पीटीआय, सॅन फ्रान्सिस्को
तंत्रज्ञानाधारित महाकाय जागतिक कंपन्या असलेल्या ‘गूगल’ आणि ‘ॲमेझॉन’मध्ये नोकरकपातीचा प्रवाह नववर्षातही सुरूच असून, खर्च कमी करण्याच्या उपायांचा एक भाग म्हणून दोन्ही कंपन्यांतील हजारोंच्या घरात कर्मचाऱ्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्याचे चित्र आहे.
जगातील सर्वात मोठे सर्च इंजिन असणाऱ्या ‘गूगल’ने हार्डवेअर, आवाज (व्हॉइस) साहाय्यित सेवा आणि अभियांत्रिकी विभागात काम करणाऱ्या शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. कंपनीने काही संघटनात्मक बदलदेखील केल्याने काही कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची कुऱ्हाड पडली आहे.
वर्षभरापूर्वीच ‘गूगल’ने सुमारे १२,००० कर्मचारी म्हणजेच सुमारे ६ टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. गेल्या वर्षभरात, मेटा या फेसबुकच्या मूळ कंपनीनेदेखील गुंतवणूकदारांना आश्वस्त करण्यासाठी २०,००० हून अधिक नोकऱ्या कमी केल्या. वर्ष २०२३ मध्ये त्याचे समभागांवर सकारात्मक पडसाद उमटले आणि मेटाच्या समभागांचे मूल्य सुमारे १७८ टक्क्यांनी वधारले.
हेही वाचा >>>‘सोनी’सह विलीनीकरण पूर्णत्वास जाणार- झी
या आठवड्याच्या सुरुवातीला ॲमेझॉनने प्राइम व्हिडीओ आणि स्टुडिओ विभागातील शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले. तसेच लाइव्हस्ट्रीमिंग मंच ट्विचवर काम करणाऱ्या सुमारे ५०० कर्मचाऱ्यांनादेखील कमी केले जाणार आहे.
‘एआय’साठी स्पर्धा तीव्र
‘गूगल’ आणि ‘मायक्रोसॉफ्ट’ या दोन्ही कंपन्या कृत्रिम प्रज्ञा अर्थात ‘एआय’ क्षेत्रात नेतृत्व स्थान मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परिणामी दोघांमध्ये स्पर्धा तीव्र झाली असून त्यासंबंधित कर्मचाऱ्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी त्यांच्यात चढाओढ सुरू आहे.
२.२६ लाख कर्मचाऱ्यांना नारळ
सरलेल्या वर्षात म्हणजेच वर्ष २०२३ मध्ये तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी सुमारे २.२६ लाख कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले. जे प्रमाण वर्ष २०२२ मधील कामावरून कमी करण्याच्या संख्येपेक्षा जवळजवळ ४० टक्क्यांनी अधिक आहे. ‘लेऑफ डॉट एफवायआय’ या मंचाने दिलेल्या माहितीनुसार, वर्ष २०२२ च्या जानेवारी ते डिसेंबर दरम्यान, तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांनी १.६४ लाख कर्मचाऱ्यांना अकस्मात कामावरून कमी गेले आहे.