आज सर्वांना एकच प्रश्न पडलाय, निफ्टी निर्देशांक २२,८०० चा स्तर तरी राखणार का? निफ्टी निर्देशांक अजूनही २३,५०० चा स्तर पार करण्यास वारंवार अपयशी ठरत असल्याने या प्रश्नाला स्वाभाविक महत्त्व आहे. निफ्टी निर्देशांक अजून किती खाली घरंगळत जाणार? निफ्टी निर्देशांकावर शाश्वत सुधारणा कधीपासून होणार? अशा आणखीही उप-प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेऊ या. निफ्टी निर्देशांकाच्या बाबतीत आजच्या घडीला २२,५०० ते २२,६०० हा ‘महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर’ असून येणाऱ्या दिवसांत निफ्टी निर्देशांकांनी हा स्तर राखल्यास, या निर्देशांकावर एक क्षीण स्वरूपातील सुधारणा अपेक्षित आहे. या सुधारणेचे वरचे लक्ष्य २३,४०० ते २३,५५० असे असेल. निफ्टी निर्देशांक २३,४०० ते २३,५५० स्तरावर सातत्याने पंधरा दिवस टिकल्यास बातच और ठरेल. मात्र दुसरी शक्यता अशीही की, २२,८०० चा स्तर राखण्यास निफ्टी निर्देशांक अपयशी ठरेल. तसे तो ठरल्यास, ‘भय इथले संपत नाही’ अशी स्थिती निर्माण होईल. त्यातून निफ्टी निर्देशांक २२,२०० ते २१,८०० पर्यंत घरंगळत जाऊ शकतो. पुन्हा एकदा नमूद करतो, निफ्टी निर्देशांक २३,८०० स्तरावर सातत्याने पंधरा दिवस टिकल्यास ‘शाश्वत तेजी’ संभवते. तिचे वरचे लक्ष्य हे २४,००० ते २४,५०० असेल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फ्रान्स, अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना, फ्रान्सने भारतात वीज निर्मितीसाठी अणुभट्टी उभारण्याची इच्छा व्यक्त केली. या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या भारतीय कंपन्या व त्यातील समभाग हे आपले आजचे ‘बातमीतील समभाग’ असणार आहेत.
१) भारत हेवी इलेक्ट्रिकल (भेल) लिमिटेड:
१४ फेब्रुवारीचा बंद भाव- १९३.३१ रु.
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर- २२० रु.
बातमीच्या वरील सकारात्मक परिणामात, समभागाकडून २२० रुपयांचा स्तर पार करत प्रथम वरचे लक्ष्य २३५ रुपये, द्वितीय लक्ष्य २५०रुपये अन्यथा मंदीच्या रेट्यात, सकारात्मक बातमीच निष्फळ ठरत, समभाग २२० रुपयांच्या केंद्रबिंदू स्तराखालीच राहत १८४ रुपयांपर्यंत घसरेल.
२) लार्सन ॲण्ड टुब्रो लिमिटेड:
१४ फेब्रुवारीचा बंद भाव- ३,२३७.६५ रु.
महत्त्वाचा केंद्रबिंदू स्तर:-३,५००रु.
बातमीच्या वरील सकारात्मक परिणामात, समभागाकडून ३,५०० रुपयांचा स्तर पार करत, प्रथम वरचे लक्ष्य ३,८०० रुपये, द्वितीय लक्ष्य ३,९५० रुपये, अन्यथा मंदीच्या रेट्यात, सकारात्मक बातमीच निष्फळ ठरत, समभाग ३,५०० रुपयांच्या केंद्रबिंदू स्तराखालीच राहत, २,९०० रुपयांपर्यंत घसरेल.
लेखक भांडवली बाजार विश्लेषक आहेत.
ashishthakur1966@gmail.com
अस्वीकृती: शेअर बाजारातील व्यवहार हे बाजारातील जोखमीच्या अधीन आहेत. अंदाज चुकल्यास मुद्दल गमावण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी ‘स्टॉप लॉस’ आणि ‘इच्छित लक्ष्य’ या संकल्पनांचे पालन करणे आवश्यक आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी आपल्या गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.