आयुष्यात पैशाने सर्व सुखं मिळवता येत नाहीत हे खरंच आहे पण जवळ पैसे नसतील तर आयुष्यातल्या अनेक चिंता वाढतात हे सुद्धा तितकंच खरं आहे. आपल्याला आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी त्याचबरोबर आपल्या आणि आपल्या कुटुंबीयांच्या योग्य त्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी सतत कमी जास्त प्रमाणात पैसे लागतच असतात. कधी काही कारणांमुळे , किंवा निवृत्तीनंतर अपरिहार्यता म्हणून आपल्या कमाईचा ओघ मंदावतो किंवा थांबतो. या कालखंडामध्ये सुद्धा आपल्या गरजा पूर्ण करता याव्यात, त्याचबरोबर आपल्याला एक चांगली जीवनशैलीसुद्धा सांभाळता यावी, यासाठी आपण नियमित पैसे कमावत असतानाच त्यातल्या योग्य भागाची उत्तम प्रकारे गुंतवणूक करणं आवश्यक असतं.

आणखी वाचा: Money Mantra: आयटीसी आणि आयटीसी हॉटेल यांचे डीमर्जर; शेअरहोल्डर्सना काय मिळणार?

mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Jeevan pramaan online process
Money Mantra: हयातीचा दाखला ऑनलाईन मिळवण्यासाठी जीवन प्रमाण सुविधा काय आहे?
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
public banks profit increase by 26 percent in first half fy 25
सरकारी बँकांच्या नफ्यात सहामाहीत २६ टक्के वाढ


भविष्यकाळामध्ये अधिक लाभ मिळवण्याच्या उद्देशाने आपल्या जवळचे पैसे, सेवा किंवा इतर संसाधनं एखाद्या संस्थेला, एखाद्या योजनेला किंवा एखाद्या व्यक्तीला देणं म्हणजे ‘गुंतवणूक’. आर्थिक गुंतवणुकीच्या संदर्भात बोलायचं झालं तर आपल्या जवळचे पैसे एखाद्या कंपनीमध्ये , संस्थेमध्ये किंवा योजनेमध्ये गुंतवून त्यापासून, गुंतवलेल्या रकमेपेक्षा अधिक परतावा मिळवणं हे गुंतवणुकीचं प्रमुख उद्दिष्ट असतं.

आणखी वाचा: Money Mantra: फ्यूचर्स आणि ऑप्शन्स म्हणजे नेमकं काय?


‘योग्य तितकी’ गुंतवणूक करण्यासाठी आपण किती पैसे कमावतो याच्याइतकंच आपण किती पैसे वाचवतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं असतं . काही वेळा आपण अनावश्यक खर्च करतो. त्याच बरोबर आपण आपलं ‘क्रेडिट कार्ड ‘ वापरून केलेल्या खरेदी वर किंवा आपण भरत असलेल्या ‘ईएमआय’ आवश्यकते पेक्षा कितीतरी अधिक पट रक्कम आपल्याला क्रेडिट कार्ड आणि ” सुविधा देणाऱ्या बँकेला विनाकारण देत असतो . क्रेडिट कार्ड वापरासंदर्भात आणि ईएमआय वापरासंबंधी पुरेसं ज्ञान नसल्यामुळे किंवा अनवधानाने किंवा बँकांच्या जाहिरातींना भुलल्यामुळे आपण ती अतिरिक्त रक्कम भरत असतो. यामध्ये आपले कष्टाने कमावलेले पैसे अक्षरश: वाया जात असतात. क्रेडिट कार्ड आणि इएमआय संबंधी योग्य माहिती घेतली तर आपण वाया जात असलेले ते पैसे वाचवून तेच पैसे एखाद्या चांगल्या आणि लाभदायी योजनेत गुंतवून त्यापासून अनेक फायदे मिळवू शकतो . आपल्या ‘आनंदी गुंतवणूक ‘ या सदर मध्ये आपण या आणि अशा इतर काही ठिकाणी विनाकारण वाया घालवत असलेले पैसे वाचवून ते योग्य प्रकारे कसे गुंतवावेत या विषयी सविस्तर चर्चा करणार आहोत. आनंदी गुंतवणूक या सदरातील पहिल्या तेरा लेखांचे विषय पुढील प्रमाणे असतील

‘गुंतवणुकीचं नियोजन’
अर्थशास्त्रातील काही मूलभूत सिद्धांत, मार्गदर्शक तत्वं आणि नियमांच्या आधारावर बहुविध दृष्टिकोनातून विचार करून आपल्या गुंतवणुकी संबंधी निर्णय घेणे म्हणजे आपल्या ‘गुंतवणुकीचं नियोजन’ करणे. गुंतवणुकीचं नियोजन करताना आपल्याला त्या गुंतवणुकीवरून किती कालावधी नंतर परतावा अपेक्षित आहे , परतावा मिळण्यास त्यापेक्षा अधिक कालावधी लागला तर त्या अतिरिक्त काळामध्ये तगून राहण्याची आपली क्षमता कितपत आहे, आणि त्या गुंवणुकीमागचं आपलं नेमकं उद्दिष्ट काय आहे म्हणजे त्या गुंतवणुकीमधून मिळालेला परतावा आपल्याला नेमका कशासाठी (उदा. मालमत्ता खरेदी करण्यासाठी, निवृत्ती नंतर उत्तम जीवन जगण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी इ.) वापरायचा आहे आणि आपली परिस्थिती म्हणजे गुंतवणुकीसाठी आपल्याकडे उपलब्ध असलेले पैसे यांचा प्रामुख्याने विचार केला जातो. याबरोबरच गुंतवणुकीचं नियोजन करताना जागतिक किंवा देशाच्या अर्थव्यवस्थेत आणि नियमात होऊ शकणारे बदल, शेअर आणि धातूंच्या बाजारपेठेत होऊ शकणारे अल्प आणि दीर्घकालीन चढ उतार या सर्व बाह्य घटकांचा सुद्द्धा विचार करावा लागतो . या लेखामध्ये वरील सर्व घटकांचा सखोल आणि सविस्तर विचार रंजकतेने करून गुंतवणुकीच्या नियोजनाबद्दल महत्वाची मार्गदर्शक तत्व सांगितली जातील .

२. क्रेडिट कार्ड मॅनेजमेंट
आपल्यापैकी बहुतेक सर्व जण क्रेडिट कार्ड्स वापरतात . बरेचजण एकापेक्षा अधिक क्रेडिट कार्ड्स सुद्धा वापरतात . क्रेडिट कार्डवर केलेल्या खरेदीचं पेमेंट योग्य वेळी न केल्यानं बऱ्याच लोकांना खरेदी केलेल्या वस्तूच्या कितीतरी पट अधिक रक्कम क्रेडिट कार्ड बँकेला दयावी लागते . त्यापैकी बहुसंख्य लोकांना आपण किती अधिक रक्कम याची सुद्धा पुरेशी कल्पना नसते . ती रक्कम वाढत गेल्यावर सामान्य माणसाला ती भरणं अवघड होतं. ती रक्कम न भरल्यामुळे काही लोकांचं क्रेडिट कार्ड जप्त सुद्धा होतं . याउलट क्रेडिट कार्ड व्यवस्थित वापरल्यास आपण आपल्या खरेदीवर काहीसा नफा सुद्धा मिळवू शकतो. आपल्या खरेदीच्या कित्येक पट रक्कम क्रेडिट कार्डला देण्याचं टाळून आपल्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून आपली खरेदी सोयीस्कर आणि किफायतशीर बनवण्याचा मार्ग रंजक माहिती.

३. कर्ज घेणं आणि फेडणं
कर्ज घेणं हे केवळ उद्योजक किंवा व्यापारी यांच्या पुरतंच मर्यादित न राहता आज तो आपल्या सर्वांच्याच आयुष्याचा एक अविभाज्य भाग बनून गेला आहे . आपण आपल्या करिअरच्या आणि आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर घरासाठी , गाडीसाठी , मुलांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी लहान मोठी कर्जे घेत असतो . कर्ज योग्य प्रकारे फेडलं तर आपली तात्कालिक गरज पूर्ण होतेच पण आपलं आयुष्य सुद्धा अधिक समृद्ध होतं. पण जर कर्ज नीट फेडता आलं नाही तर ते फार मोठं ओझं बनून जातं. त्याचा भर आपल्या स्वतःवरच नव्हे तर पूर्ण कुटुंबावर आणि मुलं बाळांच्यावर म्हणजे पुढच्या पिढीवर सुद्धा येतो . योग्य तितकंच कर्ज घेऊन ते योग्य रीतीने फेडून अधिक समृद्ध जीवन जगण्याबद्दलची सोदाहरण माहिती.

४. सोन्यातील गुंतवणूक
आजही आपल्यापैकी बहुसंख्य लोक सोनं खरेदीला खूप महत्व देतात. लग्नसमारंभ किंवा सणासुदीला परंपरा म्हणून सोन्याची खरेदी केली जाते. आपण आजही आपल्यामध्ये सोनं हे ‘गुंतवणुकी’ पेक्षा ‘भावनिक मूल्य असलेली वस्तू ‘ आहे . पण सोन्यामध्ये योग्य तितकी गुंतवणूक केल्यास आणि त्या गुंतवणुकीचा व्यवहारी उपयोग केल्यास आयुष्य अधिक सोपं आणि आनंदी होऊ शकतं हे सांगणारा लेख.

५. मालमत्तेमधील गुंतवणूक
मालमत्तेमधील (जमीन, घर , फ्लॅट इ. )गुंतवणुकीबद्दल आज अनेकांच्या मनात शंका आहेत. मालमत्तेत गुंतवलेल्या रकमेइतकी रक्कम शेअर किंवा तत्सम अन्य साधनांमध्ये गुंतवल्यास कितीतरी अधिक परतावा मिळतो असं मानलं जातं. तसंच कित्येक वेळा आपण खरेदी केलेल्या मालमत्तेची ओ.सी. किंवा तत्सम औपचारिक कागदपत्रं पूर्ण नाहीत हे लक्षात येतं. त्यामुळे ती मालमत्ता कुणाला विकता सुद्धा येत नाही. मग ती मालमत्ता आपली ‘ऍसेट’ ऐवजी ‘लायेबिलिटी’ बनून जाते. कित्येक वेळा आपण बांधकाम सुरु असलेलं घर विकत घेतो. त्यामध्ये आपले कष्टाचे पैसे गुंतवतो . पण बिल्डर ती इमारत पूर्ण करू शकत नाही आणि आपले पैसे तसेच अडकून रहातात. हे सर्व धोके टाळण्यासाठी कोणती काळजी घ्यायची आणि मालमत्तेत गुंतणूक करून त्यापासून अल्पकालीन तसंच दीर्घकालीन मोठा नफा मिळवण्यासंबंधी उपयुक्त मार्गदर्शन.

६. शेअर्स मधील गुंतवणूक
अलीकडे लोकांचा विशेषतः महाराष्ट्रीयन लोकांचा शेअर बाजारात पैसे गुंतवण्याकडे कल मोठ्या प्रमाणात वाढू लागला आहे. केवळ तरुण किंवा मध्यमवयीनच नव्हे तर निवृत्तीच्या जवळ आलेले आणि अगदी निवृत्त झालेले लोक सुद्द्धा शेअर बाजारात गुंतवणूक करू लागले आहेत. त्यापैकी बहुतेकांना अपेक्षित नफा मिळत नाही किंवा बऱ्याच जणांना नुकसान सुद्धा सहन करावं लागतं. याचं एक प्रमुख कारण म्हणजे – यापैकी बहुतेक जण गुंतवणूक करताना दूरचित्रवाणीवरचे शेअर बाजारसंबंधीच्या चर्चा , ‘मार्केट ऍनालिसिस’ करणारी काही नियतकालिकं आणि त्यांच्या सारखेच त्यांचे काही धडपडे मित्र यांचा सल्ला घेतात. पण या सल्ल्यांच्या पलीकडे शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचं एक तंत्र आहे. त्या तंत्राचा उपयोग केला तर शेअर बाजारातून मोठा नफा कमवता येतो किमान नुकसान तरी टाळता येतं. आपल्या सदरातील लेखांमध्ये शेअर बाजारातील गुंतवणुकीच्या तंत्राबद्दलची सविस्तर आणि अभ्यासपूर्ण माहिती असेल.

७. इएमआय नियोजन
घर किंवा गाडी सारखी मोठी खरेदी असो किंवा टेलिव्हिजन सेट सारखी त्या मनाने लहान खरेदी असो आपल्या पैकी बरेच जण त्याची किंमत ईएमआय द्वारा देऊ इच्छितात. कित्येक वेळा सुट्टीसाठी केलेल्या प्रवासासारख्या काहीशा अनावश्यक खर्चसुद्धा नंतर ईएमआयद्वारेच दिला जातो. इएमआयद्वारा पेमेंट करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे प्रत्येक महिन्याला किती रक्कम ईएमआय मध्ये जाणार आहे याची आपल्याला पूर्व कल्पना असते. त्यामुळे आपण आपल्या खर्चाचं व्यवस्थित नियोजन करू शकतो. पण आपण अधिक खरेदी केली आणि जर आपल्याला फोन किंवा जास्त ईएमआय भरावा लागले तर खर्चाचा मेळ साधणं अवघड होतं. इएमआय बांधून घेतानाच कोणती काळजी घेतल्यास ईएमआय सहजपणे भरता येतील आणि ईएमआय सुविधेचा पूर्ण उपयोग करून घेता येईल या विषयी  सविस्तर चर्चा.

८. विम्यामधील गुंतवणूक
विम्यामध्ये पैसे गुंतवणं हे सर्वसामान्य भारतीय माणसासाठी जवळपास अनिवार्य आहे. काही वर्षांपूर्वी पर्यंत एलआयसी हा एकच पर्याय आपल्याला उपलब्ध होता . त्यामध्ये गुंतवणूक केल्यावर सरकार सुद्धा अनेक सवलती देत होतं . त्यामुळे जवळपास प्रत्येक जण एल.आय .सी. पॉलिसी घेत असे. गेल्या काही वर्षात भारतीय खाजगी तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांनी आपल्याला विम्याची सेवा द्यायला सुरवात केली . प्रत्येक कंपनीने स्वतःच्या योजना बाजारात आणल्या. मेडिक्लेम सारख्या योजना अतिशय लोकप्रिय आहेत. पण विम्यात गुंतवलेले पैसे पॉलिसी मॅच्युअर झाल्यावर किंवा काही दु:खद कारणामुळे पैसे परत मिळवणं जिकिरीचं असतं. वैद्यकीय उपचारांनंतर ‘कॅशलेस’ मेडिक्लेमच्या बाबतीत होणारा मनस्ताप बहुतेकांनी अनुभवलेला आहे. आपली विम्यातील गुंतवणूक किफायतशीर आणि योग्यवेळी सहजतेनं परतावा देणारी ठरावी यासाठी उपयुक्त माहिती.

९.फिक्स्ड डिपॉसिट्स
फिक्सड डिपॉझिट हा गुंतवणुकीचा पारंपरिक पण आजही तितकाच लोकप्रिय मार्ग आहे. बँक व्यवहारांच्या तंत्रज्ञानात नंतर एफडी करणं आणि आवश्यक तेव्हा ती मोडून त्यापासून पैसे घेणं अधिक सोपं आणि सहज झालं आहे. आज अनेक बँकानी ग्राहकांना आकृष्ट करण्यासाठी एफडी संबंधित अनेक योजना सुरु केल्या आहे. त्यामध्ये गुंतवलेले पैसे सुरक्षित राहून आपल्याला चांगला नफा सुद्धा मिळू शकतो. एफडीबद्दल सविस्तर आणि रंजक माहिती.

१० ते १३. आपल्या देशात तसेच जागतिक पातळीवर झालेल्या सातत्याने अनेक आर्थिक घडामोडी होत असतात. या सर्व घडामोडींचे आपल्या लहान-मोठ्या गुंतवणुकीवर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मोठे परिणाम होतात. या घडामोडींमध्ये आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवत, त्यामध्ये वेळेनुसार आवश्यक ते बदल करून, त्या घडामोडींमधून आपल्या गुंतवणुकीवर अधिक नफा कमावण्याच्या संधी विषयी माहिती.

अशा काही महत्वाच्या आर्थिक घडामोडी पुढील प्रमाणे
१०. जागतिक तेल बाजारात होणारे चढ – उतार
११. सोन्याच्या भावात होणारे चढ उतार
१२ . डॉलर आणि रुपयाच्या भावात होणारे बदल
१३ . काही तात्कालिक घटनांमुळे शेअर बाजारात होणारे अल्पकालीन आणि दीर्घकालीन चढ-उतार

आपली गुंतवणूक सहज आणि सुखकर असावी. तशी असेल तर ती आपल्याला अधिक लाभदायक ठरते. अशी गुंतवणूक आपल्या भविष्यकाळाबरोबरच आपला वर्तमान काळ सुद्धा आनंदी बनवते. ‘आनंदी गुंतवणूक ‘ या आपल्या साप्ताहिक सदरामध्ये आपण अशाच सहज, सुखकारक आणि आपलं आयुष्य अधिक आनंदी बनवणाऱ्या गुंतवणुकींच्या संधी आणि मार्गांविषयी विषयी जाणून घेणार आहोत.