सोन्याने मानवालाच नव्हे तर सुवर्णमृगाचा हट्ट धरलेल्या देवलोकीच्या सीतेलासुद्धा भुरळ घातली होती. पुढे औद्योगिकीकरणामुळे चांदीचा वापर वाढल्याने सोन्याप्रमाणे चांदीकडेसुद्धा गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहण्यात येऊ लागले. मात्र शेअरबाजाराच्या तुलनेत सोने आणि चांदी यांचे स्वतःचे वेगळे आवर्तन असते. राजकीय किंवा आर्थिक अस्थिरता वाढते तेव्हा मौल्यवान धातूंची मागणी वाढल्याने त्यांचे मूल्य वाढते. जेव्हा अस्थिरता कमी होते तेव्हा वातावरण पुन्हा समभाग गुंतवणुकीसाठी अनुकूल होते. बऱ्याचदा सामान्य गुंतवणूकदार सोन्यातील मागील परतावा पाहून गुंतवणुकीला सुरुवात करेपर्यंत सोन्यातील तेजी संपलेली असते.
सोने आणि चांदी अस्थिरतेच्या काळात समभागापेक्षा अधिक परतावा का देतात? जर सोन्याचांदीतील गुंतवणूक उत्पन्न देत नसेल तर त्यामध्ये गुंतवणूक का करावी? आणि दीर्घकाळात समभाग गुंतवणूक अधिक नफा देणारी असल्याने, गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातूंमध्ये गुंतवणूक करावी का? असे अनेक प्रश्न उद्भवतात.
१. एका विशिष्ट टप्प्यात सोने आणि चांदी समभागापेक्षा अधिक परतावा का देतात?
खालील आर्थिक परिस्थितींमध्ये सोने आणि चांदीची भरभराट होते (परंतु गुंतवणुकीतील जोखीम कमी झाल्यावर भाव स्थिरावतात किंवा बऱ्याचदा कमी होतात.)

१.१ महागाई आणि चलनाचे अवमूल्यन

वाढत्या महागाईमुळे स्थानिक चलनाचे मूल्य कमी होते, ज्यामुळे सोने आणि चांदी गुंतवणूक मूल्य रक्षणाच्या दृष्टीने आकर्षक ठरतात.

उदाहरण: भारतात वर्ष १९७० दरम्यान महागाई वाढली होती आणि २०२१-२२ मध्ये जगात कमालीची अस्थिरता होती. साहजिकच या काळात सोने गुंतवणुकीने समभागांच्या तुलनेत अधिक परतावा दिला.

१.२ आर्थिक आणि भू-राजकीय अनिश्चितता

औद्योगिक मंदी, युद्धे आणि वैश्विक आर्थिक संकटे आल्यास गुंतवणूकदारांचा कल रोखे समभाग यांच्यासारख्या आर्थिक मालमात्तांपेक्षा सोन्यासारख्या सुरक्षित मालमत्तेत गुंतवणूक करण्याकडे असतो.

उदाहरण: वर्ष २००८ मधील वैश्विक आर्थिक संकट आणि वर्ष २०२० मध्ये करोनासारख्या बाजारातील मोठ्या घसरणी दरम्यान सोन्याने चांगली कामगिरी केली.

१.३ व्याज दर कल :

व्याजदर आणि सोनेचांदीपासून मिळणारा भांडवली लाभ यांच्यात व्यस्त संबंध आहेत. व्याज दर वाढतात तेव्हा सोन्यातील भांडवली लाभ घसरतो आणि व्याज दर कमी होतात तेव्हा सोने-चांदी अधिक लाभ देतात.

उदाहरण : वर्ष २००९-११ या तीन वर्षांत सोन्याच्या भावातील वाढ जवळपास शून्य होती.

१.४ अमेरिकी डॉलरची सुदृढता आणि आणि मध्यवर्ती बँकांची धोरणे

कमकुवत डॉलर धातूंतील गुंतवणुकीला चालना देतो. डॉलर जेव्हा कमकुवत होतो तेव्हा मध्यवर्ती बँका सोन्यातील गुंतवणूक वाढवितात.

उदाहरण : वर्ष २०१९-२० मध्ये जागतिक मध्यवर्ती बँकांच्या सोने खरेदीत वाढ झाली.

१.५ बाजार भावना आणि सट्टेबाजी

अनिश्चिततेच्या काळात गुंतवणूकदारांचा कल मौल्यवान धातूत गुंतवणूक करण्याकडे असल्याने सोन्यांत सट्टेबाजी वाढते. परंतु वातावरण सामान्य होते तेव्हा समभागांच्या किमतीत वाढ होते.

उदाहरण : वर्ष २०११ मध्ये निर्देशांकांनी शिखर गाठल्यानंतर, सोन्यातील गुंतवणूक घट झाली आणि त्यानंतर अनेक वर्षे गुंतवणूक कमी होत गेली.

२. जर सोने आणि चांदी उत्पन्न देत नाहीत, तर त्यामध्ये गुंतवणूक का करावी?

सोने आणि समभाग यांच्यापासून मिळणाऱ्या लाभात व्यस्त संबंध आहेत. समभाग गुंतवणुकीत लाभांशाच्या रूपात काही रोखतेची निर्मिती होते. सोने आणि चांदी असा फायदा आपणहून देत नाहीत. मग गुंतवणूकदारांनी त्यांचा विचार का करावा?

२.१ पोर्टफोलिओतील वैविध्य आणि जोखीम व्यवस्थापन

शेअर बाजारातील अस्थिरतेत मुदलाचे रक्षण करण्यासाठी मौल्यवान धातू संरक्षक म्हणून काम करतात. जेव्हा समभाग घसरतात तेव्हा सोने आणि चांदी यांचे भाव अनेकदा वाढतात.

उदाहरण : वर्ष २००८ च्या घसरणी दरम्यान, सोन्याने पोर्टफोलिओला स्थैर्य दिले.

२.२ महागाईपासून संरक्षण

मोठ्या कालावधीत सोने आणि चांदी रोकड किंवा रोख्यांपेक्षा अधिक चांगली क्रयशक्ती टिकवून ठेवतात.

उदाहरण : वर्ष १९७१ पासून डॉलरने ८५ टक्क्यांपेक्षा अधिक मूल्य गमावले आहे, तर सोन्याच्या किमती वाढल्या आहेत.

२.३ आणीबाणीतली ढाल

बाजारातील अत्यंत दयनीय स्थितीत सोने आणि चांदी रोकड सुलभ पोर्टफोलिओ आणि स्थैर्य प्रदान करतात.

उदाहरण : वर्ष २०२२ च्या रशिया-युक्रेन संकटादरम्यान सोन्याचा भाव झपाट्याने वाढला.

२.४ मर्यादित पुरवठ्यामुळे मूल्याचे रक्षण

सरकारी रोख्यांचा पुरवठा अमर्यादित असतो. परंतु मौल्यवान धातूंचा मर्यादित पुरवठा असतो, ज्यामुळे ते संपत्तीचे दीर्घकालीन भांडार बनू शकतात. सोने आणि चांदी नियमित उत्पन्न मिळवू शकत नाहीत, परंतु ते मुदलाचे संरक्षण आणि पोर्टफोलिओची रोकडसुलभता देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात.

३. मोठ्या कालावधीत समभागसंलग्न गुंतवणूक सोन्याला मागे टाकताना दिसते. तर मग गुंतवणूकदारांनी सोन्यात पैसे का गुंतवावेत?

ऐतिहासिकदृष्ट्या, सोने आणि चांदीच्या तुलनेत समभागांनी दीर्घ कालावाधीत अधिक परतावा दिला आहे. तथापि, याचा अर्थ असा नाही की, गुंतवणूकदारांनी मौल्यवान धातूकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले पाहिजे.

३.१ दीर्घकालीन कामगिरी तुलना

शेअर बाजार सोन्यापेक्षा कितीतरी पटीने चांगली संपत्ती वाढवतात.

उदाहरण : वर्ष १९८० पासून, एसॲण्डपी ५०० ने १० टक्के वार्षिक परतावा दिला आहे. तर याच काळात सोन्याने सरासरी ५-६ टक्के दरम्यान वार्षिक परतावा दिला आहे.

३.२ पोर्टफोलिओमध्ये सोने आणि चांदी ठेवण्यामागचा उद्देश

मौल्यवान धातू पोर्टफोलिओला स्थैर्य देण्याचे काम करतात. पोर्टफोलिओची अस्थिरता कमी करून परतावा सुधारण्याचे काम धातू करतात. मौल्यवान धातूत ५ ते १० टक्के वाटप केल्यास जोखीम-समायोजित परतावा सुधारतो.

३.३ आर्थिक आवर्तनानुसार अतिरिक्त वाटप

जेव्हा अनिश्चितता जास्त असते तेव्हा गुंतवणूकदार मौल्यवान धातूत गुंतवणूक वाढवू शकतात आणि समभाग गुंतवणुकीत तेजी असताना कमी करू शकतात.

उदाहरण : मंदीच्या आधी सोन्यामध्ये अधिक गुंतवणूक करणे आणि तेजीत ते कमी करण्यामुळे परतावा सुधारल्याचे दाखले इतिहासात आहेत.

३.४ आणीबाणीत वापर की दीर्घकालीन योजना?

कोणत्याही पोर्टफोलिओचे उद्दिष्ट मुदलाचे संरक्षण करत त्यात वाढ करणे, हे असते. काही गुंतवणूकदार संकटात मुदलाच्या संरक्षणासाठी सोने आणि चांदीतली गुंतवणूक वाढवतात तर काही ती दीर्घकालीन ठेवतात. पोर्टफोलिओमधील मोठी गुंतवणूक ही समभाग आणि त्या संलग्न साधनांमध्ये असायला हवी. मौल्यवान धातूंचे प्रमाण हे एक योजना म्हणून हवे. मौल्यवान धातू पोर्टफोलिओमध्ये वैविध्य आणून जोखीम व्यवस्थापन सुदृढ करते.

४. निष्कर्ष:

सोने आणि चांदीच्या गुंतवणुकीसाठी योग्य दृष्टिकोन

४.१ सोन्या-चांदीचे भाव कधी वधारतात?

महागाई, भू-राजकीय संकट आणि आर्थिक मंदीत सोने आणि चांदी चांगली कामगिरी करतात. मात्र आर्थिक तेजीत तुलनेने कमी कामगिरी करतात.

४.२ मौल्यवान धातू हे जोखीम व्यवस्थापनाचे तंत्र आहे. ते उत्पन्न देणारे नाहीत. त्यांची भूमिका पोर्टफोलिओला स्थैर्य देणे आहे. व्याज किंवा लाभांशासारखे रोकड निर्मिती नव्हे.

४.३ गुंतवणुकीतून दीर्घकालीन परतावा समभागच देतात. समभाग कालांतराने संपत्ती वाढवतात. मात्र मौल्यवान धातू मूल्याचे संरक्षण करतात.

४.४ पोर्टफोलिओ कसा असावा?

एकंदर विचार करता सोने आणि चांदीचे प्रमाण एकूण गुंतवणुकीच्या ५ ते १० टक्क्यांपर्यंत सीमित राखणे योग्य ठरते. आणीबाणीच्या काळात हे प्रमाण वाढवल्यास चालते. मौल्यवान धातू जोखीम व्यवस्थापित करण्यात मदत करतात. म्हणून त्यातील भाववाढीचे गणित समजून गुंतवणूक करायला हवी.

यशस्वी गुंतवणुकीसाठी शुभेच्छा! ‎

Story img Loader