अर्थव्यवस्थेतील रोकडसुलभता ज्यावेळी तुलनेने कमी होते आणि बाजारातील अस्थिरता शिखर गाठते त्यावेळी लार्ज अँड मिडकॅप फंडांची कास धरणे हिताचे ठरते. जानेवारीत व्यापारी बँकांनी रिझर्व्ह बँकेकडून घेतलेली उचल ३ लाख कोटींपेक्षा अधिक असल्याचे दर्शवित होते. पतधोरण आढावा बैठकीत अर्थव्यवस्थेत पुरेशी रोकड सुलभता राखण्याचा निर्णय झाला. बँकांच्या ठेवी २५० लाख कोटी गृहीत धरता किमान २ लाख कोटी (१ टक्का) रोकड सुलभता राखली जाईल.या कॅलेंडर वर्षाच्या सुरूवातीला रोकड चणचण भासणाऱ्या अर्थव्यवस्थेकडून पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेचा प्रवास अतिरिक्त रोकड सुलभतेकडे झाल्याचे लक्षात येते. व्यापारी बँकांनी रिझर्व्ह बँकेकडून घेतलेली उचल हे अर्थव्यवस्थेतील रोकड सुलभता मोजण्याचे माप असल्याचे मानले जाते तर ‘व्हॅल्यू ॲट रिस्क’ (VaR) हे बाजारातील अस्थिरता मोजण्याचे एक सांख्यिकीय परिमाण आहे. हे परिमाण एखाद्या मालमत्तेच्या किंमतीत किंवा पोर्टफोलिओलाच्या मूल्यांकनात विशिष्ट कालावधीत संभाव्य तोट्याचे प्रमाण ठरवते. ही दोन परिमाणे अर्थव्यवस्थेतील रोकड सुलभता सध्या पुरेशी असून, अस्थिरता ५ वर्षांच्या शिखरावर आहे, असे सूचित करते. रिझर्व्ह बँकेने विकासदराबाबत अंदाज ६.७ टक्क्यांवरून ६.५ टक्क्यांपर्यंत खालावणे आणि महागाई दर ४ टक्के राहण्याची शक्यता व्यक्त करतांना रेपोदरात पाव टक्क्याची कपात केली. तसेच पतधोरण तटस्थतेकडून अनुकूल केल्याने भविष्यात रेपोदरात कपात होईल आणि एक ते दीड टक्का अतिरिक्त रोकड सुलभता राहील. लार्ज अँड मिडकॅप फंड वृद्धी आणि स्थैर्य यांचा समतोल साधणारे असल्याने सद्य परिस्थितीत मोतीलाल ओसवाल लार्ज अँड मिडकॅप फंडाची ही शिफारस आहे.
सध्याच्या मूल्यांकनानुसार लार्ज आणि मिडकॅप फंड गटातील हा फंड नवीन गुंतवणूक संधी शोधणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी चांगले एक आश्वासक साधन आहे. भांडवली बाजार नियामक ‘सेबी’च्या फंड सुसूत्रीकरणाच्या आदेशात नमूद केल्यानुसार लार्ज अँण्ड मिडकॅप फंडांनी लार्ज आणि मिडकॅप कंपन्यांत प्रत्येकी किमान ३५ टक्के गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. उर्वरित ३० टक्के मालमत्ता फंड व्यवस्थापकाच्या इच्छेनुसार करता येते. मोतीलाल ओसवाल लार्ज अँण्ड मिडकॅप फंडाने ४५ टक्के लार्जकॅप आणि ४५ टक्के मिडकॅप कंपन्यांत गुंतवणूक केली असून, उर्वरित मालमत्ता स्मॉलकॅप आणि आभासी रोकड स्वरूपात आहे. गेल्या काही वर्षांपासून अव्वल दर्जाचा आणि सातत्यपूर्ण कामगिरी करणारा हा फंड आहे आणि गुंतवणूकदार हा फंड ‘कोअर पोर्टफोलिओचा’ एक भाग असण्याच्या योग्यतेचा असल्याने या फंडाचा नव्या गुंतवणुकीसाठी विचार करू शकतात. परंतु सध्या अस्थिरता शिगेला पोहोचलेली असल्याने गुंतवणूक ‘एसआयपी’ किंवा ‘एसटीपी’ पद्धतीने करावी.
अजय खंडेलवाल हे या फंडाचे नियुक्त निधी व्यवस्थापक आहेत. निकेत शाह हे सहनिधी व्यवस्थापक आहेत. ‘निफ्टी लार्ज मिडकॅप २५० टीआरआय’ हा या फंडाचा मानदंड आहे. अजय खंडेलवाल मोतीलाल ओसवाल ॲसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेडमध्ये नोव्हेंबर २०२३ मध्ये दाखल झाले आहेत. त्याआधी ते कॅनरा रोबेको म्युच्युअल फंड (डिसेंबर २१ ते ऑक्टोबर २३) आणि त्याआधी बँक ऑफ इंडिया इन्व्हेस्टमेंट्स मॅनेजर्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये निधी व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांची कामगिरी खालील कोष्टकात दिली आहे.
अजय खंडेलवाल (इक्वल वेट इंडेक्स)
कॅलेंडर वर्ष फंड निर्देशांक
२०१८ -१.७५ -८.१५
२०१९ ४.३१ २.०८
२०२० २२.१५ १५.५९
२०२१ ३०.०८ २८.०१
२०२२ ७.७४ ०.५३
२०२३ ३९.९३ ३४.०५
२०२४ ४२.८८ २१.३८
निधी व्यवस्थापक मुख्यत्वे मध्यम ते दीर्घकालीन भांडवल वृद्धी मिळविण्याच्या उद्देशाने लार्ज आणि मिडकॅप कंपन्यांत गुंतवणूक करतात. फंडाचा पोर्टफोलिओ अन्य लार्ज अँण्ड मिडकॅप फंडांपेक्षा भिन्न आहे. पोर्टफोलिओ फ्लेक्झीकॅप धाटणीचा असला तरी फोकस्ड फंडांच्या पोर्टफोलिओशी जवळीक साधणारा म्हणजे आघाडीच्या गुंतवणुकांची एकूण मालमत्तेतील टक्केवारी अधिक आहे. पहिल्या पाच कंपन्या एकूण मालमत्तेच्या २५.५३ टक्के, पहिल्या दहा कंपन्या ४२.१५ टक्के आहेत. आघाडीच्या तीन उद्योग क्षेत्रांचे प्रमाण ५५.३९ टक्के आहे.
मोतीलाल ओसवाल लार्ज अँड मिडकॅप फंडाची सुरुवात ऑक्टोबर २०१९ मध्ये झाली. ३१ मार्च २०२५ रोजी फंडाची मालमत्ता ८,६९९ कोटी होती. फंडाच्या ‘रेग्युलर प्लान’च्या व्यवस्थापन खर्चाचे प्रमाण १.७५ टक्के आहे. फंडाने सुरुवातीपासून (५ एप्रिल २०२५ पर्यंत) वार्षिक २०.३१ टक्के दराने परतावा दिला आहे. एक रकमी गुंतवणुकीवर फंडाने तीन वर्षात वार्षिक १८.७६ टक्के तर पाच वर्षात वार्षिक २७.४५ टक्के दराने परतावा दिला आहे. तर एसआयपी गुंतवणुकीवर तीन वर्षात वार्षिक १६.२३ टक्के तर पाच वर्षात वार्षिक १९.४० टक्के दराने परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांसाठी फंडाशी संबंधित जोखीम-परतावा गुणोत्तर समजून घेणे महत्त्वाचे असते. शार्प रेशो, जो जोखीम-समायोजित परताव्याचे मोजमाप करतो, हा फंड गुंतवणूकदारांना मिळालेल्या परताव्यासाठी किती जोखीम घेतली याचे मोजमाप करतो. गेल्या वर्षभरात, फंडाचे शार्प रेशो ३.०८ असून तर तीन वर्षांचे आणि पाच वर्षांचे गुणोत्तर अनुक्रमे १.५७ आणि १.१४ आहे. शार्प रेशो १ पेक्षा अधिक चांगला समाजाला जातो. अस्थिरतेच्या बाबतीत, त्याच कालावधीत प्रमाणित विचलन- एका वर्षासाठी १०.८९ टक्के तीन वर्षांसाठी १४.५६ टक्के आणि पाच वर्षांसाठी १९.४३ टक्के आहे. उच्च प्रमाणित विचलन अधिक अस्थिरता दर्शवतात, तर कमी अधिक स्थिर परतावा सूचित करतात.
जेव्हा ऑक्टोबर २० ते मार्च २०२५ या कालावधीतील ३ वर्षांचे चलत परतावा (रोलिंग रिटर्न) तपासले असता फंडाने त्याच्या फंड गटातील स्पर्धक फंडांपेक्षा चांगली कामगिरी केल्याचे दिसते. या कालावधीत फंडाने ८७ टक्क्यांहून अधिक वेळा मानदंड सापेक्ष चांगला परतावा मिळविला आहे. एखाद्या फंडाबाबतचा निष्कर्ष काढण्यास ५ वर्षांचा कालावधी पुरेसा नाही. या फंडाचा ‘एनएफओ’ आला त्यावेळचे मूल्यांकन पाहता फंडाची कामगिरी ठीकठाक म्हणावी लागेल. परंतु फंडाची कामगिरी पाहाता, ‘हं कानी अस्सल कीरत, माझी देखणी सूरत, न्हाई हटत कुणाच्या नजरा’ असे म्हणावे लागेल.