फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप हा लार्जकॅप फंड गटातील यूटीआय लार्जकॅपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात जुना फंड आहे. एकेकाळी ‘टॉप क्वार्टाइल’मध्ये असणारा हा फंड सध्याच्या घसरणीमुळे कामगिरी क्रमवारीत खाली घसरला असला तरी मागील ३३ वर्षांत (स्थापनेपासून १ डिसेंबर १९९३ ते १२ मार्च २०२५) सर्वाधिक वार्षिक १८.०९ टक्के दराने परतावा दिला आहे. फ्रँकलिन ब्लूचिप हा लार्जकॅप फंड असल्याने एकूण मालमत्तेपैकी ८० टक्के मालमत्ता लार्जकॅप कंपन्यांत गुंतविणे अनिवार्य आहे. वेंकटेश संजीवी हे ऑक्टोबर २०२१ पासून या फंडाचे नियुक्त निधी व्यवस्थापक आहेत. मूलभूत संशोधनाअंती वाजवी मूल्यांकन असलेल्या आणि सुदृढ ताळेबंद असलेल्या दर्जेदार कंपन्यांत गुंतवणूक करण्याची या फंडाची रणनीती आहे.
बाजारातील मोठ्या घसरणीनंतर सर्वात आधी पुनर्प्राप्ती लार्ज-कॅप कंपन्यांत होत असल्याने ‘ॲम्फी’च्या आकडेवारीनुसार जानेवारी आणि फेब्रुवारीत चाणाक्ष गुंतवणूकदारांनी सर्वाधिक गुंतवणूक लार्जकॅप फंडात झालेली दिसत आहे. मोठ्या घसरणीनंतर निफ्टी ५० आणि बीएसई १०० मधील लार्जकॅप, व्यापक बाजारापेक्षा चांगली कामगिरी करण्याचा इतिहास असल्याने लार्जकॅपची कास धरणे योग्य ठरेल.
फंडाची डिसेंबर १९९३ ते फेब्रुवारी २०२५ या काळातील व्यापक कामगिरी काही काळाचा (२००८-२००९, २०१३-२०१४ आणि २०२०-२०२१) अपवाद वगळता चांगली झाली असल्याने गुंतवणूकदाराच्या मुख्य पोर्टफोलिओमध्ये (कोअर पोर्टफोलिओ) समावेश करण्यायोग्य हा फंड आहे. बाजाराची सद्य:स्थिती पाहता गुंतवणूकदारांनी या फंडात पद्धतशीर गुंतवणूक योजना (एसआयपी) करावी. मागील पाच वर्षांमध्ये फ्रँकलिन इंडिया ब्लूचिपमध्ये ‘एसआयपी’ करणाऱ्या गुंतवणूकदाराला वार्षिक १२.८९ टक्के दराने, तर १० वर्षे ‘एसआयपी’ करणाऱ्याला वार्षिक ११.२५ टक्के दराने परतावा दिला आहे, अशा लखलखीत कामगिरीमुळे भूतकाळात हा फंड प्रदीर्घकाळ ‘टॉप क्वार्टाइल’मध्ये होता.
गेल्या दोन वर्षांत फंडाच्या कामगिरीमध्ये (जोखीम समायोजित परतावा) लक्षणीय सुधारणा झाली आहे. फंडाची कामगिरी फंडाला लवकरच गतवैभव प्राप्त करून देईल, अशी आशा वाटते. फंडाच्या कामगिरीचा (१ डिसेंबर १९९३ ते २८ फेब्रुवारी २०२५) ‘रोलिंग रिटर्न’च्या आधारावर अभ्यास केला असता उपलब्ध झालेली आकडेवारी सोबतच्या कोष्टकात दिली आहे.
फ्रँकलिन इंडिया निफ्टी १००
फ्रँकलिन इंडिया ब्लूचिपची वर्ष २००८-०९ मधील तीव्र घसरणीमध्ये चांगल्या प्रकारे उतार-चढावांचा सामना केला आहे. घसरणी पश्चातच्या तेजीत चांगली कामगिरी केली आहे. पाच, सात, दहा, पंधरा, वीस आणि तीस वर्षांच्या कालावधीत, फंडाने मानदंडसापेक्ष आणि फंड गट सरासरीसापेक्ष चांगली कामगिरी केली आहे. तीस वर्षांहून अधिक कालावधीचा विचार केला तर एचडीएफसी लार्जकॅप (एचडीएफसी टॉप १००), टाटा लार्जकॅप, फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप, टोरस लार्जकॅप, जेएम लार्जकॅप, एलआयसी एमएफ लार्जकॅप या फंडात सर्वाधिक संपत्ती निर्मिती करणाऱ्या लार्जकॅपमध्ये फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप दुसऱ्या क्रमांकावर आहे. फंडाच्या पोर्टफोलिओमध्ये ४७ ते ४८ कंपन्या असतात. आघाडीच्या ५ कंपन्यांचे प्रमाण ३० टक्के, तर आघाडीच्या १० कंपन्यांचे प्रमाण ५० टक्के असते. मागील साठ महिने एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, ॲक्सिस बँक सर्वाधिक गुंतवणूक असलेल्या बँका होत्या. गुंतवणुकीत १२ ते १३ उद्योग क्षेत्रांचा समावेश असतो. मागील १२ तिमाहीत बँका आणि वित्तीय सेवा (बीएफएसआय) सर्वाधिक पसंतीचे उद्योग क्षेत्र आहे.
फ्रँकलिन इंडिया ब्लूचिपच्या गुंतवणुकीत माहिती तंत्रज्ञान, वाहन निर्मिती क्षेत्र (ऑटोमोबाइल) आणि ग्राहक उपयोगी वस्तू आरोग्य निगा क्षेत्रात मानदंडसापेक्ष अधिक गुंतवणूक आहे. फंडाची जानेवारीअखेरीस ७,४०८ कोटींची मालमत्ता असून खर्चाचे हे प्रमाण १.८९ टक्के आहे. फ्रँकलिन इंडिया ब्लूचिप फंडाने मागील एका वर्षात ३.२३ टक्के परतावा दिलेला असला तरी, मागील ३२ वर्षांत फंडाने १८.०९ टक्के वार्षिक वृद्धी दर राखला आहे. फंडाची स्थिर परतावा देण्याच्या दीर्घकालीन कामगिरी लक्षात घेता, पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीसाठी या फंडाची शिफारस करत आहे.