कौस्तुभ जोशी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आपल्या आगामी राईट इश्यूची घोषणा करताना ग्रासिम या आदित्य बिर्ला उद्योग समूहातील कंपनीने आपले भविष्यातील विस्ताराचे मनसुबे उघड केले.

१९४७ साली स्थापन झालेल्या या कंपनीने ७६ वर्षाच्या कालावधीत दमदारपणे बाजारपेठेत आपले स्थान कायम ठेवले आहे. आदित्य बिर्ला उद्योग समूहाचा एक भाग असलेली ही कंपनी प्रमुख सात व्यवसायांमध्ये कार्यरत आहे. विस्कॉस फायबर, विस्कॉस यार्न, रसायने, वस्त्र प्रावरणे, इन्सुलिटर्स, बी-टू-बी ई-कॉमर्स या व्यवसायांमध्ये आपली वाटचाल सुरू ठेवताना कंपनीने अलीकडेच रंगांच्या उत्पादनामध्ये प्रवेश केला आहे.

‘विस्कोस स्टेपल फायबर’ म्हणजेच मानवनिर्मित आणि पर्यावरण स्नेही धाग्यांच्या निर्मितीमध्ये ही कंपनी आघाडीवर आहे. चार आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी सामंजस्य करार केल्यामुळे कंपनीला आधुनिक तंत्रज्ञानही मिळाले आहे. कंपनीचे देशभरात एकूण सहा ठिकाणी कारखाने कार्यरत आहेत.

२०१७ या वर्षात आदित्य बिर्ला नुवो या कंपनीचे ग्रासिममध्ये विलीन झाल्यावर आणि सेंचुरी रेऑन या कंपनीचे उत्पादन हक्क मिळाल्यावर रेऑनच्या निर्मितीमध्ये ग्रासिम ही भारतातील आघाडीची कंपनी झाली आहे.

हेही वाचा : कर-समाधान: डेट फंडातील गुंतवणूक कर-दृष्टीने अल्पमुदतीचीच !

लिनन क्लब या आघाडीच्या नाममुद्रे अंतर्गत ग्रासिम उद्योगसमूहाचा भाग असलेली जयश्री टेक्स्टाईल्स ही कंपनी उत्तम दर्जाच्या लिनन कापडाची निर्मिती करते. युरोपियन दर्जाचे लिनन भारतात निर्माण करण्यात ही कंपनी अग्रेसर आहे.

ग्रासिमला हरियाणा, पंजाब, कर्नाटक, तामिळनाडू, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या सहा राज्यात २०२५ या वर्षाअखेरीस आपल्या रंगांच्या कारखान्याची निर्मिती पूर्ण करायची आहे व या संपूर्ण प्रकल्पाची किंमत व गुंतवणूक अंदाजे दहा हजार कोटी रुपयांची असणार आहे.

राईट इश्यू म्हणजे काय ?

ज्याप्रमाणे आयपीओ म्हणजेच पब्लिक इश्यू मधून गुंतवणूकदारांसाठी कंपनी पहिल्यांदाच शेअर्स उपलब्ध करून देते तसेच राईट इशूच्या माध्यमातून सध्याच्या शेअर होल्डर्सना बाजारभावापेक्षा स्वस्तात शेअर्स देण्याची घोषणा कंपनी करते. यासाठी एक तारीख ठरवली जाते. एका उदाहरणाने ही संकल्पना समजून घेऊया. समजा एका कंपनीने आपला राईट इश्यू बाजारात आणायचा ठरवला तर तो किती रुपयांचा असेल ? याची घोषणा केली जाते व एक तारीख निश्चित केली जाते. समजा या कंपनीने 15 जानेवारी ही तारीख निश्चित केली आहे, तर 15 जानेवारी या तारखेला ज्यांच्याकडे त्या कंपनीचे शेअर्स असतील ते सर्व गुंतवणूकदार राईट इश्यू साठी पात्र ठरतात, म्हणजेच त्यांना बाजारभावानुसार थोड्या कमी किमतीमध्ये शेअर्स मिळतात. किती शेअर्स मिळतील याचे प्रमाणही कंपनीतर्फे दिले जाते. म्हणजेच पाच शेअर असणाऱ्या शेअर होल्डरला दोन शेअर असे प्रमाण असेल तर तुमच्याकडे जेवढे शेअर्स असतील त्यानुसार तुम्ही राईट इश्यू विकत घेऊ शकता.

हेही वाचा : क्षेत्र-अभ्यास: नवीन संधींचे माहेरघर: वाहन निर्मिती 

· ग्रासिमने ४००० कोटी रुपयांच्या राईट इश्यू मध्ये किंमत १८१२ रुपये प्रति शेअर ठेवली आहे. सध्याच्या बाजारातील ग्रासिमच्या एका शेअरच्या किमतीच्या तुलनेत १२ टक्के स्वस्तात हा राईट इश्यू उपलब्ध करून दिला आहे.

· सुमारे सव्वा दोन कोटी शेअर्स कंपनीतर्फे बाजारात आणले जाणार आहेत.

· १७९ शेअर्स मागे सहा शेअर्स हे प्रमाण त्यासाठी निश्चित केले आहे.

· राईट इश्यू ची रेकॉर्ड तारीख १० जानेवारी ठेवण्यात आली आहे. म्हणजेच १० जानेवारी पर्यंत ज्यांच्याकडे ग्रासिम कंपनीचे शेअर्स असतील त्यांना नव्या शेअर्ससाठी नोंदणी करता येईल.

· १७ जानेवारी ते १९ जानेवारी या कालावधीत हा राईट इश्यू गुंतवणूकदारांसाठी खुला असेल.

गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात कंपनीच्या संचालक मंडळाने या इश्यूला मंजुरी दिली होती. मानवनिर्मित धागे हा मुख्य व्यवसाय असलेल्या ग्रासिमने आता भविष्यात अन्य उद्योगांमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा : लक्ष्मीची पावले: सरलेल्या वर्षाप्रमाणे २०२४ ची खेळपट्टी गुंतवणुकीच्या बाजीसाठी पोषकच !

या राईट इश्यूचा वापर कंपनीच्या इतिहासातील सगळ्यात मोठ्या विस्तार योजनेसाठी केला जाणार आहे. कंपनीचा व्यवसाय उत्पादन आणि निर्मिती क्षेत्रात असल्यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान यंत्रसामग्री यामध्ये सतत गुंतवणूक करावी लागते. भविष्यात भारतातील दुसऱ्या क्रमांकाची रंगनिर्मिती करणारी कंपनी होण्याचा कंपनीचा मानस आहे.

शुक्रवारी बाजार बंद होताना ग्रासिमचा शेअर २०८० रुपयांवर स्थिरावला होता.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grasim industries announced right issue of rupees 4 thousand crore mmdc css