कौस्तुभ जोशी
म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्यांना नेमक्या किती वर्षासाठी गुंतवणूक केली तर आपल्याला फायदा होऊ शकतो, असा प्रश्न नेहमी पडत असतो. एखाद्या फंड योजनेत आपण गुंतवणूक केली तर किती वर्षानंतर ती गुंतवणूक घसघशीत लाभ देऊ शकते, याचं ठोस उत्तर कुठलाही गुंतवणूक सल्लागार देऊ शकत नाही. असं असलं तरीही एक मात्र निश्चित आहे जर तुम्ही दहा वर्षापेक्षा जास्त काळ सतत इक्विटी फंड योजनेत गुंतवणूक करत राहिलात तर तुम्हाला उत्तम लाभ मिळू शकतात.
आज जाणून घेणार आहोत, अशाच एका गुंतवणूकदारांना मालामाल करणाऱ्या फंड योजनेबद्दल; एचडीएफसी म्युच्युअल फंड हे भारतातील आघाडीचे फंड घराणे आहे. त्यांची जून २००७ या महिन्यात लॉन्च झालेली योजना ‘एचडीएफसी मिड कॅप अपॉर्च्युनिटी फंड’ यावर्षी सोळा वर्षे पूर्ण करते आहे. ही फंड योजना जेव्हा बाजारात आली त्यावेळी सब प्राईम क्रायसिस वगैरे काही येईल असं वाटलंच नव्हतं.
हेही वाचा… Money Mantra: इन्कम टॅक्स रिटर्नसाठी निकष काय असतात? (उत्तरार्ध)
२००३ सालापासून भारतीय शेअर बाजार वरच्या दिशेला जात होते आणि ही योजना आल्यानंतर वर्षभरातच बाजाराला जबरदस्त धक्का बसला. तेव्हा अनेक गुंतवणूकदारांनी या योजनेमध्ये राहणे पसंत केले. म्हणजेच आपले गुंतवलेले पैसे काढून घेतले नाहीत आणि आज त्या गुंतवणूकदारांना घसघशीत फायदा मिळतो आहे. ही योजना सुरू झाली त्यावेळी एखाद्या गुंतवणूकदाराने दहा हजार रुपये गुंतवले असते तर त्याची आजची मालमत्ता (३० जून २०२३ च्या एन ए व्ही नुसार) एक लाख एकोणीस हजार इतकी झाली असती. एचडीएफसी मिडकॅप अपॉर्च्युनिटी फंड बाजारातील मध्यम आकाराच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो.
मिड कॅप या शब्दाचा अर्थ ज्यांचं भांडवल आणि कंपन्यांचा आकार मध्यम आहे. सेबीने ठरवून दिलेल्या मानकानुसार बाजारातील कंपन्यांना त्यांच्या आकारानुसार म्हणजेच मार्केट कॅपिटलायझेशननुसार एक कॅटेगरी दिली जाते. त्यातील १०१ ते २५० या कंपन्या मिडकॅप म्हणजे मध्यम आकाराच्या कंपन्या असतात आणि या कंपन्यांमध्येच मिडकॅप म्युच्युअल फंड योजना गुंतवणूक करू शकतात. एचडीएफसी मिडकॅप अपॉर्च्युनिटी फंड याच दीडशे कंपन्यांमधून भविष्यकाळ उत्तम असणाऱ्या आणि चांगला परफॉर्मन्स देऊ शकणाऱ्या कंपन्या निवडतो आणि त्याचा समावेश आपल्या पोर्टफोलिओत करतो.
फंडाचा पोर्टफोलिओ
उपलब्ध असलेल्या ताज्या आकडेवारीनुसार या फंडाने आपल्याकडे जमा झालेल्या निधीच्या ५६.६१% गुंतवणूक मिडकॅप शेअर्समध्ये, १८.४९% गुंतवणूक स्मॉल कॅप म्हणजेच लहान आकाराच्या कंपन्यांमध्ये, ३% गुंतवणूक मोठ्या आकाराच्या कंपन्यांमध्ये केली आहे. पोर्टफोलिओ मध्ये एकूण ६३ शेअर्सचा समावेश केला गेला आहे. यातील टॉप पाच शेअर्सचा एकूण वाटा जवळपास २०% आहे. जर सेक्टरचा विचार करायचा झाल्यास टॉप तीन सेक्टर मध्ये केलेली गुंतवणूक २०% आहे. या फंडाच्या गुंतवणुकीचा सेक्टरच्या दृष्टिकोनातून आढावा घेवूया.
हेही वाचा… Money Mantra: इन्श्युरन्स कव्हर वाढत जाणारी पॉलिसी कोणी व का घ्यावी?
नॉन बँकिंग फायनान्शिअल कंपनीज म्हणजेच एन बी एफ सी आणि डिफेन्स या दोन सेक्टर मध्ये ७ % इतकी गुंतवणूक या फंडाने केली आहे. टायर आणि रबर प्रॉडक्ट मध्ये ६.२५ % , हॉटेल आणि रिसॉर्ट्स या क्षेत्रात जवळपास ५.५ % तर सॉफ्टवेअर, ऑटो, खाजगी बँक, फार्मा या क्षेत्रात ४ % च्या आसपास गुंतवणूक आहे. गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून विचार करायचा झाल्यास हा पोर्टफोलिओ संतुलित आणि दीर्घकालीन रिटर्न देणारा आहे.
प्रवास १६ वर्षांचा
२००७ या वर्षापासून २०२३ पर्यंत आढावा घेतल्यास फंडाची कामगिरी त्याच्या बेंचमार्क म्हणजेच निफ्टी मिडकॅप १५० TRI च्या तुलनेत सरस राहिली आहे. फंड चांगला का वाईट कसा ओळखाल ? जो फंड चढत्या बाजारामध्ये दणदणीत रिटर्न्स देतो तो नेहमीच चांगला वाटतो पण जेव्हा मार्केट खाली जात असतं, घसरण होत असते त्यावेळेला जो फंड कमी घसरण दाखवतो तोच चांगला फंड असतो. पुढे दिलेल्या तक्त्यावरून आपल्याला याचा अंदाज येईल एचडीएफसी मिडकॅप अपॉर्च्युनिटी फंड आणि निफ्टी मिडकॅप १५० TRI यांच्या तुलनेतून हे स्पष्ट दिसते आहे. जेव्हा कुठली मोठी पडझड घडून आली त्यावेळी बेंच मार्क जेवढा पडला त्याच्या तुलनेत फंड कमी पडला आहे. म्हणजेच फंडाचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने सुरू आहे.
हे टेबल स्वतंत्रपणे दिले आहे
हा फंड जेव्हा लॉन्च झाला त्यावेळी मोजकीच मालमत्ता असलेल्या या फंडाकडे आज ३९,२९५ कोटी एवढी गंगाजळी उपलब्ध आहे. एसआयपीच्या माध्यमातून या फंडात गुंतवणूक केलेल्यांना दीर्घकाळात चांगलाच लाभ झाला आहे. दहा वर्षांपूर्वी या फंडात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केली असती तर आज १७.५२% दराने रिटर्न्स मिळाले असते. पंधरा वर्षाच्या एसआयपीसाठी हेच रिटर्न्स १७.२३% तर तीन वर्षाच्या एसआयपीसाठी घसघशीत २४.१५% परतावा या फंड योजनेने दिला आहे.
**या लेखात उल्लेख केलेल्या फंड योजनेमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व जोखीम विषयक दस्तऐवजांचा अभ्यास करावा आणि आपल्या गुंतवणूक सल्लागाराच्या सल्ल्यानुसारच गुंतवणूक करावी.