter rural mmdc psp
Show comments