धीरज सहगल
दोन व्यक्ती आणि कुटुंबांना एकत्र आणणारं लग्नाचं नातं सर्वांगसुंदर समजलं जातं. मात्र, काही वेळेस लग्नाचं नातं काळाच्या कसोटीवर खरं उतरत नाही. भारतातील घटस्फोटाचा दर अंदाजे १.१ टक्के असून तो जगात सर्वात कमी आहे. ही आकडेवारी कमी असली, तरी देशात घटस्फोटाचे प्रमाण हळूहळू वाढताना दिसत आहे. शहरी भागांत हे प्रमाण जास्त आहे. २०१९ मध्ये तयार करण्यात आलेल्या युएन महिला अहवालानुसार गेल्या दोन दशकांत भारतातील घटस्फोटांची संख्या दुप्पट झाली आहे.
हे लक्षात घेता घटस्फोटाचा टर्म विम्यावर काय परिणाम होतो यावर चर्चा करण्याची वेळ आली आहे असे म्हणायला हरकत नाही, कारण टर्म विमा हा भारतातील लोकप्रिय विमाप्रकारांपैकी एक आहे.
घटस्फोटाचा टर्म आरोग्य विम्यावर होणारा परिणाम
घटस्फोट भावनिक आणि आर्थिक पातळीवर आव्हानात्मक असतो. सुदैवाने टर्म विमा योजनेच्या बाबतीत त्यात सहभागी असलेल्या घटकांपुढे कोणतेही आव्हान नसते. किंबहुना जोडीदार वारस असलेल्या टर्म विमा योजनेवर घटस्फोटाचा फारसा परिणाम होत नाही.
विमा पुरवठादारांतर्फे टर्म योजनेच्या कालावधीत कधीही वारस बदलण्याची मुभा विमाधारकांना दिली जाते. घटस्फोटानंतर विमाधारकाला केवळ एक नॉमिनेशन अर्ज दाखल करून त्यांच्या जोडीदाराऐवजी मुले किंवा पालकांना टर्म विम्याचा वारस नेमता येते.
मात्र, विवाहित स्त्री मालमत्ता कायदा १८७४ अंतर्गंत टर्म विमा योजना खरेदी केलेली असल्यास गुंतागुंत होण्याची शक्यता असते.
विवाहित स्त्री मालमत्ता कायदा १८७४ मुळे घटस्फोटानंतर टर्म विम्यावर कशाप्रकारे परिणाम होऊ शकतो?
मला असे वाटते, की सर्व वाचकांना विवाहित स्त्री मालमत्ता कायदा १८७४ चे टर्म विम्यावर काय परिणाम होतात हे सांगण्यापूर्वी हा कायदा काय आहे ते सांगावे.
विवाहित स्त्री मालमत्ता कायदा १८७४ किंवा एमडब्ल्यूपी कायदा विवाहित स्त्रियांना त्यांच्या पतीने निधन झाल्यास आपल्या मालमत्तेचे सासू- सासरे, नातेवाईक किंवा सावकारांच्या दाव्यापासून संरक्षण करता यावे यासाठी तयार करण्यात आला होता. विवाहित स्त्रीचे हक्क कोणत्याही परिस्थितीत अबाधित राहतील याची काळजी या कायद्याअंतर्गत घेतली जाते.
एमडब्ल्यूपी कायद्याने विवाहित पुरुषांना टर्म विमा खरेदी करून आपल्या पत्नीला वारस करण्याचे हक्क दिलेले आहेत. या कायद्याअंतर्गत टर्म योजना खरेदी केल्यास मृत्यूनंतर मिळणाऱ्या फायद्यांचा केवळ योजनेच्या वारसालाच लाभ मिळतो – या उदाहरणात पत्नीला लाभ मिळतो.
हा कायदा टर्म योजना पतीच्या उर्वरित मालमत्तेपासून स्वतंत्र स्थान देत असल्याने त्याच्या सावकारांना किंवा कुटुंबातील इतर सदस्यांना योजनेचे लाभ मिळत नाहीत. किंबहुना कायदेशीर पतीही त्याच्या पत्नीला मृत्यूनंतर मिळणारे हक्क हिरावून घेऊ शकत नाही.
जर विवाहित पुरुषाने एमडब्ल्यूपी कायद्याअंतर्गत टर्म योजना खरेदी केली आणि पत्नीला लाभार्थीचे स्थान दिले, तर घटस्फोटाचा योजनेवर कोणताही परिणाम होत नाही. लग्नाचे नाते कायदेशीर पातळीवर संपले, तरी पत्नीला लाभार्थी राहाता येते.
आणखी वाचा: Money Mantra: कोणत्या आयुर्विमा पॉलिसीवरील कर्ज मिळतं?
घटस्फोटानंतर टर्म विमा योजनेचे व्यवस्थापन
घटस्फोटानंतर टर्म विमा योजनेचे व्यवस्थापन कसे करावे हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. घटस्फोट घेतलेल्या विमाधारकांसी काही टिप्स –
नेहमीची टर्म विमा योजना असल्यास योजनेअंतर्गत वारस बदलण्याचा विचार करता येईल.
पती आणि पत्नीच्या नावावर संयुक्त टर्म जीवन विमा योजना घेतलेली असल्यास बहुतेक वेळेस मुलांना वारस नेमले जाते. घटस्फोटानंतर विमाधारकांना योजना सुरू ठेवण्यासाठी प्रीमियम भरत राहावा लागेल. यामुळे पालक विभक्त झाले, तरी मुले आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहतील.
घटस्फोट घेण्यापूर्वी योजनेमध्ये सरेंडर सुविधा आहे का तपासून घ्यावे. जर पे-आउट असेल, तर दोन्ही जोडीदारांमध्ये त्याची वाटणी करता येईल किंवा ती रक्कम मुलांच्या भविष्यासाठी गुंतवता येईल.
बऱ्याचदा घटस्फोटाच्या वेळेस विमाधारकांना संयुक्त विमा योजना असल्यास तातडीने प्रीमियम भरणे बंद करण्याचा मोह होतो, मात्र तसे करण्याचे विमा योजना बंद होते व योजनेच्या वैशिष्ट्यांचा फायदा होत नाही हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
घटस्फोटाची प्रक्रिया ताण आणणारी व आयुष्य बदलवणारी असते. अशावेळेस पूर्ण करावयाच्या कायदेशीर व कौटुंबिक गोष्टींमुळे गोंधळून जाण्याची दाट शक्यता असते. विशेषतः, घटस्फोटानंतर एकल पालकत्व निभवावे लागणार असल्यास त्याचा जास्त त्रास होतो. अशावेळेस विमाधारकांनी एक सोपी गोष्ट करावी. यामुळे त्यांना अशा आयुष्याला कलाटणी देणाऱ्या गोष्टीतून सावरण्यास मदत होऊ शकते. परिस्थितीतून सावरल्यानंतर विवेकीपणे आर्थिक बाबींचे पुनर्विश्लेषण करून नवीन आर्थिक ध्येयांची आखणी करावी.
(लेखक बजाज अलायन्झ लाईफ कंपनीत मुख्य व्यवसाय अधिकारी म्हणून कार्यरत आहेत)