रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारी महिन्यात झालेल्या विद्यमान वर्षातील पहिल्या पतधोरणात रेपोदरात २५ आधार बिंदूंनी कपात केली. पुढील पतधोरण आढावा बैठक पुढील महिन्यात ७ ते ९ एप्रिलदरम्यान होणार असून या बैठकीत किंवा जून महिन्यात होणाऱ्या बैठकीत अजून एक पाव टक्के दर कपातीची अपेक्षा आहे. उच्च-पत धारण करणाऱ्या आणि ३ ते ५ वर्षे उर्वरित मुदत असलेल्या कर्ज रोख्यांत गुंतवणूक करून भांडवली लाभ होण्याच्या उद्देशाने ५ वर्षांच्या कालावधीसाठी स्थिर उत्पन्न गटात कंपनी रोखे अर्थात कॉर्पोरेट बाँड फंड हा गुंतवणुकीसाठी आश्वासक पर्याय आहे. आदित्य बिर्ला सन लाइफ कॉर्पोरेट बाँड फंड हा कॉर्पोरेट बाँड फंड गटात तिसऱ्या क्रमांकाची मालमत्ता असलेला फंड आहे. रिझर्व्ह बँकेच्या संभाव्य दर कपाती पश्चात व्यापारी बँका एप्रिलपासून आपल्या मुदत ठेवीच्या व्याजदरात कपात करतील. जे गुंतवणूकदार ५ ते ७ वर्षे मुदतीसाठी पैसे गुंतवू इच्छितात अशा गुंतवणूकदारांनी कॉर्पोरेट बाँड फंडांचा आवर्जून विचार करावा.

आदित्य बिर्ला सन लाइफ कॉर्पोरेट बाँड फंड का? अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने (फेड) मागील कॅलेंडर वर्ष २०२४ मध्ये दोन वेळा व्याजदर कपात केली. अनेक देशांच्या मध्यवर्ती बँका एकतर व्याजदर कपातीच्या प्रतीक्षेत आहेत, किंवा त्यांनी याआधी अमेरिकेच्या व्याजदर कपातीनंतर रिझर्व्ह बँकेसारखी व्याजदर कपातीस सुरुवात केली आहे. वर्ष २०२३ मध्ये जगभरात व्याजदर शिखरावर पोहोचल्यानंतर चलनवाढीचा वेग, आर्थिक वाढ मंदावणे या कारणांनी जगभरात व्याजदर कपातीस सुरुवात झाली आहे. नवीन आर्थिक वर्षात भारतात अर्ध्या टक्क्याची व्याजदर कपात अपेक्षित आहे. रोख्यांच्या किमती आणि व्याजदर यांच्यात व्यस्त सबंध असल्याने व्याजदर कपातीनंतर मागील दोन वर्षांत कर्जदारांनी उच्च व्याजदराच्या विकलेल्या रोख्यांच्या किमतीवर जातील. गुंतवणुकीत उच्च पत असलेले रोख्र असलेल्या या कॉर्पोरेट बाँड फंडाला याचा फायदा होईल. या फंडाच्या गुंतवणुकीत केंद्र सरकारचे रोखे आणि ‘एएए’ (ट्रिपल-ए) पत असलेले रोखे आहेत. समान मुदतीच्या सरकारी रोखे आणि ‘ट्रिपल-ए’ रोख्यांच्या परताव्यातील फरक ३०-४० आधार बिंदूवरून ८० ते १०० आधार बिंदूंवर गेला आहे. वर्ष अखेर असल्याने केंद्राच्या रोख्यांचा मर्यादित पुरवठा आणि कंपन्यांच्या सुदृढ ताळेबंदामुळे आघाडीच्या कंपन्यांकडून रोखे विक्री फारशी झालेली नाही, त्यामुळे उपलब्ध रोख्यांना मागणी वाढल्याने किमतीत वाढ झाल्याचे दिसत आहे.

आदित्य बिर्ला सन लाइफ कॉर्पोरेट बाँड फंड हा व्याजदरासंबंधित जोखमीचे सक्रिय व्यवस्थापन करणारा फंड आहे. फंडाच्या पोर्टफोलिओत ६८.४४ टक्के रोखे ‘ट्रिपल ए’ पत धारण करणारे आणि केंद्र सरकारच्या रोख्यांचे प्रमाण २८.३१ टक्के असून उर्वरित ०.२७ टक्के मालमत्ता रोकड सुलभ (सीएलओबी) आहे. सक्रिय कालावधी व्यवस्थापनामुळे (ड्युरेशन) कॉर्पोरेट बाँड फंड गटात पत जोखीम (क्रेडिट रिस्क) टाळणारा फंड आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये, फंडाने आपल्या मालमत्तेपैकी सुमारे २२ टक्के मालमत्ता दीर्घ-मुदतीच्या सरकारी रोख्यांत (वर्ष २०३३, २०३४ आणि २०३७ मध्ये मुदतपूर्ती होणाऱ्या रोख्यांत ) गुंतविली आहे. ज्यामुळे कॉर्पोरेट बाँड फंड गटात तुलनेत अनुकूल जोखीम-लाभ गुणोत्तर तयार केले आहे. भारतीय सरकारी रोख्यांचा जागतिक निर्देशांकांमध्ये समावेश केल्यामुळे. एकूण मालमत्तेचा अंदाजे २२ टक्के भाग सरकारी रोख्यांत आणि २७ टक्के भाग सरकारी मालकीच्या रोख्यांत गुंतविला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत, आदित्य बिर्ला सनलाइफ लिक्विड फंड (डायरेक्ट), युनियन बँक, सिडबी, नाबार्ड, बँक ऑफ बडोदा, बिहार आणि केरळ राज्य सरकारचे रोखे, बजाज हउसिंग फायनान्स इत्यादींनी विकलेल्या उच्च पत असलेल्या रोख्यांत गुंतवला आहे.
कौस्तुभ गुप्ता एप्रिल २०१७ पासून या फंडाचे सह निधीव्यवस्थापक होते. एप्रिल २०२१ मध्ये त्यांची नियुक्त व्यवस्थापक म्हणून नेमणूक झाली. गुप्ता आणि सुनैना द कुन्हा यांच्या नेतृत्वाखालील आदित्य बिर्ल्रा सनलाइफ म्युच्युअल फंडाचा निश्चित उत्पन्न गुंतवणूक व्यवस्थापन संघ त्यांचा दीर्घ कार्यकाळ आणि फंड घराण्यातील अनुभव पाहता आणि मनीष डांगी यांचे संक्रमण चांगले व्यवस्थापित केले गेले. गुंतवणूक संघ एकसंध पद्धतीने कार्य सिद्धीस नेण्यास कटिबद्ध असल्याचे दिसून आले आहे.

सक्रिय कालावधी व्यवस्थापन

व्याजदर कपातीपश्चात रोख्यांच्या किमती वाढल्या तरी घसरत्या व्याजदरामुळे फंडाचे उत्पन्न कमी होते. घसरत्या व्याज दर आवर्तनांत फंड गटातील अन्य स्पर्धक फंडांपेक्षा चांगला परतावा दिला आहे. फंड गटातील काही फंडांनी २०२१ मध्ये सरासरी परिपक्वता (ॲव्हरेज मॅच्युरिटी) सक्रियपणे कमी केली. रिझर्व्ह बँकेने मे २०२२ पासून व्याजदर वाढवण्यास सुरुवात करण्यापूर्वी, अर्थव्यवस्थेतून अतिरिक्त रोकडसुलभता कमी केली. त्या वेळी मुदतीचे सक्रिय व्यवस्थापन करण्याचे धोरण कामी आले. या सक्रिय व्यवस्थापनामुळे उत्पन्न वाढल्याने संभाव्य घसरणीमुळे (मार्क-टू-मार्केट) नुकसान कमी झाले. या कालावधीत, फंडाने ‘ट्रिपल-ए’) रोख्यांमध्ये ८५ टक्के वाटप राखले. ज्यामुळे २०२१-२२ दरम्यान कमी व्याज-दर टप्प्यात आणि मे २०२२ च्या वाढत्या-दर टप्प्यात हा फंड या फंड गटात सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या फंडांपैकी होता. वाढत्या व्याजदर कालावधीनंतर फंडाने सरासरी परिपक्वता फेब्रुवारी २०२३ पासून वाढवला आहे. त्याची सरासरी परिपक्वता साडेपाच वर्षांपर्यंत वाढवली. दरम्यानच्या काळात मानदंड रोख्यांचे उत्पन्न (केंद्र सरकारच्या १० वर्षांच्या रोख्यांचे उत्पन्न) ७.५ टक्क्यांवरून सध्या ६.७३ टक्क्यांपर्यंत घसरले आणि ‘ट्रिपल-ए’ आणि ‘पीएसयू’ रोख्यांचे उत्पन्न ८ टक्क्यांवरून ७.५ टक्क्यांपर्यंत घसरले. सध्या, फंडामध्ये सार्वभौम रोखे आणि उच्च-पत धारण करणाऱ्या रोख्यांचा समतोल साधला आहे. उच्च रोकड सुलभता हे पोर्टफोलिओचे वैशिष्ट्य आहे. भविष्यात दर कपातीमुळे भांडवली लाभ होणार असला तरी, कमी व्याजदरामुळे फंडाचे उत्पन्न घसरणार आहे. अलीकडील जागतिक घडामोडी भारतीय रोख्यांमध्ये परदेशी गुंतवणूकदारांनी दाखविलेला रस रोखे बाजारात अस्थिरता वाढण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, रोखे गुंतवणुकीवर मिळालेल्या उत्पन्नावर गुंतवणूकदारांच्या कर कक्षेनुसार कर आकारणी होणार आहे. उच्च-गुणवत्तेच्या मुदत ठेवींच्या तुलनेत रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडातील गुंतवणूक कमी कर कार्यक्षम असली तरी रोकड सुलभता आणि वैविध्यामुळे आणि दीर्घ काळ मुद्दलाच्या चक्रवाढीची संधी साधू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांना हा फंड अजूनही आकर्षक गुंतवणूक आहे.

नियमित योजनेसाठी फंडाचे खर्चाचे प्रमाण ०.५१ टक्के आहे, जे फंड गटाच्या सरासरीच्या ०.७० टक्के खर्चाच्या प्रमाणापेक्षा कमी आहे. फंडाने सुरुवातीपासून (३ मार्च १९९७) पासून वार्षिक ८.९१ टक्के दराने परतावा दिला आहे. मागील २० वर्षात फंडाने ८.०४ टक्के एसआयपी परतावा दिला आहे. गेल्या १० वर्षांच्या नक्त मालमत्ता मूल्याच्या (एनएव्ही) विदेवरून मोजलेल्या २० वर्षांतील ५ वर्षांच्या चलत सरासरीद्वारे मोजल्या गेलेल्या कामगिरीवरून असे दिसून येते की, फंडाने ९५.७६ टक्के वेळा ८ टक्यांपेक्षा अधिक परतावा दिला आहे. सेवानिवृत्त आणि भांडवली बाजारातील अस्थिरतेची जोखीम टाळू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदरांसाठी बँकमुदत ठेवींच्या तुलनेत रोकडसुलभ आणि बँकेच्या मुदत ठेवींपेक्षा अधिक परतावा देणारा हा फंड आहे. गेली २७ वर्षे समईच्या संथ तेवणाऱ्या ज्योतीसारखा हा फंड असून परताव्यात सातत्य राखलेलाहा फंड आहे. ‘१०० वजा वय’ या सूत्राला अनुसरून दीर्घकालीन गुंतवणूक करावी असा हा फंड आहे.