पैसे काढण्यासाठी सोन्याचे एटीएम कशाला हवे? पण हे एटीएम सोन्याचे नसून ज्या एटीएममधून शुद्ध सोने बाहेर येते त्या अर्थाने हे सोन्याचे एटीएम आहे. रोख रकमेऐवजी खरे सोने देणारे हे एक विक्री यंत्रच आहे. फक्त इथे कुठलीही वस्तू न येता चक्क सोने बाहेर येते. अर्थातच नाणे किंवा इतर स्वरूपात हे सोने प्राप्त करता येईल. रेल्वे स्टेशनवर पाण्याचे एटीएम असते, स्त्रियांच्या स्वच्छतागृहात सॅनिटरी पॅडचे एटीएम असते, खाण्याच्या वस्तू असल्यास खाण्याचे एटीएम असते.
सोन्यावरील भारतीयांचे प्रेम जगजाहीर आहे. मात्र सोन्यावर प्रेम करणारे लोक भारतातच नाहीत तर जगभरात आहेत, त्यात आखाती देशात सोन्याला अधिक मागणी आहे. म्हणूनच जगातील पहिले सोन्याचे एटीएम आबुधाबी येथील एमिरेट्स हॉटेल येथे २०१० मध्ये उघडण्यात आले. भारतीयांचे सोन्यावर प्रेम असून देखील अशा प्रकारे सोन्याचे एटीएम भारतात आणण्यास २०२२ साल उजाडले. भारतात केरळमध्ये सोने खरेदीला अधिक प्राधान्य देतात. मात्र भारतात सोन्याचे पहिले एटीएम उघडले ते हैदराबादमध्ये. मागील महिन्यामध्ये काही कामानिमित्त हैदराबादला जाण्याचा योग आला. पण दुर्दैवाने सोन्याचे एटीएम मात्र नेमके त्या वेळेला बंद होते. साध्या एटीएम आणि सोन्याच्या एटीएममध्ये किंवा इतर विक्री यंत्रांमध्ये मोठा फरक म्हणजे किंमत आणि गुणवत्तेची खात्री. त्यातही सोन्याचे भाव वेळोवेळी बदलणारे म्हणजे इतर वस्तूंसारखे नाही. शिवाय विक्री यंत्रांमध्ये रोख रक्कम स्वीकारली जाऊ शकते. पण सोन्याचे भाव जास्त असल्यामुळे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरण्याची सोय असली पाहिजे. सोन्याचा मोठा पेच म्हणजे त्याच्या गुणवत्तेचे प्रमाणपत्र. म्हणजे तेही सोन्याबरोबर मिळाले पाहिजे. सुरुवातीचे सोन्याचे एटीएम तर १० दिवसांत सोने परत देखील घ्यायचे. आपल्याकडे सोन्याच्या खरेदीचा आनंद काही निराळाच असतो. तसेच ग्राहकांचा कल सोन्याचे दागिने विकत घेण्याकडे अधिक असतो. त्यामुळे एटीएम खरेदी यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल असे दिसते.
अजून तरी एकच सोन्याचे एटीएम भारतात असल्याचे वाचनात आले आहे. अजून दुसरे उघडले आणि विशेषतः महाराष्ट्रात तर नक्की खरेदी करा किंवा नुसते बघायला तरी जा. नवउद्यमींसाठी ही एक नवीन संकल्पना आहे. फक्त सोन्यावर अवलंबून न राहता चांदी किंवा इतर वस्तूंचा देखील विचार करता येऊ शकतो. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी सोन्याचे ई-प्रमाणपत्र प्रत्यक्ष सोन्यामध्ये बदलल्यास किंवा उलटे केल्यास तो भांडवली लाभ न मानण्याचा प्रस्ताव दिला आहे. म्हणजे भारत सरकार खरे तर प्रत्यक्ष सोन्याच्या खरेदीला नाउमेद करत आहे. तेव्हा पुढे जाऊन सोन्याचा एटीएमच्या यशाची गाथा बघणे चित्तवेधक ठरेल.
( लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाऊंटंट म्हणून कार्यरत )
ashishpthatte@gmail.com
@AshishThatte