देवदत्त धनोकर
आर्थिक नियोजनाच्या मदतीने प्रगती करायची असेल तर आर्थिक नियोजनात संरक्षक योजना, बचत आणि गुंतवणूक याचा समावेश केला पाहिजे. मागील लेखात आपण संरक्षक योजनेतील आपत्कालीन निधीची माहिती घेतली. या लेखात आपण पुढची पायरी अर्थात आरोग्य विमा याबाबत माहिती घेऊ या.
आरोग्य विमा- आरोग्य विमा प्रत्येकासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आजारपणामुळे /अपघातामुळे आपल्याला खूप मोठा खर्च येऊ शकतो. आरोग्य विमा असेल तर हा खर्च विम्याचा रकमेइतका कमी होऊ शकतो. यासाठी आपल्याला आरोग्य विमा घेणे आणि दरवर्षी त्याचे नूतनीकरण करणे आवश्यक असते. उदाहरणाच्या मदतीने आपण याबाबत अधिक माहिती घेऊ या – समीर आणि त्याचा मित्र रवी दोघांनी ५ लाखांचा आरोग्य विमा घेतला. एका आजारपणात समीरला वैद्यकीय उपचारांसाठी ३ लाख ६३ हजारांचा खर्च आला. समीरच्या सल्लागाराने वेळेत कागदपत्र पूर्ण करून विमा कंपनीस सादर केल्यामुळे समीरला विमा कंपनीकडून आजारपणाचा संपूर्ण खर्च मिळाला. त्याच वर्षी रवीचा अपघात झाला आणि त्याच्या उपचारांचा खर्च ५ लाख ७२ हजारांचा झाला. कागदपत्रांची पूर्तता केल्यावर रवीला विमा कंपनीकडून ५ लाख रुपये मिळाले. म्हणजेच रवीला स्वतःचे केवळ ७२ हजार रुपये द्यावे लागले. येथे विमा स्वरक्षण असल्यामुळे समीर आणि रवी या दोघांनाही आजारपण आणि आर्थिक संकट असा दुहेरी सामना करावा लागला नाही. आरोग्य विमा असल्यामुळे त्यांना फार मोठी आर्थिक झळ पोहचली नाही.
आरोग्य विम्याबाबतचे काही महत्त्वाचे मुद्दे –
१) घरातील सर्व सदस्यांसाठी आपल्या जीवनशैलीनुसार योग्य रकमेचे आरोग्य स्वरक्षण घ्यावे: सध्या वैद्यकीय उपचारांचा खर्च खूप वाढला आहे. जर कमी रकमेचा आरोग्य विमा असेल आणि उपचारांचा खर्च खूप जास्त असेल तर खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक जबाबदारी येते आणि त्याचा परिणाम अन्य आर्थिक उद्दिष्टांवर होतो याकरिता आपल्या जीवनशैलीनुसार योग्य रकमेचा आरोग्य विमा घ्यावा.
२) फ्लोटर पॉलिसी: या पॉलिसीच्या मदतीने तुम्ही कमी प्रीमियममध्ये घरातील सदस्यांसाठी जास्त रकमेचे आरोग्य विमा संरक्षण घेऊ शकता. उदाहरणार्थ, ३८ वर्षीय रमेशने स्वतःसाठी आणि त्याची पत्नी नेहा, मुलगी सायली यांचा वैयक्तिक प्रत्येकी १५ लाखांचा आरोग्य विमा घेतल्यास खर्च खूप जास्त येईल. जर त्यांनी १५ लाखांची फ्लोटर पॉलिसी घेतली तर एकत्रितपणे त्यांना १५ लाखांचे आरोग्य विमा संरक्षण मिळेल आणि प्रीमियम देखील कमी द्यावा लागेल. उदाहरणार्थ, रमेश त्याची पत्नी आणि मुलगी यांच्यासाठी प्रत्येकी १५ लाखाचे आरोग्य विमा संरक्षण घेतल्यास एकूण ३६,२५१ रुपये प्रीमियम द्यावा लागेल जर त्यांनी फ्लोटर पॉलिसीच्या मदतीने १५ लाखांचे एकत्रित आरोग्य विमा कवच मिळविले तर त्यांना २०,८३७ रुपये प्रीमियम द्यावा लागेल.
१५ लाखांच्या वैयक्तिक पॉलिसीसाठी प्रीमियम १५ लाखांच्या फ्लोटर पॉलिसीसाठी प्रीमियम
रमेश (वय ३८) १६,३३७ –
नेहा (वय ३४) १४,५३२ –
सायली (वय १२ ) ५,३८२ –
एकूण प्रीमियम ३६,२५१ २०,८३७
३) रूम रेंट: – हॉस्पिटलमधील उपचारांचा खर्च हा निवडलेल्या खोलीवर अवलंबून असतो. जर जास्त सुविधा असलेली खोली निवडली तर जास्त खर्च येतो. आपल्या उपचारांचा खर्च किती असेल याची माहिती घेऊन योग्य खोली निवडावी.
४) करबचतीचा लाभ : आरोग्य विम्याचा प्रीमियमकरिता विमाधारकांना प्राप्तिकर कायद्याच्या ‘कलम ८० डी’अंतर्गत करबचतीचा लाभ मिळतो.
५) आधीच्या आजारांना संरक्षण : जर विमाधारकाला काही आजार असतील तर त्या आजारासाठी तीन वर्षांनंतर आरोग्य विमा संरक्षण देण्यात येते. विमा पॉलिसी घेण्यापूर्वी याबाबत विमा सल्लागाराकडून योग्य माहिती घ्यावी.
६) वैयक्तिक आरोग्य विमा स्वरक्षण महत्त्वाचे: कंपनीकडून मिळणारे आरोग्य विमा संरक्षण केवळ कंपनीत असताना उपलब्ध असते. नोकरी बदल्यावर त्याचा लाभ मिळत नाही याकरिता कंपनीकडून आरोग्य विमा संरक्षण असले तरीही वैयक्तिक आरोग्य विमा स्वरक्षण घ्यावे.
७) पॉलीसीचे नूतनीकरण वेळेवर करावे अन्यथा मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.
८) तज्ज्ञाचा सल्ला महत्त्वाचा : अनुभवी विमा सल्लागाराकडून आरोग्य विमा घ्यावा. योग्य पॉलिसी निवडणे, वेळोवेळी नूतनीकरण करणे. आवश्यकतेनुसार विमा संरक्षणात वाढ करणे, आजारपणात वेळेत कागदपत्रांची पूर्तता करणे अशा विविध सेवा विमा सल्लागारकडून मिळतात त्यांचा लाभ घ्यावा.
९) ‘टॉप अप’ पॉलिसी: ‘टॉप अप’ पॉलीसीच्या मदतीने किमान प्रीमियममध्ये जास्त आरोग्य विमा संरक्षण मिळविता येते. उदाहरणार्थ, ३८ वर्षीय रमेशकरिता ५ लाखांच्या आरोग्य विम्यासाठी प्रीमियम ७,१२० रुपये असेल आणि १५ लाखाच्या ‘टॉप अप’ पॉलिसीकरीता प्रीमियम ४,१३० रुपये असेल.
१०) प्रशिक्षण: आरोग्य विम्याबद्दल आपण स्वतः साक्षर होणे आवश्यक आहे. आपण साक्षर झाल्यावर आपल्या घरी काम करणाऱ्या व्यक्ती, आपल्या परिचयातील व्यक्ती यांना आरोग्य विम्याची माहिती देऊन आपण त्यांना मदत करू शकतो. महत्त्वाचे: आर्थिक नियोजनामध्ये आरोग्य विमा अत्यंत महत्त्वाचा आहे, तज्ज्ञांच्या मदतीने आरोग्य विम्याचा समावेश आपल्या आर्थिक नियोजनात नक्की करावा.