वरून झकपक आत भगभग, हे एक प्रकारचे माजविले गेलेले ढोंगच. वरकरणी गोजिरवाण्या दिसणाऱ्याच्या पोटात काळेबेरे अशातलाच हा प्रकार. उद्योग-व्यापार जगतात अशी नवनवी सोंगे कायमच येत असतात. त्यातलेच ‘हरित’ हे एक नवीन चलनी सोंग. विकले-खपले जाते ते ते आपुले, या न्यायाने ते चालतेदेखील. पण ऊठसूट साऱ्यांनाच हिरवेपणाचे उमाळे येऊ लागले. यातून या नटहिरव्या मंडळींना वेसण आवश्यक ठरू लागले. त्यातूनच Greenwashing – ग्रीनवॉशिंग ही शब्दयोजना आली. अर्थात हे एक पाखंड असल्याचे मान्य करूनच, त्याला पायबंद घालणारी नियमावलीही बरोबरीने आली. या ग्रीनवॉशिंगला ‘फसवे हरित-लेपन’ असा प्रतिशब्द आपण योजला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुळात हरित अर्थात हिरवेपण आपण पुरते स्वीकारले आहे काय? प्रश्न नेमका आहे तो हाच. ते आधी जाणून घेऊ, मग त्यातील फसव्या प्रवृत्तींच्या बंदोबस्ताकडे वळू.

रंग आणि नागर संस्कृतीचे जवळचे नाते राहिले आहे. भारतात तर प्रत्येक रंगाचे खोल अर्थ आजवरच्या साहित्यातून उलगडत आले आहेत. रंगाशी निगडित भाव-भावना आणि प्रतीके आपल्या सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय परंपरेतही रुजलेली आहेत. हिरवा हा निसर्गाचा रंग ही तर वैश्विक धारणा आहे. हिरवा रंग निसर्गाशी जुळलेला, म्हणून जगभरच्या पर्यावरण चळवळीचा रंग आणि प्रतिमा-रूपदेखील हिरवेच. या चळवळीचे काम हे पर्यावरणाला होत असलेल्या नुकसानीला रोखावे अथवा ते कमीत कमी कसे राखावे असे आहे. त्या अंगाने सुरू झालेल्या रोध-प्रतिरोधांना पुढे अभ्यास, संशोधन आणि त्या उप्पर कायदे-कानूंचीही जोड मिळत गेली. कशाने पर्यावरणाची हानी होते आणि कशाने ती कमीत कमी राखता येईल याचे धरबंद निश्चित झाले. पर्यावरण मंत्रालये आली, हरित कायदे, हरित लवादही देशोदेशी सुरू झाले. हाच साचा किंवा याच शिक्क्याला धरून, जगात जे सुरू आहे ते आपल्याकडे अनुसरायला सुरुवात झाली. परंतु ‘याची प्रतिमा त्यास येणार नाही’ या उक्तीप्रमाणे त्या त्या ठिकाणची पारिस्थितिक, भौगोलिक अवस्थेनुसार उणे-अधिक काही करावे, ते आवश्यकच ठरेल, याचे भान मात्र विसरले गेले.

हे हिरवे भान नेमके काय, हा म्हणूनच आपल्याकडे कायम वादंगाचा विषय राहिला आहे. त्यामुळे हरित नावाने सारी बजबजपुरी आहे. ढोंगांचे पेवही फुटले आहे. अशा स्वतःकथित ‘हरित’ अथवा पर्यावरणस्नेही उत्पादनांचा मुखवटा उतरविण्याचे काम ‘ग्रीनवॉशिंग’ प्रतिबंध करते. ही संकल्पना एका उदाहरणांतून अधिक चांगली समजावून घेता येईल.

जर्मन वाहननिर्मात्या फोक्सवॅगनने २००९ मध्ये, त्यांच्या नवीन ऑडीचे मॉडेल बाजारात आणले. ही नवी मोटार म्हणे ‘स्वच्छ डिझेल कार’! मग तिचा प्रचार करण्यासाठी एक व्यापक विपणन मोहीम सुरू झाली. जाहिरातबाजीचा नुसता गजर सर्वत्र सुरू झाला. जाहिरातील बढाई अशी की, नवीन ऑडीच्या कार्बन उत्सर्जनात मोठी घट झाली आहे. परंतु काही वर्षांनंतर, अमेरिकेची पर्यावरण रक्षण संस्था – ईपीएला आढळले ते भलतेच. फोक्सवॅगनने त्यांच्या तोवर विकल्या गेलेल्या १.१० कोटी वाहनांसाठी उत्सर्जन चाचण्याच बनावट असतील, अशी फसवणूक करण्याची मुभा देणारे सॉफ्टवेअर त्यात स्थापित केल्याचे उघडकीस आले. तथाकथित स्वच्छ डिझेल कारने प्रत्यक्षात कायदेशीर मर्यादेपेक्षा ४० पट जास्त नायट्रोजन ऑक्साईडचे उत्सर्जन केल्याचेही सिद्ध झाले. हा ‘डिझेलगेट’ घोटाळा म्हणजे फसव्या पर्यावरणीय पणन मोहिमेच्या अर्थात ग्रीनवॉशिंगच्या आजपर्यंतच्या सर्वात कुप्रसिद्ध उदाहरणांपैकी एक म्हणून ओळखला जातो. फोक्सवॅगनला यातून ४० अब्ज अमेरिकी डॉलरचे नुकसान सोसावे लागले ते वेगळेच.

भारतातही या संबंधाने काहीशा विलंबाने का होईना पण व्यवस्था आकाराला येत आहे. केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने ग्रीनवॉशिंग आणि दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना प्रतिबंधांसाठी कठोर पावलांचे संकेत सरलेल्या ऑक्टोबरमध्ये दिले. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (सीसीपीए) या संबंधाने विस्तृत सल्लामसलत व सांगोपांग विचाराने काही मार्गदर्शक तत्त्वांची आखणी केली आहे. ही मार्गदर्शक तत्त्वे फसव्या जाहिरातींचा आधार घेणाऱ्या उत्पादकांचा मुखवटा उतरवण्यासह, ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि शाश्वत व्यवसाय पद्धतींना प्रोत्साहन मिळेल अशा पर्यावरणीय दावे सत्य आणि अर्थपूर्ण असणाऱ्या उत्पादकांना चालना देणे, अशा दोन्ही अंगांनी प्रयत्न सुरू ठेवणार आहे. मुळात हा विषय असा आहे जो, अंतःप्रेरणा आणि मानसिकतेशी निगडित आहे, तो नियम-कानूंचा वचक बसून ताळ्यावर खरेच येऊ शकेल? त्यामुळे शीर्षकात म्हटल्याप्रमाणे जो जो हिरवा तो बरवा (चांगला) मानला जाऊ नये.

आठवड्याचे प्रतिशब्द (२४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी)

Green Economy – हरित अर्थव्यवस्था

Blue Economy – नील अर्थव्यवस्था

Greenfield project – मुळापासून पूर्ण नव्याने उभारलेला प्रकल्प

Brownfield project – पुनर्विकसित / पुनःविस्तारित प्रकल्प

Bluechip – सक्षम, सुप्रसिद्ध, स्थापित कंपन्या/शेअर