Types of Mutual Funds : म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे खूप फायद्याचे मानले जाते. शेअर बाजाराबाबत फारशी माहिती नसेल तर म्युच्युअल फंड हा शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा उत्तम मार्ग असल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण म्युच्युअल फंडाची निवड ही अतिशय किचकट प्रक्रिया आहे. तुम्ही योग्य म्युच्युअल फंड न निवडल्यास त्याचा थेट परिणाम तुमच्या गुंतवणुकीवर होऊ शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

म्युच्युअल फंडाचे किती प्रकार आहेत?

बाजार नियामक सेबीद्वारे म्युच्युअल फंडांची मुख्यतः पाच श्रेणींमध्ये विभागणी केली जाते.

इक्विटी फंड (Equity Funds)
डेट फंड (Debt Funds)
बॅलन्स किंवा हायब्रीड फंड (Hybrid Funds)
सोल्युशन ओरिएंटेड फंड (Solution-Oriented Funds)
इतर फंड्स (Other Funds)

इक्विटी फंड (Equity Funds)

इक्विटी फंड ही सर्वात सामान्य आणि उच्च जोखीम श्रेणी असलेला फंड आहे. हे लार्ज, मिड आणि स्मॉल कॅप उप श्रेणींमध्ये देखील विभागले गेले आहे. लार्ज कॅपमध्ये जास्त भांडवल असलेल्या मोठ्या कंपन्यांमध्ये पैसे थेट गुंतवले जातात. मिड कॅप फंडातील पैसे मध्यम भांडवल असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवले जातात. तर स्मॉल कॅपमध्ये कमी भांडवल असलेल्या छोट्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले जातात.

डेट फंड (Debt Funds)

जोखमीपासून दूर राहू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी डेट फंड हा गुंतवणुकीचा चांगला पर्याय आहे. अशा फंडांच्या वतीने फिक्स्ड इन्कम ट्रेझरी बिल्स, कॉर्पोरेट बाँड्स आणि सरकारी सिक्युरिटीज इत्यादींमध्ये गुंतवणूक केली जाते. डेट फंडात स्थिरता आहे. तसेच बाजारातील चढ-उतारांचा त्यांच्यावर कमी परिणाम होतो. जर एखाद्या गुंतवणूकदाराला कमी जोखीम हवी असेल, तर डेट फंड हा त्याच्यासाठी चांगला पर्याय आहे.

हायब्रीड फंड (Hybrid Funds)

हायब्रीड फंड हा इक्विटी आणि डेट फंड यांचे मिश्रण आहे. ज्यांना बाजाराचा फायदा घ्यायचा आहे परंतु जोखीम घेऊ इच्छित नाही, अशा गुंतवणूकदारांसाठी हा फंड आहे. यात दोन उपश्रेणी आहेत. पहिला अॅग्रेसिव्ह हायब्रीड फंड आणि दुसरा बॅलन्स्ड हायब्रीड फंड. तुम्ही निवडलेल्या श्रेणीनुसार म्युच्युअल फंड व्यवस्थापकाच्या वतीने इक्विटी आणि डेटमध्ये गुंतवणूक करू शकता. अॅग्रेसिव्ह हायब्रीड फंडांना इक्विटीमध्ये जास्त गुंतवणूक केली जाते आणि बॅलन्स्ड हायब्रीड फंडांना डेटला जास्त प्राधान्य दिले जाते.

सोल्युशन ओरिएंटेड फंड (Solution-Oriented Funds)

जर तुम्ही निवृत्ती, मुलांचे उच्च शिक्षण आणि लग्न इत्यादींसारख्या विशिष्ट ध्येयासाठी निधी जमा करत असाल तर सोल्युशन ओरिएंटेड फंड हा एक चांगला पर्याय असू शकतो. अशा फंडांमध्ये इक्विटी, डेट आणि हायब्रीड फंड यांचे मिश्रण असू शकते. यापैकी काही फंड लॉक-इन कालावधीसह येतात.

इतर फंड (Other Funds)

इक्विटी, डेट, हायब्रीड आणि सोल्युशन ओरिएंटेड फंडांव्यतिरिक्त लिक्विड फंड, ग्रोथ फंड, ओपन एंडेड फंड, क्लोज एंडेड फंड आणि ईएलएसएस इत्यादी इतर अनेक प्रकारचे फंड आहेत.

लिक्विड फंड्स- लिक्विड फंडामध्ये तरलता राहते. साधारणपणे असे फंड फार कमी कालावधीसाठी गुंतवणूक करतात.

ग्रोथ फंड- नावाप्रमाणेच अशा फंडातील पैसे ग्रोथ स्टॉकमध्ये गुंतवले जातात.

ईएलएसएस- ELSS चा उद्देश कर बचत आहे. याचा लॉक इन कालावधी ३ वर्षांचा आहे. यामध्ये गुंतवणूक केल्यास ८० सीअंतर्गत १.५ लाख रुपयांपर्यंत सूट मिळते.

ओपन आणि क्लोज एंडेड फंड- तुम्ही केव्हाही ओपन एंडेड फंडात पैसे जमा करू शकता आणि काढू शकता. तर क्लोज एंडेड फंडातील गुंतवणूक मॅच्युरिटीच्या वेळीच काढता येते.

मराठीतील सर्व मनी-मंत्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: How many types of mutual funds are there what is the difference between equity debt and hybrid funds find out vrd
Show comments