Gray Market – ग्रे मार्केट – उनाड बाजार

कितीही समजुतीच्या गोष्टी सांगा पण डोक्यात उजेड पडत नाही, असा एक वर्ग प्रत्येक समाजात असतो. अशांच्या स्वेच्छाचार, जाणूनबुजून केलेल्या खोड्या, वेडाचारातून होणाऱ्या उपद्रवाचा अनुभवही नवीन नाही. किंबहुना वेगवेगळ्या समाज माध्यमांच्या सुळसुळटातून हे आता रोजचेच बनू लागले आहे. कालचे निस्तरले नाही, तर आज नवीन काही तरी सामोरे येते. समाजात आढळणाऱ्या अशा धरबंद नसलेल्या, उडाणटप्पू गटाप्रमाणे, जेथे अर्थव्यवहार चालतो त्या बाजारातही असेच मोकळे सुटलेले स्वैर, उनाड प्रवाह आढळून येतात. ‘समजुतीच्या गोष्टीं’पासून फटकून असलेली मंडळीच अशा बाजार धारेत ओढले जातात. मुख्य धारेपासून फारकत घेणाऱ्या प्रवाहात वाहते राहण्याचा, अंगभूत गंडण्याचा धर्म ही मंडळी निभावत राहतात. त्यामुळे मीरा-भाईंदर, कल्याणमधील ‘टोरस’ फसवणूक असो अथवा डोंबिवलीत सभ्य-प्रतिष्ठितांच्या वस्तीत ठगबाज बँक राजरोस उभी राहणे असो, हे फारसे धक्कादायक भासत नाही. पण आपला ‘प्रतिशब्द’चा विषय जाणतेपणाला वळसा घालणारी प्रवाहपतित मंडळी हा नसून, मुख्य धारेला पर्यायी बनलेला उनाड बाजार (ग्रे मार्केट) आणि त्याचे कपटलेख हा आहे.

शासनमान्य कायदे-कानू अथवा दर किंवा नियंत्रकांनी घालून दिलेल्या नियमांना बगल देत, त्यावरच बेतलेली समांतर बाजारात चालू असलेली अनिर्बंध देवघेव हे उनाड बाजाराचे प्रमुख लक्षण आहे. उनाड बाजाराचे अनेक प्रकार आहेत, पण ते सर्व अनधिकृत तसेच नियमबाह्य, कायदेबाह्यच आहेत. जेव्हा वेगवेगळे राष्ट्र असो, प्रदेश असो अथवा बाजार असो तेथील लोकप्रिय उत्पादनाच्या किंमतीत लक्षणीय तफावत असते तेव्हा त्या उत्पादनांसाठी उनाड बाजार भरभराटीला येतो. अनेक ठिकाणी ग्राहक उपकरणे आणि इलेक्ट्रॉनिक्ससाठी मोठ्या प्रमाणात असे बाजार आहेत. आता तर हे बाजार सुप्तही राहिलेली नाहीत, तर अगदी सहजपणे ऑनलाइन खरेदी केली जाऊन आणि कोणत्याही ठिकाणी वस्तू पाठवल्या जाऊ शकतात. या बाजारातील लोकप्रिय उत्पादनांमध्ये लक्झरी कार, उच्च दर्जाचे कपडे, हँडबॅग्ज आणि पादत्राणे, उंची सिगारेट, सौंदर्यप्रसाधने आणि अगदी औषधी उत्पादनांचाही समावेश आहे. अशा उनाड बाजाराचे वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी विक्री जरी अनधिकृत मार्गाने सुरू असली तरी बाजारातील वस्तू मात्र कमअस्सल नसतात. तस्करी या आणखी एका खल जगतातील गुन्ह्याची त्याला जोड असते आणि विक्रेते अशा वस्तू मोठ्या प्रमाणात आयात करू शकतात आणि रीतसर असलेल्या स्थानिक बाजारातील किमतीपेक्षा खूपच कमी किमतीत तरी चांगला नफा जोडून त्या विकू शकतात.

वर म्हटल्याप्रमाणे या करड्या छटेच्या बाजाराकडे ग्राहक ओढले जाण्याचे मूळ हे किमतीतील तफावत आणि वाजवीपेक्षा अधिकचे मिळविण्याचा लोभ हे आहे. बऱ्यापैकी नियंत्रित असलेल्या वित्तीय आणि भांडवली बाजाराला समांतर अशा ग्रे मार्केट/ उनाड बाजाराचे नमुने तर खूपच रंजक आहेत. ‘डब्बा ट्रेडिंग’ हे त्याचे एक उदाहरण. अनेकांवर कारवाई होऊनही कायद्याचा कसलाच धाक नसल्यागत महानगरांबाहेर छोटी शहरे, खेड्यांत हे बेफाम सुरूच असते. भांडवली बाजारात व्यवहार होणाऱ्या शेअर, वस्तू, वायद्यांवर येथे रीतसर बाजारातील चालू किमतींचा आधार घेत धडाक्यात खरेदी-विक्रीचे व्यापार सुरू असतात. काही ठिकाणी एखाद्या कंपनीच्या शेअरची बाजारात नोंदणी होऊन, अधिकृत ट्रेडिंग सुरू होण्यापूर्वी या नवीन शेअरची खरेदी आणि विक्री ग्रे मार्केटमध्ये सुरू होते. अगदी नजीकच्या काळात बाजारात दाखल होणाऱ्या शेअरचा व्यापार होऊन, त्याचे अधिमूल्य (प्रीमियम) वाढले की कमी झाले, याची दखल आता मुख्य प्रवाहातील माध्यमेही घेऊ लागली आहेत. हे ‘ग्रे मार्केट प्रीमियम’ (जीएमपी) पाहून एखाद्या ‘आयपीओ’मध्ये पैसा गुंतवायचा की नाही, असा गुंतवणूकदार निर्णय घेऊ लागले आहेत. यातून हे ग्रे मार्केट तसे अनधिकृतच परंतु ते बेकायदेशीर नाही, अशी विचित्र स्थिती निर्माण झाली आहे. ही विचित्रता अथवा नियमन ढिसाळता तशी नवीनही नाही. आज बिटकॉइनसारखा आभासी अथवा कूट चलनातील (क्रिप्टो करन्सी) व्यवहारांना नियंत्रित बाजारापेक्षा किती अधिक गुंतवणूकदार आणि लोकप्रियता मिळणे, अथवा बँकांमध्ये ठेवींबाबत खडखडाट असतानाही, ‘पॉन्झी योजनां’कडून अब्जावधी रुपये गोळा केले जाणे, हे धोरणशून्यता आणि नियमनांतील अस्पष्टतेतून सुरू आहे. त्यामुळेच सहकाराशी काडीचाही संबंध नसतानाही, सहकारी बँक अशा नामाभिधानासह डोंबिवलीत ठगव्या बँकेचा थाट बिनबोभाट सजतो.

तोंड चुकवून पळून जातात अशा ठकवणाऱ्या लोकांना तुकोबांनी ‘काळतोंडा जाय चुकवूनी!’ अभंगात फटकावले आहे. अर्थात काळे म्हणजे धूर्त, कपटी, तर पांढरे म्हणजे स्वच्छ ही आपल्याकडे रूजलेली सांस्कृतिक समज आहे. पांढऱ्यावर काळे करण्यालाही आपल्याकडे समाजमान्यता आहे. ‘प्रतिशब्द’मधून या काळ्या-पांढऱ्या रंगाचे, त्याच्या करड्या छटांचे व्यापारविश्वात असलेले संज्ञात्मक महत्त्व आपण या आठवड्यात पाहू या.

arthbodhi2025@gmail.com


आठवड्याचे प्रतिशब्द (१७ फेब्रुवारी ते २१ फेब्रुवारी)

० Black economy – काळ्या पैशाची अर्थव्यवस्था

बेकायदेशीर व्यवसाय उलाढालातून बेहिशेबी मालमत्ता कमावयाची, शिवाय अशा मालमत्तेला कराची कात्री बसण्यापासून वाचवायचे हा काळा बाजार झाला आणि कोणत्याही अर्थव्यवस्थेत अशा काळ्या पैशाचा काही ना काही वाटा असतोच. सनदशीर मार्गाने कमावलेला पैसा नाना मार्गाने दडवून करचोरी केली जाते, हे देखील काळ्या पैशाच्या अर्थव्यवस्थेलाच योगदानच. राष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अपायकारक ही व्यवस्था गरीब-श्रीमंत यांच्यातील दरीला देखील खतपाणी घालून, समन्यायी विकासाला मारक ठरते. काळ्या पैशाची अर्थव्यवस्था ही प्रसंगी भ्रष्ट आणि अधिकाधिक जुलमी देखील बनते. तथापि हे काळेपण नेहमीच नकारार्थी नसते. वैयक्तिक कंपनीच्या आर्थिक आरोग्याबाबत company is in the black असे जेव्हा म्हटले जाते, तेव्हा तिच्यावर जास्त कर्जाचा भार पडत नसून, तिचे उत्पन्न सकारात्मक बनले व ती आर्थिकदृष्ट्या सक्षम बनली, असेच सुचविले जात असते.

० White-collar worker – पांढरपेशा नोकरदार

व्यवसाय जगात, White-collar worker – पांढरपेशा नोकरदार म्हणजे प्रामुख्याने शारीरिक श्रमाऐवजी बौद्धिक कामाचा समावेश असलेली कार्यालयीन पदांचा समावेश असतो. कार्यालयाच्या रचनेत काम करणारा कर्मचारी, सामान्यतः अकाउंटिंग, मार्केटिंग किंवा कायदेशीर कामे यासारखी प्रशासकीय किंवा व्यावसायिक कामे करत असतो. पांढरपेशी नोकऱ्या सामान्यतः उच्च पगाराच्या, उच्च-कौशल्य श्रेणीतील व्यवस्थापकीय भूमिका पार पडणाऱ्या नोकऱ्या असतात. येथील नोकरदारांना पात्रता म्हणून अल्प-कुशल किंवा शारीरिक कामे करणाऱ्या कामगारांपेक्षा जास्त शिक्षण आणि प्रशिक्षण आवश्यक असते. केवळ नोकरदारच नव्हे तर उदाहरणादाखल डॉक्टर किंवा वकील यांसारख्या व्यवसाय देखील पांढरपेशा श्रेणीत येतात. अल्प-कुशल किंवा शारीरिक कामे करणाऱ्या कामगारांची ‘ब्लू-कॉलर’ अशी स्वतंत्र श्रेणीही आहे.

० White label product – पाटी कोरी उत्पादने

एक सर्वमान्य व्यवसाय पद्धत, जेथे एक कंपनी दुसऱ्या कंपनीचे उत्पादन हे तिचे स्वतःचेच म्हणून बाजारात ग्राहकांपुढे आणते त्याला व्हाईट लेबलिंग असे म्हटले जाते. “व्हाईट लेबल” ही शब्दयोजना उत्पादनाच्या खूणचिठ्ठीचा जागा त्या वस्तूच्या उत्पादकाने रिकामी ठेवणे या कल्पनेतून आली आहे, जो ती वस्तू बाजारात आणतो, तो म्हणजे मार्केटरच्या तिचे इच्छित नामकरण ती जागा भरत असतो. म्हणूनच White label product याला मराठीत पाटी कोरी उत्पादने हा प्रतिशब्द चपखल वाटतो. आपल्याकडील बडी किराणा विक्रेते, सुपरमार्केट आणि साखळी दालने अगदी अॅमेझॉन, फ्लिफकार्टसारख्या ऑनलाइन पेठांमधून सौंदर्यप्रसाधने, इलेक्ट्रॉनिक्स, घरगुती वस्तू, खाद्यवस्तू आणि पेये जी त्यांचे स्वतःचे ब्रॅण्ड म्हणून विकतात, ती सर्व पाटी कोरी उत्पादनांचे नमुने आहेत, म्हणजे त्यांचे निर्माते कोणी त्रयस्थच असतात. ‘व्हाइट लेबल एटीएम’ हा आणखी एक सुपरिचित प्रकार सर्वांनी अनुभवला असेल. एटीएम हे बँकांनीच स्वतःचेच सुरू करावेत याची गरज नाही, बँक नसलेल्या कुणा त्रयस्थ संस्थेकडून एटीएम स्थापित करून व ते चालवून, त्यायोगे सर्व बँकांच्या ग्राहकांना सुरक्षितपणे त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची मुभा ‘व्हाइट लेबल एटीएम’ देतात आणि बँकांकडून त्यांना या सेवेसाठी निर्धारीत दरात मोबदलाही मिळतो.

० White shoe firm – लब्ध-प्रतिष्ठित संस्था

वित्तीय सेवा, बँकिंग, कायदा व तत्सम सल्ला या सारख्या व्यावसायिक क्षेत्रात प्रतिष्ठित, सुस्थापित कंपनीचे वर्णन करण्यासाठी वापरला जाणारा हा शब्द आहे. ही शब्दयोजना बहुतेकदा त्या कंपनी, संस्थेचा कौतुकपात्र वारसा आणि कर्मठ, नैतिक प्रतिमेशी संबंधाने देखील केली जाते.

० White spot analysis – शून्य अस्तित्व विश्लेषण

मांडलेल्या व्यवसाय पटावरून वाढ आणि विस्ताराच्या संधींचा जागांचा शोध घेणे, याचे हे तंत्र म्हणून प्रचलित आहे. White spot analysis – शून्य अस्तित्व विश्लेषण हे नावाप्रमाणे ज्या ठिकाणी कंपनीचे व्यावसायिक अस्तित्व काहीही नाही तेथील, स्पर्धात्मक वातावरण, बाजारपेठ आणि हातपाय पसरता येण्याच्या संधींचा सांगोपांग वेध असतो.

Story img Loader